जगन्नाथाच्या रथयात्रेतून कोणता बोध घ्यायला हवा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 05:52 AM2018-07-26T05:52:24+5:302018-07-26T05:53:00+5:30
एखादा मोठा उत्सव समाप्त झाल्यावर त्याविषयी चिंतन करणे हे चांगलेच असते. मग तो दीपोत्सव असो, नवरात्रोत्सव असो की रथोत्सव असो.
- जवाहर सरकार
पुरीची रथयात्रा सफल संपूर्ण झाली आहे. या रथयात्रेचे स्मरण करण्याशिवाय त्यापासून आपल्याला कोणता लाभ होतो? प्रत्येकाला त्या यात्रेत सहभागी होता येत नसले तरी टी.व्ही.वरून त्या रथयात्रेचे दर्शन करून किंवा त्याविषयीचा वृत्तांत वृत्तपत्रातून वाचून प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या रथयात्रेविषयी कल्पना करीत असते. या रथयात्रेतून मंदिरातील जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रेच्या मूर्ती बाहेर मिरविण्यात येतात आणि त्या पुन्हा मंदिरात ठेवण्यात येतात. त्यानंतर एका वर्षानेच त्या पुन्हा बाहेर दर्शनासाठी काढण्यात येतात. तोपर्यंत लोक प्रतीक्षा करतात. याशिवाय आणखी काय होते?
एखादा मोठा उत्सव समाप्त झाल्यावर त्याविषयी चिंतन करणे हे चांगलेच असते. मग तो दीपोत्सव असो, नवरात्रोत्सव असो की रथोत्सव असो. उत्सवाच्या काळात आपण धार्मिक अनुष्ठान करण्यात व्यग्र असतो. तसेच सामाजिक समरसतेचा अनुभव घेत असतो. त्यामुळे या सण वा उत्सवापासून आपल्याला काय लाभ होतो याचा विचार करण्यासाठी आपल्याला वेळच नसतो. पण सध्यातरी रथयात्रेचा प्रभाव आपल्या अंत:करणात ताजा आहे. त्यामुळे त्यासंबंधी विचार करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. भारताच्या चिरंतनत्वाचा विचार करण्यासाठी या उत्सवांचे योगदान महत्त्वाचे आहे.
या उत्सवांविषयी विचार करताना आपण अलिप्तपणे विचार करण्याची गरज आहे. आपण त्यात प्रत्यक्ष सहभागी जरी होऊ शकलो नसलो, तरी त्याचा विचार करण्याची ही एक मोठीच संधी आपल्याला मिळत असते. मानवाधिकाराचा जसा मॅग्नाकार्टा असतो तसाच या उत्सवांचा इतिहास साऱ्या समाजाला एका सूत्रात गुंफण्याचा असतो. हिंदूंच्या सणांचा विचार केला तर हे सण भारतीयांच्या उदार मनाचा प्रत्यय देत असतात. हिंदुत्वाची जी प्रतिज्ञा असते ती या सणांच्या वार्षिक अनुष्ठानातून प्रकट होत असते. त्यादृष्टीने विचार करता जगन्नाथ रथयात्रा हे भारतीय समाजाच्या समरसतेचे जिवंत उदाहरण आहे. गेली ८०० वर्षांपासून ही रथयात्रा अव्याहतपणे सुरू असून त्यात सर्व जातीचे लोक सहभागी होत असतात.
भगवान जगन्नाथाची मूर्ती लाकडाची असून तिला हात वा पाय नाहीत. ती मूर्ती आपल्याला जाणीव करून देते की आपल्या पूर्वजांनी धर्माला एखाद्या चौकटीत बंदिस्त केलेले नाही. तसेच देवता ही कोणत्याही स्वरूपात असू शकते ही भावना लोकमानसात ठळकपणे बिंबवीत असते.
भक्तीची गंगा उत्तर भारतात प्रवाहित होण्यापूर्वी भगवान जगन्नाथाच्या पौराणिक कथांनी ओडिशातील तळागाळापासून तर उच्च वर्गीयांपर्यंत सर्वांना एका सूत्रात बांधण्याचे काम केले आहे. हिंदू धर्मात चार धामांमध्ये जगन्नाथ पुरीचाही समावेश करण्यात आला आहे. आदिशंकराचार्यांनी याची स्थापना केली होती असे सांगण्यात येते. या मंदिराविषयी दोन गोष्टी सांगितल्या जातात. बहुतेक मंदिरातील मूर्ती या प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्याचा दावा करण्यात येत असतो. पण पुरीचे वैशिष्ट्य हे आहे की येथील मूर्ती विशिष्ट कालावधीत कडुलिंबाच्या खोडापासून साकारण्यात येतात. दुसरे वैशिष्ट्य हे की कोणत्याही प्राचीन मंदिरातील मूर्ती या मंदिराबाहेर कधीच काढण्यात येत नाहीत. पण पुरीचे हे एकमात्र मंदिर आहे जेथील मूर्ती बाहेर काढून जनसमुदायात ठेवण्यात येतात. त्या देवतांच्या लोकप्रियतेचे हे द्योतक आहे. लोकांनी आपल्याकडे दर्शनासाठी यावे ही अपेक्षा येथे नाही तर त्या देवतांनाच लोकांमध्ये जाण्याची उत्सुकता आहे.
जगन्नाथपुरी येथे जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्ती रथात ठेवून ते रथ लोकांकडून ओढण्यात येतात. मूळ मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंडिचा मंदिरात त्या नेण्यात येतात. तेथून त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो.
संशोधकांसाठी हा संपूर्ण घटनाक्रम चिंतनाचा तसेच संशोधन करण्याचा आहे. या तºहेच्या धार्मिक उत्सवामुळे समाजातील विभिन्न घटक एकमेकांशी कसे जुळले जातात हेही पाहणे औत्सुक्याचे ठरेल. या सर्व गोष्टी परंपरेने चालत आल्या असून पुढेही चालत राहणार आहेत. पण काही रूढीवादी माणसे या उत्सवात काही गैरलोकतांत्रिक अडसर आणण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मूर्ती लाकडाची असो की दगडाची असो, त्यामुळे मूर्तीची लोकप्रियता निश्चित कमी होत नसते. त्या देवतेची जी असाधारण विशेषता असते, जी काळाच्या कसोटीवर टिकली असते आणि तीच जनमानसाला आकर्षित करीत असते. हिंदू धर्माची विशेषता याच तºहेच्या योजनेद्वारा प्रकट होत असते. पण धर्मातील कट्टरपंथीयांकडून तीच समाप्त करण्याचा प्रयत्न होत असतो हेही आपण लक्षात घ्यायला हवे. हिंदू समाजातील सहिष्णुतेची जाणीव समाप्त करून समाजाला असहिष्णू बनविण्याचा जो प्रयत्न होत आहे, तो समाजानेच हाणून पाडायला हवा आणि आपली सहिष्णू ही प्रतिमा जपायला हवी.
हिंदू धर्मात अनेक विरोधाभास बघायला मिळतात. पण या विरोधाभासातही रथयात्रेचे जे उत्कृष्ट प्रबंधन करण्यात येते ती क्षमता कायम राहिली आहे आणि तेच या रथयात्रेचे वैशिष्ट्य आहे. एकाच आकाशाच्या छताखाली सद्भावनेने एकत्र राहण्यासाठी या उत्सवाच्या माध्यमातून जी समरसता निर्माण होते ती आपण टिकवायला हवी. त्यातूनच या रथयात्रेचा उद्देश सफल होणार आहे.
(लेखक प्रसार भारतीचे माजी प्रमुख आहेत)