बोन ऑसिफिकेशन टेस्ट म्हणजे काय? ही चाचणी कशी केली जाते? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 08:23 AM2024-10-20T08:23:45+5:302024-10-20T08:24:16+5:30

वैद्यकीय विश्वात वय उघडकीस आणणारी वैद्यकीय चाचणी उपलब्ध असून त्याला वैद्यकीय भाषेत बोन ऑसिफिकेशन टेस्ट असे म्हणतात.

What is Bone Ossification Test How is this test done Read in detail | बोन ऑसिफिकेशन टेस्ट म्हणजे काय? ही चाचणी कशी केली जाते? वाचा सविस्तर

बोन ऑसिफिकेशन टेस्ट म्हणजे काय? ही चाचणी कशी केली जाते? वाचा सविस्तर

- डॉ. गजानन चव्हाण, उपअधिष्ठाता आणि प्राध्यापक, न्यायवैद्यक शास्त्र, जे जे रुग्णालय

अनेकांना वय विचारले तर तत्काळ जन्मदाखल्याचा आधार घेऊन कुणीही आपले वय सांगत असतात. मात्र गुन्हेगारी कृत्यात सहभागी असलेली व्यक्ती आपले खरे वय पोलिसांना सांगत नाही. अनेकदा सज्ञान आरोपी आपली शिक्षा कमी करण्यासाठी किंवा त्या कारवाईचे स्वरूप बदलण्याकरिता अल्पवयीन असल्याचे सांगतो. मात्र वैद्यकीय विश्वात वय उघडकीस आणणारी वैद्यकीय चाचणी उपलब्ध असून त्याला वैद्यकीय भाषेत बोन ऑसिफिकेशन टेस्ट असे म्हणतात. न्यायवैद्यकशास्त्र तज्ज्ञ (फॉरेन्सिक) हाडांच्या निर्मितीची नैसर्गिक प्रक्रिया ओळखून व्यक्तीचे वय शोधून काढत असतात. नेमकी ही चाचणी कोण आणि कशा पद्धतीने करतात, यावर प्रकाश टाकणारा हा लेख.

सबंध देशात मोठ्या गुन्ह्याची उकल करताना आरोपीचे वय शोधून काढण्यासाठी ही चाचणी म्हणजे एक भक्कम पुरावा वैद्यकीय तज्ज्ञांचे साहाय्याने पोलिसांना मदत करत असतो.

वय तपासणीची गरज वैद्यकीय, फौजदारी आणि दिवाणी प्रकरणातील कारणासाठी आवश्यक असते. न्यायवैद्यक शास्त्रात वैयक्तिक ओळख या प्रकरणात पदवीपूर्वच्या (एमबीबीएस) विद्यार्थ्यांना या विषयाची तोंडओळख करून दिली जाते. तर पदव्युत्तर शिक्षणात एम. डी. फॉरेन्सिक मेडिसिन घेणाऱ्या डॉक्टरांना वय तपासणीबाबत संपूर्ण शिक्षण देऊन तज्ज्ञ केले जाते. ही ज्ञानशाखा वैद्यकशास्त्रात अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषतः गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांची उकल करण्यासाठी.

या चाचणीत हाडांच्या निर्मितीची नैसर्गिक प्रक्रियेचा अभ्यास फार महत्त्वाचा असतो. यामध्ये मानवी शरीरात असलेल्या सर्व हाडांच्या नैसर्गिक वाढीचा अभ्यास केला जातो. वेगवेगळ्या होणाऱ्या बदलाच्या नोंदी यावेळी घेतल्या जातात.

कशी होते चाचणी?

अनेकदा वैद्यकीय महाविद्यालयातच ही तपासणी न्यायवैद्यक शास्त्र विभागामार्फत केली जाते. त्यात शारीरिक तपासणी, क्ष किरण तपासणी आणि दंत परीक्षण करून ही चाचणी पूर्ण करता येते. शारीरिक तपासणीत शरीरात होणाऱ्या बदलांची नोंद घेतली जाते. यामध्ये वजन, उंची तसेच पौंगडावस्थेत होणाऱ्या शारीरिक बदलाची नोंद घेतली जाते. दंत परीक्षणात अस्थायी आणि स्थायी दात  (तात्पुरते आणि कायमस्वरूपी) या दोन प्रकारच्या दातांचा अभ्यास करून वयाबद्दलचा अंदाज घेता येतो. अक्कल दाढ १७ ते २५ वर्षांच्या वयात जबड्यात दिसून येते. जर अक्कल दाढ आहे तर निश्चित त्या व्यक्तीचे वय १७ पेक्षा जास्त आहे. या दाताच्या परीक्षणातून वयाचा अंदाज घेता येतो.

 कोणत्या वयात कोणते हाड किती पद्धतीने वाढते याचा अभ्यास न्यायवैद्यक तज्ज्ञांचा असतो. मानवाची नैसर्गिक वाढ ही त्याच्या आहार, नैसर्गिक अधिवास व तत्सम बाबींवर अवलंबून असते. या सर्व बाबींचा अभ्यास न्यायवैद्यक शास्त्रातील वय तपासणी या प्रकरणात केला जातो.

 हाडामधील हाताचे आणि पायाचे हाड मोठे हाड या प्रकारात मोडतात. या हाडांमध्ये तीन भाग असतात. शरीराची वाढ होताना यापैकी दोन हाडांमध्ये वाढ होत असते. यासाठी त्याची क्ष किरण चाचणी करावी लागते. नैसर्गिकरीत्या मनुष्याची वाढ ही सांधे असलेल्या ठिकाणी होत असते. याप्रमाणे खांदा, कोपर, मनगट, कमरेचा सांधा, गुडघा याचे क्ष किरण चाचणी केली जाते. आवश्यक असणाऱ्या सर्व हाडाचे एक्स रे केले जातात.  शारीरिक तपासणी, दंत तपासणी आणि एक्स रे तपासणी म्हणजेच शारीरिक बदल, दातांमध्ये होणारे बदल आणि हाडांमध्ये होणारे बदल या सर्व गोष्टीचा वैद्यकीय पातळीवर विस्तृत अभ्यास  करून वयाचा अभिप्राय देणे शक्य होते. ते वय निश्चित वयाच्या जवळपास जाणारे असते. निश्चित वय सांगणे शक्य नसले तरी प्रचलित कायदेशीर प्रक्रियेला दिशादर्शक असे काम करणे शक्य आहे.

वय तपासणीचे आदेश कोण देऊ शकते?

दिवाणी प्रकरणात वय तपासणीबाबत आवश्यकता वाटल्यास न्यायालयाच्या आदेशानुसार वय तपासणी करता येते. फौजदारी प्रकरणात वय निश्चित होणे हे एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. गुन्हेगार जर सज्ञान नसेल तर त्याला बालन्यायालयात हजर करून पुढील कार्यवाही करावी लागते.

Web Title: What is Bone Ossification Test How is this test done Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.