... तुम्हारे पास क्या है ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 03:01 AM2018-02-15T03:01:17+5:302018-02-15T03:01:28+5:30
घाटकोपरमध्ये निष्ठावंत शिवसैनिकांनी म्हणे ‘नवनिर्माण शिवसेना’ स्थापन करून ‘राज यांनाच सेनेत का घेत नाही?’ असा तिरकस सवाल थेट फलकाद्वारे केला. ‘पुन्हा पक्षात आलेल्या मनसैनिकांना पदांची खिरापत वाटण्यापेक्षा त्यांच्या नेत्यालाच सेनेत घ्या,’ हा टोला ‘मातोश्री’पर्यंत पोहोचला की नाही, माहीत नाही... परंतु ‘साऊथ’कडच्या एका निर्मात्याला मात्र यावर एक जबरदस्त इमोशनल पिक्चर काढण्याची हुक्की आली.
- सचिन जवळकोटे
घाटकोपरमध्ये निष्ठावंत शिवसैनिकांनी म्हणे ‘नवनिर्माण शिवसेना’ स्थापन करून ‘राज यांनाच सेनेत का घेत नाही?’ असा तिरकस सवाल थेट फलकाद्वारे केला. ‘पुन्हा पक्षात आलेल्या मनसैनिकांना पदांची खिरापत वाटण्यापेक्षा त्यांच्या नेत्यालाच सेनेत घ्या,’ हा टोला ‘मातोश्री’पर्यंत पोहोचला की नाही, माहीत नाही... परंतु ‘साऊथ’कडच्या एका निर्मात्याला मात्र यावर एक जबरदस्त इमोशनल पिक्चर काढण्याची हुक्की आली. त्यानं लुंगी गुंडाळत आपल्या डायरेक्टरला फोन लावला. दाक्षिणात्य हेल काढत कल्पना सांगितली, ‘अय्यऽऽयो.. याड्डू ब्रदर फर्स्ट ढ्यिशूमऽऽ ढ्यिशूम... देन बाद में मिलाफ. व्हॅटस् अ फॅन्टॅस्टिक स्टोरी. प्लीज मेक दीवार पार्ट टू पिक्चरऽऽ’
मग काय. हिरोच्या रोलसाठी डायरेक्टर ‘मातोश्री’वर. तिथं उद्धो मोबाईलवर बोलण्यात मश्गूल होते. पुढच्या महिन्यात सरकारवर टीका करण्यासाठी कोणकोणते पॉर्इंटस् शिलकीत ठेवायला हवेत, याची टीप बहुधा ते संजयरावांकडून घेत असावेत. बोलणं आटोपल्यानंतर डायरेक्टरनं त्यांना ‘दीवार पार्ट टू’ची कल्पना सांगितली. उद्धोपंतांनाही ती आवडली.
उद्धो : (मानभावीपणे) पण मला चांगली अॅक्ंिटग येते, हे तुम्हाला कुणी सांगितलं?
डायरेक्टर : (कौतुकानं) आता हे काय विचारणं झालं? देवेंद्रपंत अन् किरीटभार्इंनाही तुम्ही त्यात मागं टाकलंय की...
उद्धो : (खूश होत) हरकत नाही... पण या पिक्चरची स्टोरी काय?
डायरेक्टर : तीच ती नेहमीची. दो भाईयोंका झगड़ा, बिछड़ना और मिलना.
उद्धो : (संशयानं डोळे किलकिले करत) पण मी नेमका कोणता डॉयलॉग म्हणायचा? ‘गाडी-बंगला’वाला की ‘माँ’वाला?
डायरेक्टर : तसं काही नाही. तुम्हाला जो योग्य वाटेल तो म्हणा.
उद्धो : (घसा खाकरत) ठीकायऽऽ मेरे पास ‘युती’ है. ‘कुर्सी’ है. फिर भी ‘सुखशांती-समाधान नहीं’ है... तुम्हारे पास क्या है?
अॅक्ंिटग पाहून डायरेक्टर खूश झाला. तिथून थेट ‘कृष्णकुंज’वर पोहोचला. आतमध्ये ‘ये दुनिया... ये महफिल... मेरे काम की नहीं ऽऽ...’ हे गाणं स्पिकरवर आळवलं जात होतं. तिथं राज एकटेच निवांत बसले होते. डायरेक्टरनं पिक्चरची पार्श्वभूमी सांगून अॅक्टिंग करून दाखविण्याची विनंती केली.
राज : (खर्ज्या आवाजात) मेरे पास ‘आव्वाज’ है. ‘ब्रश’ है. लेकिन तुम्हारी वजहसे कोई कार्यकर्ता रहा नहीं !
(टाळ्यांचा कडकडाट. दिग्गज कलाकार मिळाले म्हणून डायरेक्टर आनंदला.)
राज : (धमकी देत) पण मी सांगेन, तेच नाव पिक्चरचं हवं. नाहीतर महाराष्ट्रातल्या कोणत्याच थिएटरला झळकू देणार नाही.
डायरेक्टर : (घाबरून) तुम्ही म्हणाल तसं साहेब.. उगाच खळ्ळऽऽखट्याक नको.
राज : मग ऐका. ‘दीवार’मधली मुंबईची पार्श्वभूमी आमच्यासाठी नवीन नाही. त्यापेक्षा गुजरातच्या डोंगरांवर ‘शोले पार्ट टू’ची तयारी करा. आम्ही दोघं बंधू मोटारसायकलवरून तिकडं येऊ. ‘गब्बर’ला बघून घेऊ. आम्हाला एकत्र बघून अमितभार्इंच्या इलाक्यात किती बॉम्ब उडतील, हेही पाहायचंय. चला, लागा कामाला. येऽऽ कोण आहे रे तिकडं? गाणं बदल आता. ‘ये दोस्तीऽऽ हम नहीं छोडेंगेऽऽ’ लाव..