गंगा नदीच गतप्राण झाली तर?
By विजय दर्डा | Published: October 15, 2018 06:13 AM2018-10-15T06:13:07+5:302018-10-15T11:22:40+5:30
पूर्वी भारतात सरस्वती नावाची एक नदी होती. सुमारे चार हजार वर्षांपूर्वी ही नदी मृत झाली.
पूर्वी भारतात सरस्वती नावाची एक नदी होती. सुमारे चार हजार वर्षांपूर्वी ही नदी मृत झाली. ही सरस्वती नदी हल्लीच्या हरियाणा, पंजाब व राजस्थानच्या भागातून वाहत असे. या नदीचा मृत्यू नेमका कसा झाला हे माहीत नाही. मात्र या सरस्वती नदीवरील भारतीयांची श्रद्धा एवढी दृढ आहे की, आजही ही नदी जमिनीखालून वाहत आहे व ती अलाहाबाद येथे गंगा व यमुनेला जाऊन मिळते, असे मानले जाते. म्हणून त्या ठिकाणाला त्रिवेणी संगम असेही म्हटले जाते. ही सरस्वती नदी नेमकी कुठून वाहत असे हे शोधण्याचाही वैज्ञानिकांनी प्रयत्न केला. काही वर्षांपूर्वी तर या लुप्त झालेल्या सरस्वती नदीचे पुनरुज्जीवन करण्याच्याही वल्गना केल्या गेल्या. पण त्यादृष्टीने फारसे खास काही घडले नाही!
गंगा नदी हा सध्या सर्वात चिंतेचा विषय आहे. अडीच हजार किमीहून अधिक दूरवर वाहणाऱ्या गंगेचे २,०७१ किमीचे पात्र भारतात व बाकीचे बांगलादेशात आहे. भारतातील सुमारे १० लाख चौ. किमीचा प्रदेश गंगेचे खोरे म्हणून ओळखला जातो. काठावरील शेकडो गाव-शहरांमधील कोट्यवधी लोकांची तहानही हीच नदी भागविते. गंगेच्या पाण्यात ‘बॅक्टिरियोफेज’ नावाचे विषाणू आहेत जे अन्य हानिकारक विषाणू व सूक्ष्मजीवांचा संहार करतात. म्हणूनच गंगेला जीवनदायिनी मानले गेले आहे व जगातही तिला श्रेष्ठ नदीचा दर्जा आहे. पण आपण करंटेपणा करून गंगा नदी एवढी प्रदूषित केली आहे की, हरिद्वारच्या पुढे उन्नावपर्यंत तिचे पाणी पिण्यायोग्य व आंघोळ करण्याच्या लायकीचे राहिलेले नाही. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने यंदा जुलैमध्येच एका विस्तृत अभ्यासानंतर हा निष्कर्ष काढला. हरित न्यायाधिकरणाने म्हटले की, गंगा इतकी खराब झाल्याची माहिती नसल्याने लाखो भाविक आजाणतेपणी ते पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात व पवित्र मानून त्यात स्नान करतात. न्यायाधिकरणाने असेही म्हटले की, धूम्रपानाने व तंबाखूच्या सेवनाने कर्करोग होत असल्याने या उत्पादनांच्या पाकिटांवर तसा इशारा ठळकपणे छापण्याची सक्ती केली गेली आहे. तसाच इशारा गंगेच्या पाण्याविषयी सामान्य लोकांनाही द्यायला हवा. त्या ठिकाणचे पाणी पिण्यासाठी व स्नानासाठी योग्य आहे की नाही याची माहिती देणारे फलक गंगेच्या काठी प्रत्येक १०० किमी अंतरावर लावले जावेत.
