राज ठाकरे आता नेमकं काय करणार? भाजपसोबत युती होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 06:07 AM2021-10-22T06:07:47+5:302021-10-22T06:09:44+5:30
विकास, मराठी माणूस आणि आता हिंदुत्व - अजेंडा बदलला आहे! राज ठाकरे पुन्हा (एकदा) नवी सुरुवात करण्याच्या तयारीला लागले आहेत!
- यदु जोशी, वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत
हिंदू राष्ट्राचा अजेंडा घेऊन काम करणाऱ्या साध्वी कंचनगिरी अलीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटल्या आणि राज हे दिवाळीनंतर अयोध्येला जातील, अशी घोषणाही मनसेकडून केली गेली. मुंबईतील काही भागात या भेटीच्यानिमित्तानं पोस्टर्स लागली. त्यावर राज यांचा फोटो आणि खाली, ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असं वाक्य होतं. विकास, मराठी माणूस आणि आता हिंदुत्व अशा बदलत्या अजेंड्यावर स्वार होत आलेल्या राज यांना राजकारणात पुन्हा दमदारपणे परतण्याचे वेध लागलेले दिसतात.
राजकारणात काही ‘अर्ली बर्ड्स’ असतात. फळांनी बहरलेल्या झाडाखाली ते सकाळी-सकाळी सर्वांच्या आधी जातात आणि फळं चाखतात. हे बहरलेलं झाड पूर्वजांनी लावलेलं असतं. त्यांची आयती फळं या ‘अर्ली बर्ड्स’ना खायला मिळतात. काही ‘लेट ब्लूमर्स’ म्हणजे उशिरानं उमलणारी फुलं असतात.
प्रदीर्घ संघर्षानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला १९९५ मध्ये सत्तेप्रत आणलं. तेव्हा बाळासाहेब ६९ वर्षांचे होते. सत्तायशाचा विचार करता, ते ‘लेट ब्लूमर’च होते. राज सध्या ५३ वर्षांचे आहेत. बाळासाहेबांशी तुलना केली, तर राज यांना अजूनही मोठी संधी मिळू शकते. बाळासाहेबांनी शिवसेनेच्या स्थापनेनंतर २४ वर्षांनी भाजप नावाचा मित्र सोबत घेतला. युती किंवा आघाडी ही महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याची अपरिहार्यता आहे. कोणताही एक पक्ष स्वबळावर सत्ता आणू शकत नाही. त्यातच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मोठी स्पेस व्यापलेली असताना, मनसेला संधी कमीच आहे. तीन पक्ष एका मांडवात आधीच बसलेले आहेत. ‘भामका देवीक नाय घो आणि वेताळाक नाय बायको’, अशी कोकणात एक म्हण आहे. मनसेची अवस्था सध्या तशीच आहे. त्यामुळे एक भागीदार शोधण्याशिवाय पर्याय नाही. सद्यस्थितीत त्याबाबत राज यांच्याकडे भाजपचाच पर्याय आहे.
राज ठाकरे बदलताहेत
सातत्याचा अभाव हा राज यांच्यावरील ‘जनता की अदालत’मधील सर्वात मोठा आरोप आहे. तो दूर करण्याचा प्रयत्न सध्या ते करताहेत. ‘पक्ष चालवायचा, तर सकाळी लवकर उठावं लागतं’ असा चिमटा शरद पवार यांनी त्यांना एकदा काढला होता. राज हे नेहमीच ‘डिलिव्हरिंग एंड’ला असतात, ‘रिसिव्हिंग एंड’ला नाही. म्हणजे लोकांचं, कार्यकर्त्यांचं ते ऐकून घेत नाहीत, असाही एक आक्षेप आहे. सध्या राज स्वत:ला त्याबाबत फिल्टर करताहेत, असं कानावर येतं. म्हणजे ते लवकर उठतात. दररोज कार्यकर्त्यांना भेटतात आणि आधी त्यांचं म्हणणं ऐकून घेतात. तसं असेल तर चांगलंच आहे. त्यांच्यात मॅग्नेट आहे, आजही ते सर्वाधिक गर्दी खेचणारे नेते आहेत. टीआरपी आहे. लोकांच्या मनातलं बोलतात. मात्र हेही खरं की, एखादी भूमिका घेतली की त्यासाठीचे शब्द घेऊन सुसाट धावत सुटतात. टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला की ते स्वत:वर खूश होतात. त्यांच्या प्रत्येक कृतीला एक ‘सिनेमॅटिक टच’ असतो, पण राजकारण ही संधी शोधण्याची कला आहे आणि ही संधी शोधायची तर नेहमी थोडासा वाव ठेवावा लागतो.
मोदी, भाजपवर धो-धो बरसलेले राज हे उद्या भाजपसोबत गेले, तर भूमिकेतील सातत्याच्या अभावाचा आरोप त्यांच्यावर पुन्हा एकदा होईल. म्हणूनच भाजपशी नाळ जोडण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून ते हिंदुत्वाची माळ जपताना दिसत आहेत.
भाजपमध्ये दोन मतप्रवाह
मनसेसोबत युती करण्याबाबत भाजपमध्ये दोन विचारप्रवाह आहेत. एक प्रवाह म्हणतो की, एका ठाकरेंनी आपल्याला पाठ दाखवली, आता दुसऱ्या ठाकरेंना मोत्याचा चारा घालू नका. दुसरा प्रवाह असा आहे की, मातोश्रीला बांध घालण्यासाठी कृष्णकुंजचा चांगला उपयोग होऊ शकेल. प्रश्न हा देखील आहे की, चिंतन बैठकांवर जोर असलेल्या शिस्तीतल्या भाजपची बेदरकार राज यांच्याशी व्हेवलेंथ किती जुळेल? दोघांनी एकमेकांना तूर्त डोळा मारून ठेवला आहे. भाजप-मनसे युती झाली, तर मुंबई, ठाणे व परिसरातील महापालिका, नाशिक, पुणे महापालिकेत दोघांनाही फायदा होऊ शकेल. पाऊस कधी पडेल, राजकारण कोणत्या दिशेनं वळेल, अन् वाळवंटातील ऊंट कुस कशी बदलेल, हे सांगता येत नसतं. राजकारणातील कोणतीही युती/आघाडी ही आदर्शवादातून (आयडॉलॉजी) होत नसते, आयडॉलॉजीचा मुलामा हा सोयीसाठी लावला जातो.