अर्थकारणाची फसवी आकडेमोड काय कामाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 12:32 AM2017-10-20T00:32:25+5:302017-10-20T00:33:32+5:30

भारताच्या आर्थिक स्थितीविषयी आणि लोकांना भोगाव्या लागणा-या त्रासाविषयी जेव्हा बोलले जाते, तसेच अर्थ मंत्रालयाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे झालेल्या गोंधळाची जेव्हा चर्चा होते, तेव्हा आमची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगवान असल्याची सारवासारव करण्यात येते.

What is the fraudulent calculation of economics? | अर्थकारणाची फसवी आकडेमोड काय कामाची?

अर्थकारणाची फसवी आकडेमोड काय कामाची?

Next

- कपिल सिब्बल

भारताच्या आर्थिक स्थितीविषयी आणि लोकांना भोगाव्या लागणा-या त्रासाविषयी जेव्हा बोलले जाते, तसेच अर्थ मंत्रालयाने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे झालेल्या गोंधळाची जेव्हा चर्चा होते, तेव्हा आमची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगवान असल्याची सारवासारव करण्यात येते. तसे सांगून अविचारीपणाने अमलात आणलेल्या धोरणाला सावरण्याचा प्रयत्न होतो. भारताचा सकल उत्पादनाचा निर्देशांक ७ टक्के झाला असून तो वाढत आहे, असेही सांगण्यात येते. पण जीडीपीच्या वाढीमुळे श्रीमंत अधिक श्रीमंत होत असतील आणि गरिबांच्या त्रासात भर पडत असेल तर ही आकडेवारी म्हणजे धूळफेकच ठरते. चीनच्या जीडीपीशी आपल्या जीडीपीची तुलना करून स्वत:ची पाठ जेव्हा थोपटली जाते तेव्हा ती आत्मवंचनाच ठरते. चीनची अर्थव्यवस्था भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा पाचपट मोठी आहे. भारताचा विकास दर ७ टक्के तर चीनचा विकास दर ६.७ टक्के असतो; तेव्हा चीनचा विकास अधिक उंचीवरून झाला आहे हे लक्षात घेतले जात नाही. अशा स्थितीत आपली अर्थव्यवस्था वेगवान आहे असे सांगणे ही फसवणूक करण्यासारखे आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था चीनच्या दुपटीने मोठी असल्याने त्यांचा विकास दर ३ टक्क्यांपेक्षा अधिक राहूच शकत नाही. भारताचे दरडोई उत्पन्न १८५० डॉलर्स आहे तर चीनचे ते ८५०० डॉलर्स आहे.
जीडीपीमुळे तळातील लोकांचा काय फायदा झाला हे अर्थतज्ज्ञांना दाखवून देता आले पाहिजे. देशातील २४.७ कोटींपैकी १६.८ कोटी कुटुंबे ही ग्रामीण भागांतील तर ७.९ कोटी शहरातील आहेत. भारताची लोकसंख्या १३० कोटी आहे. त्यातील ग्रामीण भागात लोकसंख्येपैकी (७४.१८ कोटी) ९२ टक्के लोकांचे मासिक उत्पन्न १० हजार रुपयांहून कमी आहे. शहरातील २६.४ टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली जगतात. एकूणच ८४ कोटी जनता कसाबसा उदरनिर्वाह करते. याउलट अमेरिका व युरोपची एकत्रित लोकसंख्या ७५ कोटी इतकीच आहे. तेव्हा देशातील गरीब जनतेच्या चेह-यावर हास्य फुलविण्यासाठी काही ठोस करण्याची गरज आहे. शब्दांचे बुडबुडे उडवून आणि योजनांचे नामांतर करून काहीच साध्य होणार नाही.
