हा जिव्हाळा अवघ्या राजकारणातच मुरला तर?, गुलाम नबी आझाद यांना राज्यसभेतून निरोप देताना मोदींच्या डोळ्यात आले पाणी 

By विजय दर्डा | Published: February 15, 2021 06:54 AM2021-02-15T06:54:21+5:302021-02-15T06:55:52+5:30

Ghulam Nabi Azad : जम्मू-काश्मीरसारख्या राज्यात राजकारणाची धुळाक्षरे गिरवणारे गुलाम नबी असे एकमेव  नेते आहेत ज्यांच्याकडे सारा देश आदराने पाहतो.

What if this feud died in politics? Tears came to Modi's eyes while bidding farewell to Ghulam Nabi Azad from Rajya Sabha | हा जिव्हाळा अवघ्या राजकारणातच मुरला तर?, गुलाम नबी आझाद यांना राज्यसभेतून निरोप देताना मोदींच्या डोळ्यात आले पाणी 

हा जिव्हाळा अवघ्या राजकारणातच मुरला तर?, गुलाम नबी आझाद यांना राज्यसभेतून निरोप देताना मोदींच्या डोळ्यात आले पाणी 

Next
ठळक मुद्देराजकारणातील शुचिता पुनर्स्थापित करण्याची आज कधी नव्हती इतकी गरज आहे.सामान्य लोकांचे जगणे सुकर करून देशाला पुढे नेणे हेच तर प्रत्येक राजकीय पक्षाचे उद्दिष्ट असते.

- विजय दर्डा 
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)

गुलाम नबी आझाद यांच्याशी माझी मैत्री गेल्या तीन दशकांची जुनी! - त्याचे कारण अर्थातच त्यांचे व्यक्तिमत्त्व.  त्यांच्या मनात सतत चालणारा देशाच्या विकासाचा विचार हा मला त्यांच्याशी जोडणारा महत्त्वाचा धागा! जम्मू-काश्मीरसारख्या राज्यात राजकारणाची धुळाक्षरे गिरवणारे गुलाम नबी असे एकमेव  नेते आहेत ज्यांच्याकडे सारा देश आदराने पाहतो. देशाच्या विभिन्न भागांचे प्रतिनिधित्व त्यांनी केले. यवतमाळ - वाशीम संसदीय क्षेत्राचेही प्रतिनिधित्व त्यांनी केलेले आहे.

स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी आझाद यांना संसदेत आणण्याची जबाबदारी माझे वडील स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्यावर सोपवली होती. त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली. हेच हिंदुस्थानचे खरे सौंदर्य आहे. इथे स्नेह असला, की भाषा धर्म, किंवा इतर भिन्नता याचे काहीही महत्त्व उरत नाही. काश्मिरात राजकारण करणाऱ्या बहुतेक नेत्यांचा स्वर सतत डगमगता असल्याचे दिसते. परंतु आझाद यांचा आवाज मात्र नेहमीच मोकळा राहिला. त्यांनी प्रत्येक वेळी दहशतवाद्यांचा विरोध केला. काश्मिरी पंडितांच्या बाबतीत त्यांच्या डोळ्यातली आसवे कधी आटली नाहीत. आझाद यांच्या जागी नवा विरोधी पक्ष नेता येईल त्याला आझाद यांची बरोबरी करणे फार कठीण जाईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले, ते सार्थच आहे. 

गुलाम नबी आझाद यांच्यासारखा दुसरा नेता नाही आणि होणारही नाही”, या मोदी यांच्या मताशी मी सहमत आहे. राज्यसभेत मी त्यांच्याबरोबर दीर्घकाळ काम केले. त्यांना मी अगदी खोलात जाऊन समजून घेतले आहे. त्यांच्या अंत:करणात काश्मीरबरोबर सारा हिंदुस्तान वसलेला पाहिला आहे. दिल्लीतील त्यांच्या घराभोवतीच्या बागेत विविध प्रकारच्या फुलांचा सुवास दरवळत असतो. त्यात काश्मिरातले ट्युलीपही आहे. देशभरातून जमवलेली अनेक रोपटी त्या बागेत वाढतात. त्यांचा बगिचा जणू हिंदुस्थानचे एक प्रतिबिंबच आहे. या माणसाचे हृदय केवळ भारत देशाच्या भल्यासाठी धडधडते आहे, हे त्यांच्याशी बोलताना सतत जाणवत राहते. “आपण भाग्यवान असल्याने पाकिस्तानात कधी गेलो नाही आणि भारतीय मुसलमान असल्याचा आपल्याला अभिमान आहे”, असे आझाद नेहमी म्हणत असतात.  

