जैवविविधता म्हणजे काय रे भाऊ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 02:37 AM2017-12-25T02:37:42+5:302017-12-25T02:37:47+5:30
औरंगाबादेत एकमेव असलेला पाणथळी तलाव पर्यावरणासाठी म्हणून काय बंद ठेवायचा? अशा नैसर्गिक ‘आॅक्सिजन हब’ची आम्हाला थोडीच गरज आहे?
औरंगाबादेत एकमेव असलेला पाणथळी तलाव पर्यावरणासाठी म्हणून काय बंद ठेवायचा? अशा नैसर्गिक ‘आॅक्सिजन हब’ची आम्हाला थोडीच गरज आहे? दिल्लीत एवढे प्रदूषण असतानाही तो मिळतोच की. वेळ आलीच तर आॅक्सिजनच्या टाक्या विकत घेऊन आम्ही ती गरज भागवू; पण कोट्यवधींचा खर्च या सरोवराच्या पर्यटनातूनच उभा करू... महापौरांना असेच वाटत असेल, तर बिघडले कुठे?
औरंगाबादेत जैवविविधतेने संपन्न असलेले सलीम अली सरोवर लवकरच शहरातील आकर्षक पर्यटन केंद्र होणार आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी फौजफाट्यासह दोन दिवसांपूर्वी या सरोवराची पाहणी केली. सरोवराच्या सौंदर्यीकरणावर पालिकेकडून दीड कोटी रुपये खर्चूनही ते खुले करता आले नाही, ही सल त्यांना बोचत असावी कदाचित. त्यामुळेच औरंगाबाद खंडपीठाने या सरोवराचे दरवाजे दोन वर्षांपूर्वी बंद केले असले तरी लवकरच ते खुले करू, अशी घोषणा महापौरांनी करून टाकली. ते चुकले कसे म्हणता येईल? जैवविविधता म्हणजे काय रे भाऊ? या सरोवरात १६ प्रकारची झाडे, ११ प्रकारची काटेरी झुडपे, आठ प्रकारच्या वेली, ३२ प्रकारच्या औषधी वनस्पती, १० प्रकारची शेवाळे, १२ प्रकारच्या जलवनौषधी, १०२ प्रकारचे कीटक, नऊ प्रकारचे मासे, आठ प्रकारच्या सापांसह १५ प्रकारचे सरपटणारे प्राणी, पाच प्रकारचे उभयचर प्राणी, सात प्रकारचे सस्तन प्राणी, २३ प्रकारची फुलपाखरे आढळतात, तसेच तब्बल ८२ प्रकारचे देशी-विदेशी पक्षीही दिसतात. जलपर्णीमुळे कीटक, जलचर प्राण्यांचे येथे वास्तव्य असते. तेच या पक्ष्यांचे मुख्य खाद्य आहे. म्हणून काय हे सरोवर कायमचे बंद ठेवायचे? पर्यटनातून भरपूर पैसा मिळू शकतो, एवढेच आम्हाला ठाऊक. २०१४ साली जुलै महिन्यात महापालिकेने उच्च न्यायालयात खोटे शपथपत्र दाखल करून हे सरोवर खुले केले. जैवविविधता समितीची परवानगी न घेताच परवानगी घेतल्याचा दावा केला. सरोवराच्या सौंदर्यीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च केले. एवढा खटाटोप केल्यानंतर न्यायालयाचा आदेश म्हणून हे सरोवर बंद कसे ठेवायचे? एवढ्यावरच काय आम्ही हार मानायची? सलीम अली सरोवर म्हणजे पक्ष्यांसाठी नंदनवन आहे, कबूल. येथे दरवर्षी हजारोंच्या संख्येने विदेशी पक्षी येत असतात, हेही कबूल. येथे नागरिकांचा वावर वाढल्यास हे परदेशी पाहुणे येणार नाहीत, असे सलीम अली सरोवर समितीचे म्हणणे आहे. या समितीला फक्त पक्ष्यांचे आणि निसर्गाचेच कल्याण दिसते. आम्हा माणसांचे आणि आमच्या पोटापाण्याचे काय? १६१० ते १६१६ या सहा वर्षांच्या कालावधीत मलिक अंबरने या ओसाड शहरात पाणीपुरवठ्याची योजना राबविली. खाम नदीचे वाहून जाणारे पाणी अडवून अंबरी तलाव उभारला. पुढे पक्षिमित्र सलीम अली यांनी या तलावाला भेट दिली आणि सलीम अली तलाव म्हणून तो ओळखला जाऊ लागला. असा हा ऐतिहासिक व शहरात एकमेव असलेला पाणथळी तलाव पर्यावरणासाठी म्हणून काय बंद ठेवायचा? अशा नैसर्गिक ‘आॅक्सिजन हब’ची आम्हाला थोडीच गरज आहे? आॅक्सिजन काय, कसाही मिळेल. दिल्लीत एवढे प्रदूषण असतानाही तो मिळतोच की. मग आम्हीच का चिंता करायची. वेळ आलीच तर आॅक्सिजनच्या टाक्या विकत घेऊन आम्ही ती गरज भागवू; पण कोट्यवधींचा खर्च या सरोवराच्या पर्यटनातूनच उभा करू... महापौरांना असेच वाटत असेल, तर बिघडले कुठे?