शिक्षण म्हणजे काय?
By Admin | Published: August 23, 2016 07:19 AM2016-08-23T07:19:36+5:302016-08-23T07:19:36+5:30
शिक्षण म्हणजे काय, या प्रश्नाचे सामान्य उत्तर, अभ्यास करुन पदवी मिळवून चांगली नोकरी मिळवणे.
शिक्षण म्हणजे काय, या प्रश्नाचे सामान्य उत्तर, अभ्यास करुन पदवी मिळवून चांगली नोकरी मिळवणे. पण आज उच्च शिक्षण घेतलेल्यांच्याही मनावर ताबा नाही. त्यांचे शरीर व मन आजारी आहे म्हणून सध्याचे शिक्षण खरे आहे का, याचा विचार करायला हवा.
माणसाला मन, भावना व चेतना असतात. योगशास्त्रानुसार माणसाच्या व्यक्तिमत्वाचे पाच अभिन्न भाग आहेत. त्यांना ‘कोष’ म्हणतात. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोष.
अन्नमयकोष म्हणजे शरीर. तो हाडमांस मज्जारक्तातून बनलेला असतो. तो जिवंत ठेवण्यासाठी अन्न-पाण्याची गरज भासते. प्राणमय कोष प्राणवायूद्वारे जिवंत राहातो. मनोमय कोष म्हणजे भावना, विचार, संवेदना आदिंचे उगमस्थान असलेल्या मनाचा पसारा. विज्ञानमय कोष म्हणजे माणसाच्या चेतनेचा विस्तार. शेवटी आनंदमय कोष म्हणजे शांत व सर्व विकार व उद्वेगांपासून मुक्त असणारे गहनतम व्यक्तिमत्व.
या पाच कोषांचा विचार करता, असे लक्षात येते की, ही माणसाची परिपूर्ण व संतुलित कल्पना आहे. अन्नमयकोष भौतिक असून तो बाह्यरुपी आहे.
प्राणमयकोष त्यापेक्षा सूक्ष्म व जसजसे आपण व्यक्तिमत्वाच्या आत उतरतो तसतसे तो अधिक सूक्ष्म होत जातोे. म्हणून माणसाच्या व्यक्तिमत्वाचा फक्त वीस टक्के भाग बाहेर दिसतो तर उरलेला ऐंशी टक्के भाग सूक्ष्म असल्याने नजरेच्या पलीकडे असतो.
सध्याचे शिक्षण केवळ या फक्त वीस टक्के भागाची काळजी घेते. ऐंशी टक्के भाग दुर्लक्षित व उपेक्षित राहातो. म्हणून आजचा माणूस शरीराने पुष्ट असून सुध्दा अंत:शक्तिने हीन, मनाने व्यग्र, विचाराने आत्मकेन्द्रीत व व्यवहाराने असंतुलीत झाला आहे.
शिक्षणाबाबत स्वामी विवेकानंद म्हणत, शिक्षणाचा उद्देश सकारात्मक वृत्ती रुजविणे हा आहे. बुध्दिसामर्थ्य वाढवून मन व भावनांवर अंकुश ठेवण्याची तालीम देते ते खरे शिक्षण. शिक्षण चारित्र्य निर्माण करते व जीवनकलहाला सामोरे जाऊन आव्हाने स्वीकारण्यासाठी सज्ज करते.
-डॉ. भूषणकुमार उपाध्याय