हेचि फल काय...?
By Admin | Published: February 11, 2016 03:52 AM2016-02-11T03:52:52+5:302016-02-11T03:52:52+5:30
अयोध्येतील बाबरी मशिदीचे पतन झाले त्याला दोन दशकांहून अधिकचा काळ उलटून गेल्यानंतर आजतागायत सरकारने नेमलेल्या चौकशी आयोगाला, विविध तपासी यंत्रणांना
अयोध्येतील बाबरी मशिदीचे पतन झाले त्याला दोन दशकांहून अधिकचा काळ उलटून गेल्यानंतर आजतागायत सरकारने नेमलेल्या चौकशी आयोगाला, विविध तपासी यंत्रणांना वा न्यायसंस्थेला तो विध्वंस नेमका कोणी, कसा आणि कोणाच्या प्रेरणेने घडला वा घडवून आणला गेला याचा थांगपत्ता लागलेला नसताना ते कार्य लालकृष्ण अडवाणी यांनीच केले असे ठामपणे गृहीत धरुन त्यांच्यावर आता एक खासगी संस्था खटला दाखल करणार आहे. परंतु ही संस्था इस्लामशी संबंधित नसून चक्क हिन्दू महासभेनेच तो निर्णय जाहीर केला आहे. यादेखील अखिल भारतीयच असलेल्या संस्थेच्या मते बाबरी मशिदीचे जे घुमट उद्ध्वस्त करण्यात आले त्या घुमटांखाली ‘रामलल्ला’ची मूर्ती होती व मशीद आणि तिचे घुमट जमीनदेस्त करताना त्यात या मूर्तीचीदेखील हानी झाली. हे जारकर्म अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांनी ‘संगनमताने’ केले असा महासभेचा दावा आहे. महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांच्या मते मशिदीच्या घुमटाखालील भागास रामाचा आशीर्वाद होता आणि मुस्लीम बांधव जिथे नमाज अदा करीत असत तो भाग घुमटाखाली नव्हता. पण तरीही अडवाणी प्रभृतींनी घुमट उद्ध्वस्त करुन मोठे पापच केले आहे. अडवाणींसारखे ‘ढोंगी राष्ट्रभक्त’ देशातील मुस्लीम तसेच हिन्दूंचेही सारखेच शत्रू असल्याचा घरचा अहेरदेखील स्वामी चक्रपाणी यांनी अडवाणींना बहाल केला आहे. आता आपण आपल्या महासभेच्या माध्यमातून राममंदिराच्या उभारणीचा लढा सुरु करणार आहोत पण हा लढा मुस्लीम बांधवाना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाही असे स्पष्ट करुन त्याच परिसरात मुस्लीम बांधवांसाठी स्वतंत्र मशीद आणि रामाचे मंदीर उभारण्याचा आमचा प्रयत्न राहील असा इरादाही या स्वामींनी व्यक्त केला आहे. लालकृष्ण अडवाणी भाजपाचे अध्यक्ष असताना त्यांनी रथयात्रा काढून देशात एक उन्मादी वातावरण निर्माण केले होते. रथयात्रेची परिणती बाबरी मशिदीच्या पतनात झाली आणि त्यातूनच हिन्दुत्ववादी मतांचे ध्रुवीकरण होऊन भाजपाला केन्द्रातील सत्तेची चव चाखता आली, हा इतिहास सर्वज्ञातच आहे. आता पुन्हा एकदा राममंदिराचा विषय भाजपाने केन्द्रस्थानी आणला असताना एका हिन्दुत्ववादी संघटनेने सुरुंग लावणे म्हणजे ‘हेचि काय फल मम तपाला’ अशीच स्थिती म्हणायची.