पुरस्कारात काय काय घडतं..?
By admin | Published: January 10, 2016 02:57 AM2016-01-10T02:57:12+5:302016-01-10T02:57:12+5:30
चतुरंगतर्फे ‘जीवन गौरव’ पुरस्कार दिला जातो. त्याचं म्हणून एक विशेष आहे. आज जीवन गौरव पुरस्कार इतका कॉमन झाला आहे की कुणी गल्लीतला कुणाही गल्लीतल्याला जीवन गौरव पुरस्कार देत असतो...
- रविप्रकाश कुलकर्णी (लेखक साहित्याचे ज्येष्ठ समीक्षक आहेत.)
चतुरंगतर्फे ‘जीवन गौरव’ पुरस्कार दिला जातो. त्याचं म्हणून एक विशेष आहे. आज जीवन गौरव पुरस्कार इतका कॉमन झाला आहे की कुणी गल्लीतला कुणाही गल्लीतल्याला जीवन गौरव पुरस्कार देत असतो... इतका तो शब्द स्वस्त झाला आहे. पण जीवन गौरव शब्दाचे श्रेय जाते चतुरंगला किंवा जीवन गौरव शब्दाला ग्लॅमर आले ते चतुरंगने जीवन गौरव पुरस्कार सुरू केल्यानंतर. त्यामुळेच जीवन गौरव शब्दाचा कॉपी राइट घ्यावा की काय असा विचार चालला होता म्हणे.
आता पंचविसावा
तर आता जीवन गौरव पुरस्काराचे यंदा २५वे वर्ष. हा पुरस्कार पारधी समाजासाठी तन मन धन देऊन झटणाऱ्या गिरीश प्रभुणे यांना जाहीर झाला. अर्थात त्याचं स्वागतच झालं.
चतुरंगतर्फे यानिमित्ताने डायरी काढली जाते त्यात गौरवमूर्तीबाबत उत्तम लेख असतात. गौरवग्रंथ असतो तसा हा प्रकार. दिवाळी अंकाची गडबड असण्याचा काळ. चतुरंगच्या विद्याधर निमकरांची गाठ घेऊन म्हटलं, तुम्ही प्रभुणेंची मुलाखत घ्याल तेव्हा एक करा प्रभुणेंना सिनेमाचं वेड आहे, ते मुकेशची गाणी आॅर्केस्ट्रात म्हणत असत. ते सिनेमॅटिक तंत्रानं लिहितात हे सगळं त्यांना विचारा...
मला थांबवत निमकर म्हणाले, अरेच्चा! हे वेगळंच दिसतंय. तुम्हीच का नाही लिहीत? वेळ थोडा आहे पण मी थांबतो. दिवाळी नंतर लेख द्या.
पण दुसऱ्या चतुरंग कार्यकर्त्या मेघना काळे म्हणाल्या, तुम्ही आठवड्यात लेख द्याच...
खरंतर माझी तारांबळ उडणार होती. पण मोठ्या लोकांचं सिनेमावेड त्याचा परिणाम सांगायला हवा असं मला वाटलं तेव्हा म्हटलं आता आलीया भोगासी... मनात आलं हे ठीक आहे. पण गिरीश प्रभुणेंना हे चालणार आहे ना? नाहीतर सत्कारमूर्तीनंच हे नाकारलं तर काय घ्या...? उठलो ते थेट चलो चिंचवड! व्होल्वो बसेस नाक्यावर थांबतात तेथून मनमानी रिक्षावाल्यांच्या मर्जीनं चिंचवड गाव तेथून वन टू वन टू...
प्रत्यक्षात...
चिंचवडच्या सांस्कृतिक क्षेत्रात चांगलेच रुजलेले नितीन हिरवे यांनी आधी प्रभुणेंना सांगून ठेवले होते... दहा-पाच वर्षांपूर्वी चिंचवडला राहायला गेलो तेव्हा चिंचवडला गेलो होतो. तेव्हा गिरीश प्रभुणे तेथे होते हे माहीत असल्याने त्यांच्याकडे जाणे ओघानेच आले. अर्थात प्रभुणे माहीत झाले होते ते सोलापूरच्या एका दौऱ्यात. सोलापूरजवळच्या यमगरवाडीत पारध्याच्या पुनर्वसनाचे काम पाहायला जायचे होते. स्टॅण्डवर यमगर वाडीला जाण्याची चौकशी करताना एक जण म्हणाला, तिथे कुठे?
गिरीश पारधींना भेटायचे आहे.
तो तरुण म्हणाला, चला, मी येतो.
यमगरवाडीच्या पालावर गेलो तेव्हा कळले, आता प्रभुणेकाका येत नाहीत. ते पुण्याला असतात... यमगरवाडी पाहिली. वेगळंच जग... वेगळाच अनुभव. परतायचं ठरलं. तर आता ३-४ जण पुढे आले, सोलापूरचे का? आम्ही सोडतो की...
तुम्ही कशाला त्रास घेता? मी
‘अहो, गिरीश प्रभुणेंच्या करता आम्ही काय पण करू. तुम्ही फक्त सांगा...’ हा स्वानुभव.
मग ‘माणूस’मध्ये प्रभुणेंचे लेख यायला लागले. तेव्हा लक्षात आले हा माणूस कॅमेऱ्याने पाहावे तसे लिहितोय जसे तात्या माडगूळकर लिहायचे.
