आजसे कोई भी घरसे बाहर नही निकलेगा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 05:29 AM2022-03-24T05:29:07+5:302022-03-24T05:29:23+5:30

..दोनच वर्षांपूर्वी हे वाक्य उच्चारताच अख्खा देश दाराआड कोंडला गेला होता. परिस्थितीने एवढा सणसणीत रट्टा हाणला आपल्या पाठीत, त्यानंतर काय बदलले?

what covid 19 pandemic and lockdown taught us | आजसे कोई भी घरसे बाहर नही निकलेगा...

आजसे कोई भी घरसे बाहर नही निकलेगा...

Next

- वंदना अत्रे, मुक्त पत्रकार

खरेच करता येतात का हिशोब आयुष्यात वाट्याला येणाऱ्या अनुभवाचे? किती माणसे उचलली या आजाराने? किती लोकांच्या नोकऱ्यांवर टाच आली? शहर सोडून पुन्हा आपल्या गावाच्या आश्रयाला गेलेली माणसे, घसरलेले राष्ट्रीय उत्पादन, चढलेली महागाई, देशभरात दिल्या गेलेल्या लसी या प्रश्नांची उत्तरे मिळवली. गोळाबेरीज केल्यावर हाती येणारे उत्तर म्हणजे कोरोनाने आपल्याला शिकवलेले शहाणपण? 

तसे असेल तर सुरू असलेली शाळा सोडून पुन्हा बकऱ्यांच्या मागे जावे लागलेल्या खेड्यातील, गावाकडील मुलींचे काय? खाणाऱ्या तोंडापासून सुटका व्हावी म्हणून उरकलेले बालविवाह, दवाखान्यात एकाकी असताना निरोप घेतलेल्या आप्ताला कोणा परक्याच्या हाताने सरणावर ठेवावे लागले म्हणून कुरतडत मेंदूचा भुगा करणारे दुःख, अचानक सुचलेल्या आणि फोफावलेल्या एखाद्या व्यवसायाचा आनंद, आवर्जून लॅपटॉपच्या छोट्या पडद्यावर प्रथमच आप्तांशी झालेल्या गप्पांची नवलाई हे सगळे कोणत्या खात्यात टाकायचे?.. 

रोजचे साधेसुधे जिणे सुरु असतांना अकस्मात पाण्याची एखादी अजस्त्र लाट यावी आणि लवलवत्या जिभेने तिने जे समोर येईल ते गिळंकृत करत सुटावे, असा अनुभव जेव्हा एकाचवेळी सगळ्या जगाच्या वाट्याला येतो तेव्हा येणारे भांबावलेपण अजून प्रत्येकाच्या जगण्याला कळत नकळत व्यापून आहे.  
काय कमावले आणि काय गमावले आपण असा हिशोब करता येऊ शकेल का?  मुळात प्रश्न हा  की, असे निष्कर्ष काढण्याची घाई काय आहे आपल्याला? भविष्याची अशी कोणती आखणी करणार आहोत आपण त्यातून?



दोन वर्षांपूर्वी एकाएकी आपल्या सर्वांच्या आयुष्यात आलेल्या संपूर्ण टाळेबंदीकडे आज वळून बघत असतांना कितीतरी परस्परविरोधी गोष्टी दिसू लागतात..

 एकीकडे तंत्रज्ञानाच्या मदतीने हवी ती गोष्ट हवी तेव्हा घरापर्यंत आणता येते, अशी फुशारकी मारणारा माणूस...   कोरोना नावाची त्सुनामी दाराच्या उंबऱ्यापर्यंत आली तरी हे प्रगत तंत्रज्ञान  त्याची चाहुल मात्र देऊ शकले नाही. कोरोनाचा संसर्ग, त्याचा वेग आणि आक्रमकता, त्यावरील उपाय हे सगळे समजून घेता - घेता कोण धांदल उडाली माणसाची! विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्या मदतीने जे हवे ते आपल्याला मिळवता येते हे जसे आपल्याला समजू लागले तसे आपले सर्वांचेच आयुष्य सोपे होण्याच्या ऐवजी अधिक गुंतागुंतीचे होत गेले. 

- कारण नेमके काय आणि किती मिळवायचे आहे, त्यासाठी कोणती किंमत द्यायची आहे आणि ते मिळवत असताना रोज नव्याने समोर येणाऱ्या नव्या आमिषांचे, मोहाचे काय करायचे आहे, यावर विचार करायला आपल्याला अवधीच मिळाला नव्हता. इतर अनेक प्राण्यांप्रमाणे आपण या निसर्गाचा एक भाग आहोत आणि त्यामुळे त्याच्यावर आपली तेवढीच सत्ता आहे, हे आपल्याला कोणी सांगितले नाही, की सांगणाऱ्या शहाण्या माणसाचा आवाज आपल्याला कानावर पडला नाही? आणि मग एकाएकी, परिस्थिती हाताबाहेर जाते आहे जाणीव होऊ लागल्यावर उत्तरांच्या शोधासाठी आपल्या ज्ञानातून, तपश्चर्येतून पूर्वजांनी मिळवलेल्या शहाणीवेकडे वळण्याचे भान आपल्याला आले...! पण तेही तात्पुरते आहे असे वाटावे, असे आज भोवताली बघताना दिसते!

कणा मोडून जावा असा एखादा रट्टा जेव्हा परिस्थिती पाठीत हाणते तेव्हा जगणे आरपार बदलून जाते, प्राधान्य बदलते, एकमेकांशी वागण्याचे नियम आणि पद्धती बदलतात आणि माणसे एका नव्या समजुतीने जगण्याला सामोरी जाऊ लागतात... या महामारीच्या रूपाने परिस्थितीने जगाच्या पाठीत असाच सणसणीत तडाखा हाणला आहे. पण, त्यातून बाहेर पडण्याची फट मिळताच माणसे अशा तऱ्हेने पुन्हा जीवनाला भिडली की, जणू काल एखादे भयानक दुःस्वप्न पडले होते, याचा विसर पडावा! या संकटातून बाहेर पडल्याचा आनंद नवे उपभोग घेत साजरा करणाऱ्या माणसांना खरच अजूनही आपल्या आसपास रेंगाळत असलेल्या त्या कराल सावलीचा विसर पडलाय की काय? का आयुष्य क्षणभंगूर आहे याची जाणीव झाल्याने तो नव्याने उपभोगाच्या वाटेला लागला आहे?

कोरोनाने आक्रमकपणे आपल्याला ओरबाडून आपले सर्वस्व उतरवले. त्याच्या खुणा अजून अंगाखांद्यावर आहेत. त्या आपण समजून घेणार की नाही? निसर्ग आणि माणसे यांच्याशी असलेले आपले नाते बदलणार की नाही? भविष्य आणि पुढील पिढ्या यांच्यासाठी अधिक जबाबदारीने वागणार की नाही? 
- आज टाळेबंदीला दोन वर्षे होत असताना हे करू शकणार का आपण?
vratre@gmail.com

Web Title: what covid 19 pandemic and lockdown taught us

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.