खरे तर राजकारणासाठी धर्माचा वापर न करणाऱ्या फार थोड्या नेत्यात आझाद यांची गणना होते. ते जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री होते. शिवाय पाच वेळा राज्यसभा आणि दोनदा लोकसभेत निवडून गेले. त्यांचा प्रत्येक कार्यकाळ उत्तम  राहिला. अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांना ते हवेहवेसे वाटत. मात्र, याची सावली कधी काँग्रेसवरच्या त्यांच्या निष्ठेवर पडली नाही. ज्यांनी ज्यांनी भारतीय राजकारण आणि परंपरा सुदृढ करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याबरोबर आझाद सतत राहिले. राज्यसभेतल्या निरोपाच्या भाषणात त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचा उल्लेख केला. काँग्रेसने अल्पमतातले सरकार चालवले तेव्हा वाजपेयी यांनी सहकार्य केले होते, कोणताही प्रश्न सोप्या मार्गाने कसा सोडवायचा, हे आपण अटलजींकडून शिकलो, असे आझाद म्हणाले.

अशा गुलजार व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तीला निरोप देताना सभागृहात सगळेच भावुक होणे स्वाभाविक होते. एरवी हा प्रसंग असाच असतो. मुलीला सासरी पाठवताना होणारी घालमेल यावेळी सर्वांनाच जाणवते. १८ वर्षे संसदेत काम केल्यावर मीही या अनुभवातून गेलो आहे. पुन्हा आपण येथे येऊ किंवा नाही, याचे दु:ख तेव्हा नव्हते, तर इथला माहौल आता अनुभवता येणार नाही, याची सल मात्र काळजात होती. एका कुटुंबात राहिल्याचा भाव तिथे सतत जाणवत असतो. सभागृहात वादविवाद होतात; पण सेन्ट्रल हॉलमध्ये सगळे एकमेकात मिसळतात. गुलाम नबी आझाद यांना निरोप देताना पंतप्रधान मोदी यांना तर अश्रू आवरले नाहीत. त्यांनी काही प्रसंग वर्णन केले. उत्तरादाखल बोलताना गुलाम नबी यांनी दोन्ही हात जोडले तेव्हा वाटले स्नेहबंधनाने हे दोघे जोडलेले आहेत. संसदीय मतभेद बाजूला राहिले. संसदीय परिपक्वतेचा नजारा दोन्ही नेत्यांनी पेश केला. हे पाहताना मनात आले, संपूर्ण राजकारणावरच ही अशी स्नेहाची सावली तयार झाली तर भारताला शिखरस्थानी पोहोचण्यापासून कोण अडवू शकेल?

पण, दुर्दैवाची गोष्ट अशी की, सध्या देशातल्या राजकारणावर  कृष्णछाया  घोंघावते आहे. एक नेता दुसऱ्याची प्रशंसा करतो, असे सहसा दिसत नाही. उलट दुसऱ्यावर चिखलफेक करण्याची अहमहमिका मात्र लागलेली असते. ताजे उदाहरण पाहा : पंतप्रधानांनी आझाद यांची तारीफ करताच आझाद भाजपात जाणार   असल्याच्या वावड्या लगोलग उठल्या. काँग्रेसवरच्या  त्यांच्या निष्ठेवर कधी प्रश्नचिन्ह उमटले नव्हते. पण, आता दिवसच  असे आले, की कोणीही उठतो आणि कुणावरही शंका घेतो. पक्षनिष्ठा सांभाळून त्यापलीकडचे राजकारण होत असे, ते दिवस जणू विस्मरणातच गेले आहेत! तरुण अटलजी पहिल्यांदा संसदेत आले तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू इतके प्रभावित झाले की, त्यांनी अटलजींना आणखी बोलण्यासाठी प्रेरित केले. आता विरोधी पक्षांना कसे बोलू द्यायचे नाही, यासाठी व्यूहरचना होत असते. लोहिया आणि त्यांच्यासारखे नेते नेहरूंचे कट्टर विरोधक होते. पण नेहरू त्यांचे बोलणे ऐकत. काळाबरोबर या अशा परंपरा धूसर होत चालल्या आहेत. 

राजकारणातील शुचिता पुनर्स्थापित करण्याची आज कधी नव्हती इतकी गरज आहे. सामान्य लोकांचे जगणे सुकर करून देशाला पुढे नेणे हेच तर प्रत्येक राजकीय पक्षाचे उद्दिष्ट असते. सगळ्यांचे गंतव्य एक असेल तर एकमेकांबद्दल शत्रुवत व्यवहार का व्हावा? - असे सुडाचे राजकारण या देशातल्या मतदारालाही पसंत नाही. विचारधारा वेगवेगळ्या असल्या तरी राजकीय पक्षांनी एकमेकांशी प्रेमपूर्ण व्यवहार करण्याची  गरज आहे. देशात प्रेमाची रसधारा वाहिली तर जगातली कोणतीही ताकद आपल्याला कमी लेखू शकत नाही. आपली सगळ्यांची घोषणा एकच असली पाहिजे... 
जय हिंद !
 

Web Title: What if this feud died in politics? Tears came to Modi's eyes while bidding farewell to Ghulam Nabi Azad from Rajya Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.