रस्त्यावर खड्ड्यांच्या साम्राज्याची नेमकी कारणं काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 10:36 AM2022-08-17T10:36:19+5:302022-08-17T10:48:35+5:30
हजारो किलोमीटर रस्त्यांचे निरीक्षण करून आम्ही त्यावरचे ‘ब्लॅक स्पॉट’ शोधले आणि ‘नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया’ या राज्यांच्या रस्ता प्राधिकरणाकडून ते दुरुस्त करून घेतले.
‘सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या संचालक रंजना अग्रवाल यांच्याशी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेली बातचित...
भारतातील रस्त्यांना ‘मौत का कुंआ’ का मानले जाते? आपले रस्ते सुरक्षित कसे करता येतील?
रस्ते या विषयावर संशोधन करणारी केवळ देशातली नाही तर जगातली एकमेव अशी आमची संस्था आहे. या संस्थेतही रस्त्यांचा आराखडा आणि सुरक्षेसंबंधी स्वतंत्र विभाग आहे. त्यातही आम्ही प्रशिक्षण देतो आणि परीक्षण करतो. हजारो किलोमीटर रस्त्यांचे निरीक्षण करून आम्ही त्यावरचे ‘ब्लॅक स्पॉट’ शोधले आणि ‘नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया’ या राज्यांच्या रस्ता प्राधिकरणाकडून ते दुरुस्त करून घेतले.
रस्त्यांचे हे ऑडिट आपल्याकडून कोण करून घेते? आणि आपण दिलेल्या अहवालावर काही कार्यवाही होते का?
जास्त करून ‘नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया’ आम्हाला हे ऑडिट करायला सांगते. आम्ही आमचा अहवाल त्यांना देतो. पुष्कळ वेळा ‘सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट’ही असे ऑडिट करायला सांगते. आमच्या अहवालावर कार्यवाही होते. यावर सीबीआयची चौकशीही झाली आहे. हे ऑडिट दोन प्रकारचे असते. पहिले म्हणजे स्ट्रक्चरल ऑडिट ज्यात रस्ता बांधण्याची गुणवत्ता तपासली जाते आणि दुसरे रस्ता सुरक्षा परीक्षण म्हणजे, रस्ता सुरक्षित आहे की नाही, हे पाहणे.
कोणत्याही रस्त्याची गुणवत्ता आणि सुरक्षेचे ऑडिट तुमचे तुम्ही करू शकता का?
नाही. आम्ही काही पोलिसांसारखी संस्था नाही जी कुठल्याही रस्त्याची गुणवत्ता तपासू शकेल. एनएचएआईसारखी संस्था जेव्हा आम्हाला तपासणी करायला सांगते, तेव्हाच आम्ही तपासणी करतो. त्यासाठी शुल्क घेतो. सडक तपासनिसांचे प्रशिक्षणही आम्ही करतो. त्यामध्ये वर्गातल्या पाठांबरोबर क्षेत्रीय प्रशिक्षणही समाविष्ट असते.
परंतु, रस्ता तयार झाल्यावर वर्षाच्या आतच त्यावर खड्डे का पडतात? आपले तंत्रज्ञान कमी पडते की इमानदारी?
तंत्रज्ञान कमी पडते असे तर मी म्हणणार नाही. रस्ता तयार करण्याचे सर्व तंत्र तपासले गेलेले बरोबर ठरवलेले असते. खरंय, आपण प्रत्येक गोष्ट इमानदारी आणि निष्ठेने का करू शकत नाही? अजून काही कारणं म्हणजे शहरं आणि गावात रस्त्यांच्या बाजूला पाणी वाहून जाण्याची ठीक व्यवस्था न झाल्यानेही रस्ते खराब होतात. अतिक्रमणांमुळे नाले तुंबतात आणि रस्त्यावर पाणी भरते यात रस्ते निर्माण करणाऱ्याऐवजी नगरपालिकांची जबाबदारी असते
वाहनात मर्यादेपेक्षा जास्त वजन भरल्याने रस्ते खराब होतात का?
एकदम बरोबर. आपले रस्ते १०.५ टन एक्सल वजनासाठी तयार होतात. आता दोनच दिवसांपूर्वी झालेल्या एका अभ्यासात आमच्या लक्षात आले की, बहुतेक रस्त्यांवर २४ टन एक्सल वजनाची वाहने ये-जा करतात. त्यामुळे रस्ते कुठे ना कुठे दबतात. तर काही ठिकाणी वर येतात. त्या ठिकाणी पाणी भरते आणि त्यामुळे खड्डे तयार होतात.
टोल प्लाझावर आपण वेग मोजण्याची यंत्रे लावली आहेत. तशी वजन मोजण्याचे यंत्र लावू शकत नाही का?
आपले म्हणणे बरोबर आहे. असे केले तर ओव्हरलोडिंग वर थोडाफार वचक बसेल. आता पोलादाच्या मळीपासून (स्लॅग) तयार होणारे रस्ते तयार केले जात आहेत. त्यांच्यात अधिक वजन साहण्याची क्षमता आहे. जास्त पाऊस झाला, तरी त्या रस्त्यांवर परिणाम होत नाही. काही ठिकाणी प्लास्टिक वापरूनही रस्ते तयार केले जात आहेत.
पोलादाच्या मळीपासून तयार होणारे रस्ते तयार करण्याचे तंत्र परीक्षणाच्या पातळीवर आहे काय?
गुजरातमधील हजिरा ते सुरत हा रस्ता अवजड वाहनांची ये-जा होत असल्याने कायम खराब होत असे. त्याचा एक किलोमीटरचा भाग आम्ही पूर्णपणे पोलादाच्या मळीपासून तयार केला. त्या रस्त्याचे सर्व प्रकारचे परीक्षण झाले आहे. २८ टन एक्सल वजन साहण्याची क्षमता त्यात आढळली.
याव्यतिरिक्त आपली संस्था काही संशोधन करत आहे काय?
धान आणि गहू कापल्यावर उरणाऱ्या पाचटाची विल्हेवाट लावण्यासाठी आम्ही तंत्र विकसित करत आहोत. पाचट अधिक तापमानात नेऊन चारकोलप्रमाणे इंधन म्हणून वापरण्यास योग्य करण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यातून बायो इथेनॉल आणि बायो बिटूमेन तयार करतो आहोत. सध्या आम्ही या तंत्रज्ञानाचे उत्पादन करण्यात येणाऱ्या खर्चाचे विश्लेषण करत आहोत. टाकाऊ पाचटाचा व्यापारी स्वरूपाचा वापर पुढच्या सहा महिन्यांत होऊ लागेल.