गिरीश प्रभुणेंना हे कसे साधले असेल? गिरीश प्रभुणेंना भेटल्या भेटल्या नमस्कार-चमत्कार झाल्यावर पहिलाच प्रश्न, प्रभुणे तुमच्यावर सिनेमाचा प्रभाव कसा?
अहो, मला सिनेमा काढायचा होता. राजकपूरला घेऊन त्याचा डबल रोल असलेला सिनेमा काढायचा होता. आता का? तर ‘राम और शाम’मध्ये दिलीपकुमारचा डबल रोल होता. पण राजकपूरचा डबल रोल तोपर्यंत नव्हता हे कसे चालेल? कारण मी राजकपूरचा फॅन ना!
राजकपूरचा फॅन म्हणजे मुकेशची गाणी तुम्ही म्हणत असणारच..? इति मी. प्रभुणे हसले, गाणी? अहो, जगदीश खेबूडकरांच्या आॅर्केस्ट्रामध्ये मी मुकेशची गाणी म्हटली आहेत.. असं म्हणून प्रभुणेंनी ‘वो सुबह कभी तो आयेगी’ गुणगुणून दाखवलंदेखील. अर्थात प्रभुणेंच्या मुलाचं नाव मुकेश आहे हे सांगायला नकोच. थोडक्यात, मग प्रभुणेंच्या चित्रपटवेडाची उजळणी झाली हे सांगायला नकोच.
चित्रपटाचं एक असतं. गोत्र जमलं तर कुंडली जमायला वेळ लागत नाही...
अर्थात या गोष्टीला ४-५
वर्षे झाल्याने आणि आताच्या प्रभुणेंच्या स्टेटस्मध्ये ते बसते की नाही
कुणास ठाऊक? पण, तो प्रश्न गेल्या गेल्या मिटला. दोन फॅन एकत्र आल्यावर काय होते त्याचा हा अनुभव होता. त्याला म्हटले, हे सगळं लिहिणार आहे. चालेल ना? आता पुढे काय झालं -प्रभुणेचं, ते सगळं चतुरंग डायरीतल्या लेखात पाहा.
सोहळ्याचं वेगळेपण
रौप्यमहोत्सवी चतुरंग जीवन गौरव पुरस्कार प्रथमच गेट वे आॅफ इंडिया येथे होता. अर्थात मागे ‘बाळ ठाकरे - फोटो बायोग्राफी’ येथेच प्रकाशित झाले होते. नेमाडेंना ज्ञानपीठ मिळाल्यानंतर सरकारी सोहळा-व्यवस्था-अगदी अप टू डेट! आता हे सगळं आतापर्यंत तुम्ही वाचलं वा कोणाकडून तरी ऐकलं असणार; पण मला सांगायचे आहे ते वेगळेच. या वर्षापासून चतुरंग गौरव पुरस्कार ३ लाख रुपयांचा झाला आहे. यापूर्वी तो लाख रुपयांचा होता... माझ्या समोरच्याच खुर्चीवर गेल्या वर्षीचे पुरस्कार विजेते रत्नाकर मतकरी पत्नीसमवेत होते. मनात आले त्यांच्या मनात पुरस्कार रकमेत जो फरक झाला त्याने काही वाटले असेल?
अनुभव
आता मला तरी असे का वाटले त्यालापण तसेच कारण आहे.कारणीभूत झाले संगीत दिग्दर्शक नौशाद!
एके दिवशी नौशाद साहेबांचा फोन आला, रविप्रकाशजी जरा येऊन जाल?
आता नौशाद यांच्याशी थोडी ओळख होती हे खरे, पण ते विनंती का करत असतील कळेना? गेलो. नौशाद यांना घोळवून घोळवून सांगायची सवय होती. कळेना. मला कशाला बोलवले आहे? मी असे म्हटलेच.. तेव्हा नौशाद म्हणाले, कैसे बताए? झालं असं होतं आदल्या वर्षी नौशाद यांना फाळके पुरस्कार मिळाला होता; पण त्याच्या पुढच्या वर्षीपासून ती रक्कम एक लाख झाली. नौशाद सांगत होते, तुम्ही पत्रकार काही करू शकाल. नौशादना लाख रुपये मिळाले पाहिजेत असे लिहा की...
आता यावर काय बोलणार? आमच्या सांगण्यावरून कुणाला पुरस्कार दिला असता तर... असं काही बाही नौशाद यांना सांगायचा प्रयत्न केला.
सांगायचं काय तर दोन पुरस्कारांत असंही घडतं. घडत असेल आणि असणारच. पण असंच पुन्हा केव्हातरी. मध्ये १५ दिवसांत काही घडले-पडले तर तेदेखील सांगू.
सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिकांची वानवा असते हा झाला सर्वसाधारण समज. याला जबरदस्त अपवाद म्हणजे चतुरंगचे कार्यक्रम! चतुरंगचा कुठलाही कार्यक्रम इतका शिस्तबद्ध असतो की कार्यक्रमाच्या आधीच हाऊसफुल्ल होतो. अर्थात त्यामागे चतुरंग कार्यकर्त्यांंची निरलस सेवा असते हे नक्की. चतुरंग कार्यकर्त्यांचं कौतुक करत बसलो तर पानच्या पानं मी लिहू शकतो.