उन्हाळी शिबिरांमधून पालकांना नेमके काय हवे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 03:47 PM2019-06-10T15:47:15+5:302019-06-10T15:47:29+5:30
उकाडा कायम असला, पावसाची प्रतीक्षा असली तरी उन्हाळी सुट्या संपून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे.
मिलिंद कुलकर्णी
उकाडा कायम असला, पावसाची प्रतीक्षा असली तरी उन्हाळी सुट्या संपून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. पुढच्या आठवड्यात बहुसंख्य शाळांची घंटा वाजेल. पालकांच्यादृष्टीने पाल्यांना सांभाळण्याच्या काही तासांचा दिलासा मिळणार आहे. उन्हाळ्याच्या अडीच महिन्यांच्या सुटीत पाल्यांना सांभाळताना उडालेल्या त्रेधा तिरपीटीने पालक आणि विशेषत: आई चांगलीच वैतागते. बहुदा त्यातून उन्हाळी शिबिरांमध्ये पाल्यांना पाठविण्याचा आग्रह सुरू होतो. कडक ऊन असल्याने दिवसा बाहेर खेळणे त्रासदायक, घरात बैठे खेळ कुणाबरोबर खेळायचे हा प्रश्न असल्याने मुले टीव्ही किंवा मोबाइलला चिकटतात, त्यावर उपाय म्हणून उन्हाळी शिबिरांचा मार्ग शोधून काढला जातो. अर्थात हा नकारात्मक सूर नाही, त्याचे फायदेदेखील आहेत. परंतु, पालकांच्या दृष्टीने वर्षभर शाळेच्या धावपळीत छंद, कला प्रकार शिकता येत नाही, त्याला सुटीच्या काळात वेळ देता येतो हा पहिला फायदा तर दुसरा फायदा मुले दिवसभर काय करू हा प्रश्न विचारुन भंडावून सोडत असतात. त्यामुळे दिवसातील किमान दोन-चार तास शिबिरात गेली तर व्यस्त राहतील. उद्देश चांगला आहे. योगायोगाने जिल्हा पातळीवर वेगवेगळी शिबिरे होऊ लागली आहेत. कला, क्रीडा, साहसी खेळ अशी भिन्न स्वरुपाची ही शिबिरे आणि त्यात शिकविणारी तज्ज्ञ, जाणकार मंडळी असल्याने ही शिबिरे चांगली होतात. या शिबिरांमधून पाल्यांना त्यांचा कल, आवड असलेल्या क्षेत्राची तोंडओळख होणे, प्रशिक्षणाची सुरुवात होणे, ज्याला त्या कलाप्रकारात गती आहे, त्याला पुढील वाट दाखविणे, किमान तयार असलेल्या विद्यार्थ्यांकडून सफाईदारपणे ते करवून घेणे अशी खरे तर अपेक्षा असते. संयोजक आणि पालक या दोघांना किमान अशी अपेक्षा असायला हवी. शिबिराचा कालावधी लक्षात घेऊन त्यातील गुणवत्ता, सराव आणि विषयात पारंगत होण्याची शक्यता अवलंबून असते. मुळात समस्या याठिकाणी निर्माण होते. मागणी तसा पुरवठा या बाजारपेठेच्या नियमानुसार शिबिर संयोजक पालकांच्या अपेक्षा, मागणी लक्षात घेऊन एका शिबिरात अनेक गोष्टींचा समावेश करतात. मुलांची संख्या अधिक असते. नवोदित, नवशिका, पारंगत असे सगळे एका शिबिरात सहभागी झालेले असतात. प्रशिक्षक एक किंवा दोन असल्याने ते ‘सब घोडे बारा टके’ या न्यायाने प्रशिक्षण देतात. बाल, कुमार अशा वयोगटातील मुले असल्याने प्रत्येकाची ग्रहणक्षमता, आकलन क्षमता भिन्न असते. शारीरिक क्षमतेत फरक असतो. पण एवढ्या मोठ्या संख्येत या गोष्टीकडे दुर्लक्ष होते आणि शिबिराच्या शेवटी पालक म्हणतात, शिबिराचा फायदा काय झाला? आमच्या मुलाला तर अमूक-तमूक येतच नाही. तमक्याच्या पिंट्याला तर हेही येते आणि तेही येते. ही तुलना आणि अपेक्षा मुळात चुकीची आहे.
शिबिरातील दैनंदिन घडामोडींशी पालक पाल्यांशी संवाद साधतात काय? शिबिरापूर्वी, शिबिरादरम्यान आणि शिबिराच्या सांगतेनंतर त्यांच्यात काय बदल होतोय, याचे काळजीपूर्वक निरीक्षण पालकांनी केले आहे काय? याचा विचार प्रत्येक पालकाने करायला हवा. असा विचार केला असेल तर त्यांना काही गोष्टी लक्षात येतील. पहिली गोष्ट म्हणजे चार-आठ दिवसांच्या शिबिरातून पाल्य पारंगत होणार नाही. आवडीच्या क्षेत्राची किमान तोंडओळख त्याला होईल. या क्षेत्राची आपल्याला खरोखर आवड आहे का, अमूक करतो म्हणून मी करावे, असे अनुकरण आहे काय? त्यासाठी लागणारी कौशल्ये आपल्यात आहे काय? आपण सरावासाठी पुरेसा वेळ देऊ शकणार आहोत काय यासंबंधी खरे तर पालकांनी मुलांशी चर्चा करायला हवी. दुसरी गोष्ट म्हणजे, शिबिरांमधून स्वयंशिस्त, साहचर्य, सर्वसमावेशकता, संघबांधणी या आणि इतर अनेक गुणांचा त्याला परिचय होतो. स्वाभाविकपणे संस्कार होतात. शाळा आणि शिबिरामधील फरक त्याला लक्षात येतो. या गुणांसंबंधी पालकांनी त्याला अवगत करावे, त्याच्या वर्तनात झालेला बदल त्याला लक्षात आणून द्यावा, त्याला प्रोत्साहित करावे. पालकांच्या अशा कृतीमुळे पाल्याचा शिबिराकडे बघण्याचा दृष्टीकोन अधिक वास्तववादी होईल.
शिबिर संयोजकांनीदेखील केवळ आर्थिक लाभाकडे न बघता मुलांच्या सर्वांिगण विकासाचा व्यापक दृष्टिकोन ठेवायला हवा. अशा शिबिरांच्या आयोजनाचा खर्च मोठा असतो, केवळ शुल्कातून तो निघू शकत नाही. अशावेळी उद्योजक, व्यापारी, दानशूर व्यक्तींनी आर्थिक योगदान दिले तर ही मोठी समाजसेवा घडेल.