मी बालपणी स्वच्छ व निर्मळ गंगा पाहिलेली आहे. अलाहाबादचा संगम व बनारसचे घाट पाहिले आहेत. आज मी गंगा पाहतो तेव्हा मन घोर चिंतेने व्याकूळ होते. ज्या गंगामातेने माणसाला आपल्या काठी जीवन जगण्यासाठी भरभरून दिले, त्याची अख्खी संस्कृती अंगा-खांद्यावर फुलविली त्याच माणसाने गंगेला मृत्युपंथावर आणून सोडावे, या विचाराने मन विषण्ण होते. एका अंदाजानुसार अजूनही दररोज २.९० कोटी लीटर सांडपाणी गंगेत सोडले जाते.
गंगा नदी गंभीर आजारी अहे, असा स्पष्ट इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. नदीच्या पाण्यात जलचर सजीव जगण्यासाठी ‘बोयोलॉजिकल आॅक्सिजन’चे प्रमाण ३ डिग्री असायला हवे, ते गंगेत ६ डिग्रीपर्यंत वाढले आहे. दुसरीकडे तापमानवाढीचाही गंगेवर दुष्परिणाम होत आहे. सन २००७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात असे भाकीत केले गेले होते की, गंगेला निरंतर जलपूर्ती करणारे हिमालयातील हिमनग सन २०३०पर्यंत वितळून संपून जातील. म्हणजे स्थिती एकूणच खूपच गंभीर आहे.
पण देशातील कोट्यवधी लोकांचे जीवन जिच्यावर अवलंबून आहे त्या गंगेविषयी आपल्या सरकारला पुरेशी काळजी आहे का, हाही प्रश्न आहे. मला तर यात कमतरता दिसते. गंगेला वाचविण्यासाठी जे लोक संघर्ष करताहेत त्यांची दखलही सरकार घेत नाही. त्यांना उपेक्षेची वागणूक दिली जाते. ‘गंगापुत्र’ म्हणून ओळखले जाणारे ्प्रा. जी. डी. अगरवाल गंगा शुद्धीकरणासाठी १११ दिवस उपोषण करत राहिले. तरी सरकारने काहीही केले नाही. शेवटी या उपोषणातच प्रा. अगरवाल यांनी गंगेसाठी प्राणाहुती दिली. यावरून सरकारवर कोणी हल्लाबोल केल्याचेही दिसले नाही. मला असे वाटते की, आपल्या सरकारच्या अग्रक्रमांमध्ये नद्यांना स्थान नाही. गंगा नदी गतप्राण झाली तर ते एक राष्ट्रीय संकट असेल. कारण गंगा ही असंख्य प्रादेशिक उपनद्यांचीही पोषणकर्ती आहे. यमुना तर मृत झाल्यातच जमा आहे. निदान गंगेला तरी वाचविण्याची सुबुद्धी सरकारला व्हावी, एवढीच अपेक्षा!
आणखी एक महत्त्वाची गोष्ट कोणत्याही देशाचे जीवन नद्यांवर अवलंबून असते. जगभर फिरताना मी पाहिले आहे की, मोठ्या शहरांमधून वाहणाºया नद्यांचे पाणीही तळ स्पष्ट दिसावा एवढे तेथे स्वच्छ असते. अमेरिका, इंग्लंड, रशिया या अन्य अनेक देशांत नद्यांचे संरक्षण हे काम संपूर्ण देश समर्पित भावनेने करताना दिसते. मनात येते की, मग आपल्यालाच ते का जमू नये? विदेशांमध्ये नद्या हे वाहतूक आणि परिवहनाचेही मुख्य माध्यम असतात. जगातील ३५ टक्के वाहतूक जलमार्गाने होते. पूर्वी आपल्याकडेही गंगेतून खूप वाहतूक व्हायची. पण आता ती जवळजवळ बंद झाली आहे. केंद्रीय जलसंपदा, नदी विकास आणि गंगा शुद्धीकरणमंत्री नितीन गडकरी यांनी खूप प्रयत्न केले. पण त्यांच्याकडे वेळ फार कमी आहे. नितीन गडकरीजींचे स्वप्न साकार होवो, या सदिच्छा!