भारताचे चित्र आपण ६० महिन्यांत बदलू, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले होते. त्यातील ४० महिने वाहून गेले. देशाचे भविष्य अंधकारमय दिसत आहे. तरीही आकडेवारी फेकून लोकांची फसवणूक करणे सुरूच आहे. अलीकडे भाजपाच्या एका नेत्याने देशाचा विकास दर ५.७ टक्के नसून तो ३.७ टक्के असल्याचे म्हटले. त्यांचा दावा सरकार फेटाळून लावू शकते. अशा वादातून राजकारणाची पातळी घसरू शकते, पण ज्यांनी उदरनिर्वाहाची साधने गमावली त्यांच्या त्रासात मात्र भरच पडते आहे. त्यांची पोटे टीव्हीवरील आकड्यांनी भरणारी नाही.
लोकांचे दारिद्र्य जागच्या जागी असताना आपण वेगवान अर्थव्यवस्थेच्या गोष्टी करतो. काही लोक सुखी जीवन जगत आहेत, हे नाकारता येणार नाही. पण त्यांची संख्या लोकसंख्येच्या १ टक्कासुद्धा नाही. पण हे लोक देशातील ५० टक्के संपदेवर नियंत्रण ठेवतात. बाकीच्या लोकांत सरकारी कर्मचाºयांचा समावेश होतो. त्यांच्यातील प्रामाणिक कर्मचा-यांना अत्यंत साधेपणाचे जीवन जगावे लागते. त्यांना महागड्या शाळेत शिक्षण घेण्यासाठी स्वत:च्या मुलांना पाठविता येत नाही. चांगली आरोग्यसेवा त्यांना परवडत नाही. ग्राहकांना भुलविणाºया जाहिरातीतील वस्तू त्यांना परवडणा-या नसतात. त्यामुळे सतत काहीतरी गमावल्याची जाणीव त्यांना भेडसावत असते. त्यामुळे मध्यमवर्गाच्या नैतिक मूल्यांचा -हास होतो.
त्यातून भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी वाढीस लागत आहे. सर्वसमावेशक विकास साध्य करण्यासाठी सामाजिक आणि आर्थिक नवे धोरण आपण विकसित केले पाहिजे, याकडे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अचूक लक्ष वेधले आहे. आर्थिक विकास साधत असताना आर्थिक विषमता नियंत्रणात ठेवण्यावर भर दिला पाहिजे. पण दुर्दैवाने ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी लागणाºया योग्य वातावरणाचा सध्या अभाव आहे. आपल्या सुखाचा निर्देशांक तपासण्याची व्यवस्था नसली तरी समाजातील वंचित घटकातील असंतोष जाणून घेण्याची पद्धत आपण विकसित केली पाहिजे. जीडीपीचे मोजमाप करणा-या घटकात बदल करून उद्याची चिंता असणा-यांच्या जीवनात आपण बदल घडवू शकणार नाही.
आपल्याला सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने आकडेवारीचा वापर करता येतो आणि त्यातून आपल्याला हवे तसे निष्कर्ष काढता येतात. ते कधी कधी तर्कदुष्ट ठरतात. पण राजकारण्यांना आकड्यांच्या ख-या-खोट्याविषयी चिंता नसते. त्यांना त्यातून काढलेले निष्कर्ष महत्त्वाचे असतात. त्यांच्या आधारे ते लोकांना स्वप्ने विकत असतात. राजकारणी हे लोकांना ‘आशा विकणा-या व्यापा-यांसारखे असतात’ असे नेपोलियनने म्हटले आहे. गरीब जनता या पोकळ आश्वासनांना बळी पडते. पण राजकारणी मात्र त्यामुळे काहीच गमावीत नसतात.
समानतेच्या तत्त्वाने सर्वांना चांगले जीवन जगण्याची संधी देणे हाच आपल्या सर्वांचा मंत्र असायला हवा. देशाची आर्थिक स्थिती मोजण्यासाठी समानतेची फूटपट्टी वापरायला हवी. लोकांच्या जीवनाला स्पर्श करू न शकणारी आकडेवारी काय कामाची? वेगवान वाटचाल करणाºया अर्थकारणात गरिबी आणि वंचितता यांचाच वेग अधिक वाढत आहे!
 

Web Title: What is the fraudulent calculation of economics?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.