काय गंमतच आहे ना राव..

By Admin | Published: May 23, 2016 03:48 AM2016-05-23T03:48:24+5:302016-05-23T03:48:24+5:30

काय गंमतच आहे ना... मुंबई महापालिका निवडणुका जवळ येऊ लागल्या तसे उगाचच शिवसेना भाजपाविषयी भलत्या सलत्या गोष्टी सांगणे सुरू झाले... कधी रस्त्यावरचे खड्डे काढतात

What is fun, no rao .. | काय गंमतच आहे ना राव..

काय गंमतच आहे ना राव..

googlenewsNext

काय गंमतच आहे ना... मुंबई महापालिका निवडणुका जवळ येऊ लागल्या तसे उगाचच शिवसेना भाजपाविषयी भलत्या सलत्या गोष्टी सांगणे सुरू झाले... कधी रस्त्यावरचे खड्डे काढतात, तर कधी कचऱ्याचा विषय काढून विनाकारण भाजपा सेनेला बदनाम करण्याची गंमत का करावी वाटते कोणास ठाऊक...
आता रस्त्यांवर खड्डे पडले म्हणून कोणी बोलले तर त्यात भाजपाने राजकारण आणले म्हणतात, कचरा गोळा करणाऱ्या कंपन्यांमध्ये भाजपा नेत्यांची पार्टनरशिप आहे का असे शिवसेनेने विचारले की भाजपाला कसे अडचणीत आणले म्हणतात... सगळी गंमतच चालूये... हे मीडियावाले पण कायम निगेटिव्ह विचार करत राहतात, अशा गोष्टींकडे गंमत म्हणून पाहताच येत नाही त्यांना... कायम आपले टोचणी देत राहतात...
बिचारे आशिष शेलार, महापालिका जिंकण्याच्या जिद्दीने मैदानात उतरले, पालिकेचा कारभार कसा भोंगळपणे सुरू आहे असे सांगत त्यांनी काही उदाहरणे दिली; त्याचे कौतुक करायचे दिले सोडून... उलट भाजपा महापालिकेच्या सत्तेत सहभागी आहे याची त्यांना आठवण करून देतात... चिमटे काढायची एक संधी सोडत नाहीत हे मीडियावाले... लगेच गंमत करतात... आम्ही सत्तेत नाही असे कधी म्हणाले का शेलार..? पण चांगले झाले ते आमच्यामुळे आणि चुकीच्या गोष्टी केल्या त्या शिवसेनेने असे जर का शेलार गमतीने म्हणत असतील तर त्याला एवढं गांभीर्याने घ्यायचं कारण नाही... पण लगेच गंमत झाली, गंमत झाली म्हणून मीडियावाल्यांचा हात तोंडावर जातो...
एवढी मेहनत करून शेलारांनी तयारी केलीय, वॉर्डनिहाय सगळा अभ्यास पूर्ण केलाय, जातीपातीची, आपलीतुपली मतं किती, माणसं किती याचाही अभ्यास त्या पुस्तकात करून ठेवलाय, दस्तुरखुद्द अमित शहांनी देखील ‘गंमतच आहे’ असे म्हणत त्या पुस्तकाचं कौतुक तावडेंच्या घरी केलं म्हणतात. एवढी तयारी झालेली असताना उगाच शिवसेनेसोबत लढायचे कशाला? असा विचार जर का गंभीरपणे पुढे आला तर त्यातही हे मीडियावाले गंमत शोधतात... गंभीरपणे काही घेतच नाहीत राव कोणी? या पुस्तकाच्या आधारेच सगळ्याच्या सगळ्या जागा लढायची तयारी केली म्हणून शिवसेनेच्या विरोधात बोलायला नको का? पण लगेच तुम्ही लोक आम्हाला हिणवता आणि गंमत करून मोकळे होता...
वांद्रेचा साहेब, त्यांचा मेहुणा आणि पीए हे पालिकेच्या भ्रष्टाचाराचे खरे सूत्रधार आहेत असं भाजपा खासदारानी गमतीनं काय म्हणून टाकलं तर लगेच मुखपत्रातून भाजपा खासदाराबद्दल भलतंसलतं छापण्याची गंमत केली ना शिवसेनेने... पब्लिक भाजपाच्या पाठीशी आहे असे जर शेलारांना वाटत असेल तर सेनेला एवढी भीती वाटायची गरज नाही... आता आसामात कमळ फुललं त्याचा आनंद साजरा केला तर, बऱ्याच काळाने पाळणा हलला की आनंद होणारच, अशी कुचकट भाषा का वापरावी वांद्रेच्या साहेबांनी...
आता शेलारांकडे मुखपत्र नाही म्हणून ही अशी कुचकट बोलणी बरोबर आहेत का? जर का त्यांच्याकडेही मुखपत्र असते तर गंमतच गंमत झाली असती... एक बाण इकडून आला की एक कमळ तिकडून आले असते... गंमतच गंमत आली असती... वांद्रेच्या रहिवाशांनी देखील मग गंमत म्हणून जमलेल्या कमळ आणि बाणांची दुकानं काढली असती...
राज्यात काही चुकीचं घडलं की शिवसेना सरकारला फटके मारायचे सोडत नाही आणि महापालिकेत काही घडलं की भाजपावाले वांद्रेच्या साहेबांना सोडत नाहीत... दोघे आपापसात गंमत गंमत खेळतात... अगदी नुरा कुस्तीसारखी... पण त्याचं एवढं भांडवल का केलं जातं कोणास ठाऊक..?
मुख्यमंत्री पण भारी. मुंबईचा काही विषय नेला की मला त्यात आणू नका, शेलारांना ठरवू द्या असे सांगतात... गृहखाते त्यांच्याकडे आहे. भाजपाची एकहाती सत्ता पालिकेत येणे अशक्य आहे असा रिपोर्ट तर त्यांना कोणीतरी दिला आणि त्यामुळे शेलारांचा पत्ता परस्पर कटत असेल तर बरे अशी त्यांची आणि वांद्रेच्या साहेबांची चर्चा झाल्याची माहिती रावसाहेब दानवे कोणाला तरी देत होते म्हणे... गंमतच आहे सगळी...
- अतुल कुलकर्णी

Web Title: What is fun, no rao ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.