मुंबई लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या गर्दीवर उतारा काय? रेल्वे प्रशासनाने नेहमीप्रमाणेच उदासीन

By सचिन लुंगसे | Published: August 12, 2024 08:44 AM2024-08-12T08:44:51+5:302024-08-12T08:45:59+5:30

मेल-एक्स्प्रेसच्या लाइनवरून लोकलला वाट दिली असती तर ठिकठिकाणच्या प्लॅटफॉर्मवर झालेली गर्दी मोकळी झाली असती.

What is the antidote to Mumbai local and platform congestion The railway administration is indifferent as always | मुंबई लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या गर्दीवर उतारा काय? रेल्वे प्रशासनाने नेहमीप्रमाणेच उदासीन

मुंबई लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या गर्दीवर उतारा काय? रेल्वे प्रशासनाने नेहमीप्रमाणेच उदासीन

- ताजा विषय : सचिन लुंगसे, उप-मुख्य उपसंपादक

ओव्हरहेड वायर तुटून किंवा लोकल रुळावरून घसरून झालेल्या गोंधळानंतर दादरपासून ठाण्यापर्यंतच्या प्लॅटफॉर्मवर झालेल्या गर्दीने नुकतेच मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले. मात्र याच काळात मेल-एक्स्प्रेसच्या लाइनवरून लोकलला वाट दिली असती तर ठिकठिकाणच्या प्लॅटफॉर्मवर झालेली गर्दी मोकळी झाली असती. मात्र, रेल्वे प्रशासनाने यापैकी काहीच केले नाही. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे येथील प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणासाठी घेण्यात आलेल्या मोठ्या ब्लॉकनंतर किमान आठवडाभर लोकल प्रवाशांचे हाल झाले. तेव्हापासून प्रवाशांच्या पाठीमागे लागलेली साडेसाती अजून संपलेली नाही. ओव्हरहेड वायरवर बांबू पडत आहेत. रेल्वे रुळाला तडे जात आहेत. ओव्हरहेड वायर तुटत आहे आणि यात लोकल प्रवासी लटकून घरी जात आहेत. गेल्या आठवड्यात ठाकुर्ली आणि कल्याणदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली आणि डाऊन दिशेने घरी जाणारे नोकरदार  प्लॅटफॉर्मवर लटकले. घाटकोपरला प्लॅटफॉर्मपासून जिन्यांवरही प्रवाशांची गर्दी झाली होती. अशावेळी एखादी दुर्घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण? या प्रश्नाचे उत्तर रेल्वे कधीच देत नाही.

घाटकोपर रेल्वे स्थानक हे मेट्रो मार्गाला जोडले गेले आहे. या मेट्रो मार्गावर दररोज  सुमारे साडेचार लाख प्रवासी प्रवास करतात. सकाळी, सायंकाळी आणि रात्री लोकल व मेट्रोचे असे प्रवासी मिळून गर्दीत भर पडते. साहजिकच लोकलच्या खोळंब्यानंतर एवढ्या मोठ्या गर्दीला सामावून घेण्यात प्लॅटफॉर्म कमी पडतात. यावर उपाय म्हणून स्थानकांवरील पूल, जिने रुंद असणे गरजेचे आहे. घाटकोपर, परळ रेल्वे स्थानक चकाचक करताना या गोष्टींचा विचार करण्यात आला असला, तरी सर्वच स्थानकांवर याची गरज आहे. रेल्वे स्थानकांची रंगरंगोटी करतानाच लोकल फेऱ्या वाढविण्यासोबत रेल्वे लाइनच्या रखडलेल्या विस्तारीकरणावरही सातत्याने भर दिला पाहिजे. रेल्वे लाइनच्या विस्तारीकरणासाठी केवळ २०१५-१६ चे जुने प्रस्ताव नव्याने चर्चेत आणण्यापेक्षा रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला पाहिजे.

रेल्वे प्रशासनाने याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून किंवा प्रवासी संघटनांच्या मदतीने गर्दीवर उतारा काढला पाहिजे. मात्र मध्य रेल्वे आपल्या कामकाजाचा पाढा प्रत्येकवेळी जनसमुदायासमोर मांडते. आमचा पसारा मोठा आहे, कामाला वेळ लागणार, असे रडगाणे गाते. पश्चिम रेल्वेशी आमची तुलना करू नका, असेही सांगते. मात्र गर्दी कमी करण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीमध्ये तोडगा शोधत नाही ही वस्तुस्थिती आहे.

काय करता येईल?

सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी मेल आणि एक्स्प्रेसऐवजी लोकलला प्राधान्य द्यावे. लोकलसाठी बांधण्यात आलेल्या ट्रॅकवर फक्त लोकल चालविण्यात याव्यात, मेल एक्स्प्रेस तत्काळ थांबविण्यात याव्यात. वर्षोनुवर्षे रखडलेले प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे. यांत्रिक बिघाड, तांत्रिक कारण, मालगाडी, मेल, लोकल रुळावरून घसरल्याने किंवा इतर कारणाने लोकल सेवा रखडली तर आपत्कालीन परिस्थिती जाहीर करावी.

अशावेळी मेलसाठी असलेल्या ट्रॅकवरूनही अतिरिक्त लोकल ट्रेन सोडण्यात याव्यात. लोकल सेवेसाठी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, हार्बर, ट्रान्सहार्बर, एमआरव्हीसी मिळून वेगळे संयुक्त प्राधिकरण करण्यात यावे, जेणेकरून रेल्वे स्थानकांवरील गर्दी कमी होईल.

Web Title: What is the antidote to Mumbai local and platform congestion The railway administration is indifferent as always

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.