शिक्षण दिले, संस्कारांचे काय?

By admin | Published: May 12, 2017 10:49 PM2017-05-12T22:49:55+5:302017-05-12T22:49:55+5:30

शिक्षणाची ओंजळ ज्या ज्ञानमंदिरातून भरायची, तेथेच चोरी-घरफोडीचा प्रताप केला गेल्याचे पाहता; सामाजिक व नैतिक संस्काराच्या प्रेरणा किती क्षीण झाल्या आहेत हेच लक्षात यावे.

What is education, what is the rituals? | शिक्षण दिले, संस्कारांचे काय?

शिक्षण दिले, संस्कारांचे काय?

Next

शिक्षणाची ओंजळ ज्या ज्ञानमंदिरातून भरायची, तेथेच चोरी-घरफोडीचा प्रताप केला गेल्याचे पाहता; सामाजिक व नैतिक संस्काराच्या प्रेरणा किती क्षीण झाल्या आहेत हेच लक्षात यावे.
गुन्हेगारी घटनांतील अल्पवयीन मुलांचे वाढत चाललेले प्रमाण हा सामाजिक चिंतेचा तसेच चिंतनाचा विषय ठरला असताना, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वत:च्याच महाविद्यालयातील संगणक चोरून नेण्यासारखी घटना नाशकात पुढे आल्याने नेमके कुठे, काय व कुणाचे चुकते आहे याचा विचार समाजधुरिणांकडून केला जाणे अगत्याचे ठरून गेले आहे.
दिवसेंदिवस शहरीकरणाच्या प्रमाणात नागरी समस्या व गुन्हेगारीचे प्रमाणही वाढणे एकवेळ समजून घेता येणारे असले तरी, विशेषत: गुन्हेगारी प्रकरणात आढळून येणारा अल्पवयीनांचा मोठ्या संख्येतील सहभाग हा न केवळ पोलीस दलाला, परंतु संपूर्ण समाजाला चक्रावून टाकणारा आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रातील बालगुन्हेगारीचे प्रमाण तब्बल ७१ टक्क्यांहून अधिक वाढले असून, यातील १२ ते १६ या वयोगटातील मुलांच्या गुन्हेगारी घटनांत ७७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबई, नागपूरपाठोपाठ नाशिक, नांदेडसारख्या ठिकाणीही हे लोण वेगाने पसरत आहे. गुन्हेगाराची कोणतीही जात नसते की त्याचा कोणता धर्म नसतो. परंतु वयाच्या दृष्टीने विचार करता तो अल्पवयीन असेल, आणि तरी गुन्हेगारी कृत्यात आढळून आला असेल तर कायदा त्याच्याकडे काय म्हणून बघेल हा भाग वेगळा, मात्र समाजाला अशा अल्पवयीनांकडे गंभीरतेनेच पाहावयास हवे. कारण, असे घडून येण्यात सामाजिक स्थिती वा परिस्थितीचाच मोठा वाटा राहिल्याचे अनेकदा, अनेक प्रकरणांतून दिसून आले आहे. खेळण्या-बागडण्याच्या व शिकण्याच्या वयात कोवळी किंवा तरुण मुले ‘हातसफाई’ करून कुणाचे पाकीट, मोबाइल्स लंपास करत असतील; माता-भगिनींच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून नेत असतील आणि तितकेच नव्हे, तर त्याही पुढचे पाऊल टाकीत घरफोडी, प्राणघातक हल्ले व खुनासारख्या गंभीर प्रकरणात लिप्त असल्याचे आढळून येत असतील; तर ते समाजस्वास्थ्य बिघडल्याचेच लक्षण मानावयास हवे. कारण, कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा, समाजाचा म्हणून असणारा व समाजातील थोरामोठ्यांचा, नैतिकतेचा धाक ओसरत चालल्याचे यातून स्पष्ट होणारे आहे.
महत्त्वाचे म्हणजे, अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षणानिमित्त घरापासून व पालकांपासून दूर शहरात आलेली मुले आपल्या छानछोकीसाठी गाड्या वगैरे चोरून चैन करू पाहत असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत असतात; परंतु ज्या ज्ञानमंदिरात ते शिक्षण घेत आहेत तेथीलच संगणक आदी साहित्य चोरून नेण्याचा प्रकार नाशिक जिल्ह्यातील आगासखिंड येथील एका पॉलिटेक्निक महाविद्यालयात उघडकीस आल्याने, या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पण संस्कार देण्यात कुटुंब, समाज व शिक्षण व्यवस्थाही कमीच पडल्याचे म्हणता यावे. सदर विषय चिंतेसोबतच चिंतनाचा ठरला आहे तो म्हणूनच. यातही नकळत्या वयातील अथवा शिक्षणापासून लांब असलेली झोपडपट्टीतील मुले किंवा आई-वडिलांतील सततच्या भांडणांचाच ‘संस्कार’ मनावर झालेली आणि त्यातून गुन्हेगारीकडे वळलेली मुले वेगळी व पॉलिटेक्निकमध्ये शिकावयास आलेली मध्यम वर्गातील, सभ्य घरातील ‘कळती’ मुले वेगळी; पण तरी त्यांच्यात गुन्हेगारीचा समान धागा गवसावा, हे यातील अधिक भयाण व वास्तव चित्र आहे. ते समाजमनाला अस्वस्थ करून सोडणारे असल्याने, समाजाच्या पुढारपणाच्या दिवट्या-बुधल्या घेऊन मिरवणाऱ्यांनी याबाबत अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली आहे.
बालसुधारगृह ते मुलांसाठी काम करणाऱ्या विविध संघटना, कुटुंबप्रमुखांपासून ते समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांपर्यंत आणि शासनापासून ते शिक्षणक्षेत्रात असणाऱ्यांपर्यंत साऱ्यांनीच याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. उद्याची आशा म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत आहोत ती पिढी अशी गुन्हेगारीत अडकणार असेल तर कोणत्याही कुटुंबाला, समाजाला अगर देशालाही उज्ज्वल भविष्याचे स्वप्नच पाहता येऊ नये इतकी यातील भयावहता आहे. ती वेळीच जाणली जावी, इतकेच यानिमित्ताने.
- किरण अग्रवाल

Web Title: What is education, what is the rituals?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.