नरेंद्र मोदींनी देशाला काय दिले?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 12:47 AM2020-09-09T00:47:05+5:302020-09-09T00:47:16+5:30
येत्या १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आयुष्याची ७० वर्षे पूर्ण करून एकाहत्तरीत प्रवेश करतील.
-डॉ. विनय सहस्रबुद्धे
येत्या १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आयुष्याची ७० वर्षे पूर्ण करून एकाहत्तरीत प्रवेश करतील. अलीकडेच देशात सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिलेले पहिले काँग्रेसेतर नेते म्हणूनही त्यांच्या कार्यकाळाची नोंद झाली. नेतृत्वक्षमतेची पहिली आवश्यकता असते ती म्हणजे निर्णयक्षमता. निश्चित ध्येय डोळ्यसमोर ठेवून योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता म्हणजेच निर्णायकता. निर्णय घेण्याची जबाबदारी ज्यांच्यावर असते त्यांच्याकडे राजकीय इच्छाशक्ती असावी लागते. अशा इच्छाशक्तीचे एक महत्त्वाचे उगमस्थान म्हणजे जे आपण करतो आहोत त्याबद्दलच्या ठाम आकलनातून येणारे नीतिधैर्य ! यालाच इंग्रजीत ‘करेज आॅफ कन्विकशन’ असा अधिक अर्थवाही शब्द आहे. मोदींकडे हे नीतिधैर्य मोठ्या प्रमाणात आहे याचे कारण आपण राजकारणात वा सत्ताकारणात कशासाठी आहोत हे ते नीटपणे जाणतात !
वस्तू आणि सेवाकराची दीर्घकाळ प्रलंबित आर्थिक सुधारणा असो, अथवा ३७०व्या कलमाच्या चौकटीतून जम्मू-काश्मीर आणि लडाखची मुक्तता असो; राष्ट्रीयीकृत बँकांच्या सामिलीकरणाचा विषय असो अथवा संसदेच्या अधिवेशनाचे वेळापत्रक बदलून शासकीय खर्चासाठी १२ महिन्यांचा पूर्ण कालावधी उपलब्ध होईल हे सुनिश्चित करण्याचा मुद्दा असो, नरेंद्र मोदींच्या निर्णयक्षमतेची ताकद अफाट आहे. जनादेश मिळावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, मेहनत करावी; पण जनादेश मिळाल्यानंतर न डगमगता लोकहिताचे निर्णय घेत पुढे जावे ही नरेंद्र मोदींची वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैली आहे.
तब्बल चौतीस वर्षांनंतर देशाला काळानुरूप आवश्यक असलेले शैक्षणिक धोरण तयार करणे, कालबाह्य झालेली नियोजन आयोगाची संकल्पना टाकून देऊन त्याजागी नीती नीती आयोगाची स्थापना करणे, विकासाच्या राजनयनाला मुख्य प्रवाहात आणून आंतरराष्ट्रीय सौर संघटन स्थापन करून त्याचे मुख्यालय गुरुग्रामी स्थापन करणे, दमण-दीव व दादरानगर हवेली या दोन केंद्रशासित प्रदेशांना परस्परात विलीन करून प्रशासकीय सुलभता आणि काटकसर हे दोन्ही साधणे असे अनेक निर्णय ही त्यांचा निर्णायकतेची उदाहरणे आहेत. स्थापित हितसंबंध उद्ध्वस्त करून लोकहिताचा निर्णय नेटाने पुढे नेण्यासंदर्भात नरेंद्र मोदी यांनी केलेले काम विशेष उल्लेखनीय आहे.
