चित्त्यांच्या संवर्धनातील अडथळे काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 08:12 AM2020-01-30T08:12:30+5:302020-01-30T08:15:02+5:30
१९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिला पशू जो नामशेष झाला तो आहे चित्ता. तो आता आफ्रिकेतच सापडतो व आशियाई चित्त्याचे काही प्रमाणात स्वरूप इराणमध्ये अस्तित्वात आहे.
- राजू नायक
देशात दुर्मिळ झालेला चित्ता आफ्रिकेतून येथे आणून त्याची जात वाढू देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिल्याने देशात एका नव्या प्रयोगाची सुरुवात लवकरच होऊ शकते. मध्य प्रदेशातील काही भागात तो आणून ‘स्थायिक’ करण्यासाठी प्रयत्न चालू होते व तत्कालीन पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी त्यासाठी काही उपायही सुचविले होते. त्या प्रयत्नांना पाठबळ मिळू शकेल.
१९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिला पशू जो नामशेष झाला तो आहे चित्ता. तो आता आफ्रिकेतच सापडतो व आशियाई चित्त्याचे काही प्रमाणात स्वरूप इराणमध्ये अस्तित्वात आहे. वसाहतवादी काळात शेतकरी; विशेषत: धनगरांनी २००वर चित्त्यांची शिकार केली; परंतु अनेक राजे-महाराजांनी आपल्या शिकारीच्या छंदापायी चित्ते पाळले होते, जे रानातील हरणे पकडण्याचे काम करायचे. असे अनेक व्हिडीओ सध्या उपलब्ध आहेत. असे सांगतात, की अकबर बादशहाच्या ‘तबेल्यात’ असे एक हजार चित्ते पाळलेले होते. त्यामुळे चित्ते नामशेष झाले नाहीत तरच नवल.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे जर हा देखणा पशू देशात पुन्हा पुनरुज्जीवित केला जाऊ शकला, तर प्राणिप्रेमींना त्याचा आनंदच होईल. केंद्रीय राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानेच सर्वोच्च न्यायालयात त्या संदर्भात अर्ज केला होता. ही संस्थाच आता त्यासाठी पुढाकार घेईल व त्यांच्यासाठी जागेची निश्चिती करेल; जेथे चित्त्यांना सावज सापडतील व मानव-वन्य पशू संघर्षही टाळता येईल. त्यासाठी मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर अभयारण्य, गुजरातमधील वेलवदार राष्ट्रीय उद्यान व राजस्थानातील ताल छपार अभयारण्यांचा विचार चालू आहे.
गेली १० वर्षे चित्त्यांच्या संवर्धनासाठी देशात प्रयत्न चालू असले तरी १९७० च्या दशकातही त्यासाठी प्रयत्न केले होते व इराणी चित्त्यांना येथे आणण्यासाठी उपाय योजण्यात येत होते. आशियाई चित्त्याची एक जात इराणात नांदते; परंतु त्यांचीही तेथील संख्या ५० पेक्षा कमीच आहे. दुर्दैवाने या प्रयत्नांना इस्लामी क्रांतीनंतर १९७९ मध्ये खीळ बसली. सध्या आफ्रिकेतून चित्ते आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.
संवर्धनप्रेमींच्या या प्रयत्नांना सर्वच पर्यावरणवाद्यांचा पाठिंबा मिळतोय, असे नव्हे. चित्त्यांच्या जाती-पोटजातींवरून व त्यांना येथे आणून नांदविणे योग्य ठरेल का, याबाबतीत वाद आहेत. हा प्रकार आफ्रिकेतील एका सिंहाला युरोपमधील प्राणिसंग्रहालयात ठेवण्याजोगा असेल; त्यांना तेथे आणून बंदिस्त जागेत ठेवावे लागेल, त्यांना बाहेरच्या मुक्त वातावरणात नांदते ठेवण्यात अडचणी येतील, असे तज्ज्ञ मानतात.
काही कार्यकर्ते मानतात की चित्त्यांचे संवर्धन करण्यासाठी लागणारी विस्तृत जंगले आपल्याकडे नाहीत; तेथे त्यांना योग्य प्रमाणात सावजही सापडले पाहिजे. मुख्य म्हणजे असे भाग असले पाहिजेत, जेथे चित्त्यांची वंशवेल वाढली पाहिजे; जेव्हा आपल्याकडे वाघांच्याच संख्येवर नियंत्रण येते व लोक त्यांच्या संवर्धनाआड येऊ लागले आहेत. टांझानियातील सेरेंगेटी राष्ट्रीय उद्यानाचेच क्षेत्रफळ १४ हजार ७५० चौ.किमी. असून तेथे त्यांच्यासाठी मोठय़ा प्रमाणात सावज उपलब्ध असते. त्या उलट गोव्यासारख्या राज्यात नव्यानेच वाघ येऊ लागले व आमच्याकडे पाच वाघ आहेत, याचा पर्यावरणवाद्यांना आनंद वाटत असतानाच धनगरांनी त्यातील चार वाघांची हत्या केली. त्यामुळे व्याघ्र संवर्धन प्रकल्पाबाबतच संशय निर्माण झाला.
देशात वाघांची संख्या वाढत असल्याचा एक निष्कर्ष अलीकडेच प्रसिद्ध झालेला असला तरी सिंहाच्या बाबतीत असे म्हणता येणार नाही. १९५०मध्ये उत्तर प्रदेशच्या चंद्रप्रभा संरक्षित अरण्यात सिंहाचे संवर्धन करण्याचा प्रकल्प राबविण्यात आला, परंतु सध्या येथून सिंह संपूर्ण नामशेष झाला आहे. गुजरातच्या गिर अभयारण्यात २०१९ च्या उन्हाळ्यात रोगराईमुळे २०० सिहांचा मृत्यू झाला होता.
काही तज्ज्ञांचे असेही मत आहे की चित्ता आणणे हा भारताचा अग्रक्रम नाही. हा प्राणी भारतात आणला तर इतर दुर्मिळ प्राण्यांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होण्याची भीती आहे. इतर काहीजण मानतात की चित्ता हा अत्यंत दुर्मिळ प्राणी मानला जातो व त्याला नवीन प्रदेशात रुजविण्याचा प्रयत्न खूपच यशस्वी होऊ शकतो. नवीन भागात त्याला सावज तयार करण्याच्या प्रयत्नांमध्ये जंगलांचेही संवर्धन होईल. देशात सध्या वन्य पशूंबद्दल उत्सुकता वाढली असल्याने पर्यटनातही वाढ झाली आहे. त्यामुळे अशा प्राण्यांबद्दल जागरूकताही वाढू लागली आहे. भारतात त्यांच्या संवर्धन व संरक्षणासंदर्भात कडक कायदे असावेत, यासाठी मागणीही वाढत आहे.