मतदानवाढीचा फायदा-तोटा कुणास?

By किरण अग्रवाल | Published: May 2, 2019 06:30 AM2019-05-02T06:30:46+5:302019-05-02T06:33:02+5:30

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे चारही टप्पे संपल्याने आता उमेदवारांच्याच गोटात नव्हे तर चौका-चौकात व गावांच्या पारा-पारावर सारे आकडेमोडीत दंग आहेत

What is the advantage of the increase of voting? | मतदानवाढीचा फायदा-तोटा कुणास?

मतदानवाढीचा फायदा-तोटा कुणास?

Next

 

किरण अग्रवाल

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे चारही टप्पे संपल्याने आता उमेदवारांच्याच गोटात नव्हे तर चौका-चौकात व गावांच्या पारा-पारावर सारे आकडेमोडीत दंग आहेत. विशेषत: शेवटच्या चरणात बहुतेक ठिकाणी मतदानाचा टक्का वाढल्याने ही वाढ सत्तांतराला किंवा परिवर्तनाला कौल देणारी असल्याचे आडाखे बांधले जात आहेत. परंतु मतदानात वाढ झाली म्हणजे ती सरसकटपणे प्रस्थापितांच्या विरोधासाठीच झाली असे समजणेही भाबडेपणाचेच म्हणता यावे. मतदारांना आता गृहीत धरता येत नाही, त्याप्रमाणे पारंपरिक समजांवर आधारित गृहीतकेही यशापयशाची खात्री देणारी ठरू नयेत.

राज्यात पार पडलेल्या मतदानाच्या शेवटच्या चरणातील नाशिक, दिंडोरी, भिवंडी, कल्याण, पालघरसह मुंबईतील सर्व जागा तसेच नंदुरबार याठिकाणी यंदा मतदानाचा टक्का वाढला आहे. काही ठिकाणी दीड ते दोन टक्क्यांनी, तर उत्तर मुंबईमध्ये सर्वाधिक ७ टक्क्यांनी वाढ झालेली दिसून येते. मतदानातील अशी वाढ ही परिवर्तनास पूरक मानली जाते. ‘टक्का’ वाढला याचा अर्थ मतदार प्रस्थापितांना उलथवून टाकण्यासाठी घराबाहेर पडले, असा संकेत घेतला जातो. अनेकदा अनेक ठिकाणी तसे निकाल लागलेलेही दिसून येतात. अर्थात त्याच त्या उमेदवाराबद्दलची नकारात्मकता, राजकीय लाट किंवा अन्य समीकरणांमुळेही मतदान वाढून बदल घडून आले आहेत. गेल्या २०१४च्या निवडणुकीतच असे मोठ्या प्रमाणात घडले होते. मोदी फॅक्टरमुळे अनेकांचे नशीब उजळले होते. पण म्हणून प्रत्येकवेळी तसेच होणे अपेक्षित धरता येऊ नये. कारण, मोदींमुळे मतदानाचा टक्का वाढून ‘युती’चे काही उमेदवार निवडून येताना काही ठिकाणी टक्का वाढूनही प्रस्थापितांचे पाय घट्ट रोवलेलेच राहिल्याचे दिसून आले होते. यंदा तर मोदी लाट नसतानाही टक्का वाढला, ही वाढ मतदानाप्रतिच्या जागरूकतेतून झाली. त्यामुळे ती परिवर्तनच घडवेल, असे समजता येऊ नये.

आज जागोजागी जी आकडेमोड चाललेली दिसून येते आहे, ती मतदानवाढीचा लाभ विरोधकांना होतो या पारंपरिक समजावर आधारित आहे. वस्तुत: जो काही टक्का वाढला आहे तो काही फार मोठ्या अंतराचा अगर फरकाचा आहे, असेही नाही. कालमानानुसारची नैसर्गिक वाढ म्हणून त्याकडे बघता यावे. त्यामुळे त्यातून नकारात्मकतेचा संकेत घेता येऊ नये. सत्ताधाऱ्यांची चुकीची वा फसलेली धोरणे, जनतेचा भ्रमनिरास आदी कारणांतून जो परिणाम व्हायचा तो मतदानाचा टक्का जिथे वाढला नाही तिथेही झाला असेलच. परंतु सरसकटपणे तशा गृहीतकावर आकडेमोड करता येऊ नये. येथे आणखी एक बाब लक्षात घेता येणारी आहे ती म्हणजे, रिंगणात दोन बलाढ्य उमेदवारांसोबत अन्य अतिशय कमकुवत उमेदवार असतात तेव्हा थेट नफा-नुकसानीचे गणित मांडणे तुलनेने सोपे असते. यंदा मते खाण्याची क्षमता असणारे अनेक ठिकाणी रिंगणात होते. काही तर हेतुत: तेवढ्याकरिताच उमेदवारी दिली गेलेले होते. त्यामुळे मतदानवाढीने कुणाची गणिते घडण्याचा अंदाज बांधताना, विभाजित होणाऱ्या मतांमुळे जी समीकरणे बिघडणार आहेत ती अधिक महत्त्वाची ठरावीत. तात्पर्य इतकेच की, मतदानाचा टक्का वाढलेल्या सर्वच ठिकाणी परिवर्तनाच्या अपेक्षा करता येऊ नयेत.  

Web Title: What is the advantage of the increase of voting?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.