शेतीमालाच्या विक्रीसंदर्भात मूठभर मंडळींची जी ‘बाजारशाही’ गरीब, छोट्या शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत होती, ती उद्ध्वस्त करणाºया अनेक सुधारणांचे श्रेय मोदी सरकारचे आहे. दिल्लीतील तीन मूर्ती भवन हे आतापर्यंत फक्त पं. नेहरूंचे वस्तुसंग्रहालय होते. आता ते देशातील सर्व माजी पंतप्रधानांचे वस्तुसंग्रहालय म्हणून आकाराला आणण्याचा महत्त्वाकांक्षी; पण तितकाच लोकतांत्रिक निर्णय घेण्याचे साहसही पंतप्रधानांनी दाखविले आहे. देशाच्या मानबिंदूविषयीच्या राष्ट्रीय कृतज्ञतेचे हे अतिशय स्वागतार्ह लोकशाहीकरण म्हणायला हवे.
लोकशाही शासन प्रणालीत लोकभावनेची बाजू राखणे आणि लोकमतापुढे सपशेल लोटांगण घालून लोकानुरंजनाचा सोपा मार्ग स्वीकारणे यातील भेदरेषा अस्पष्ट असल्याचा लाभ अनेकदा घेतला जातो. नरेंद्र मोदींनी हे होऊ दिले नाही. महिलांवरील अत्याचारांचा प्रश्न हा मुलींच्या सुरक्षिततेचा जेवढा आहे तेवढाच तो मुलांच्या म्हणजे पुरुषांच्या अनिर्बंध स्वैराचारी प्रवृत्तीचाही आहे हे थेट सांगण्यात पंतप्रधान कचरले नाहीत. दोन दिवसांपूर्वी, शिक्षण धोरणाची चर्चा करताना आतापर्यंत आपल्या देशात ‘‘विचार कोणता करायचा’’ हे सांगितले गेले, पण ‘‘विचार कसा करायचा’’ हे सांगण्यावर भर नव्हता, हे परखडपणे सांगण्यात त्यांनी संकोच केला नाही.
संतुलनाची दृष्टी आणि समन्यायाची भूमिका, हेही मोदींच्या विचारव्यूहाचे वैशिष्ट्य म्हणायला हवे. अन्य मागासवर्गीयांसाठीच्या आयोगाला संवैधानिक आरक्षण व्यवस्थेत सामावून घेण्याचे महत्त्वाचे निर्णय त्यांच्याच काळात घेतले गेले. अटलजींनी सुवर्ण चतुष्कोेनाच्या माध्यमातून महामार्गांचे जाळे विणले. नरेंद्र मोदी सागर-माला प्रकल्पाद्वारे बंदर विकास आणि सागरी व नदी मार्गातील वाहतुकीला गती देत आहेत. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ आणि ‘स्वच्छ भारत’सारख्या अभियानातून नरेंद्र मोदींनी विकास संकल्पनेची अभियानातून सामाजिक न्यायाशी सांगड घातली आहे. कृषी खात्याला किसान-कल्याण विभागाची जोड आणि जलसंसाधनाचे आणखी व्यापक अशा जलशक्तीत रूपांतर हेही त्यांच्या शासनदृष्टीचे दोन उल्लेखनीय पैलू म्हणायला हवेत.
सर्वाधिक मागास जिल्ह्यांना ‘आकांक्षावान जिल्हे’ मानून त्यांनी अंत्योदयाची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचा संकेत केला आहे. पूर्वीपासून त्यांच्या ठायी असलेली शिकण्याची, नवीन काही जाणून घेण्याची, नव कल्पनांना प्रोत्साहन देण्याची प्रवृत्ती आजही टिकून आहे. त्यांची धडपड खºयाअर्थाने देशाला सुशासन आणि विकासाच्या मार्गाने घेऊन जाण्याची आहे. ‘यशामुळे हुरळून जाऊन नाचू नका, हा संदेश ते प्रत्यक्षात उतरवितात. देशाच्या राजकारणात व लोकतांत्रिक शासन पद्धतीत नरेंद्र मोदींनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांची निष्ठा आणि त्यांच्या प्रेरणेची पवित्रता याबद्दल प्रश्नचिन्हे उभी करण्याचे प्रयत्न ना आतापर्यंत कधी यशस्वी झाले, ना पुढे कधी होतील, कारण ‘मातृभूमी अर्चनाका एक छोटा उपकरण हूँ’ ही त्यांची भावना अबाधित आहे.