मध्यपूर्वेतील बेभान हल्ले-प्रतिहल्ल्यांचा अर्थ काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2024 07:55 AM2024-10-08T07:55:25+5:302024-10-08T07:57:13+5:30

यापुढे पॅलेस्टिनी प्रतिकार दहशतवादाच्या रूपात असेल, ते गनिमी काव्याने लढतील. इस्रायली जनता यापुढे कधीही रात्री स्वस्थ झोप घेऊ शकेल, असं वाटत नाही.

what is the meaning of senseless attacks counter attacks in the middle east | मध्यपूर्वेतील बेभान हल्ले-प्रतिहल्ल्यांचा अर्थ काय?

मध्यपूर्वेतील बेभान हल्ले-प्रतिहल्ल्यांचा अर्थ काय?

निळू दामले, ज्येष्ठ पत्रकार

एक वर्षापूर्वी ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासचे सैनिक इस्रायलमधे घुसले. त्यांनी सुमारे १५०० माणसं मारली आणि २५० माणसं ओलिस ठेवली. इस्रायलनं प्रत्युत्तर दिलं. गाझावर आक्रमण केलं. गेल्या वर्षभरात अधिकृत आकडेवारीनुसार ४७ हजार माणसं तिथं मेली, अजून शंभरेक ओलिस गाझात शिल्लक आहेत. इस्रायल आणि गाझापुरता मर्यादित असलेला संघर्ष आता पसरू पाहत आहे. कुणी कुणी तिसऱ्या महायुद्धाचाही धोका असल्याचं बोलताहेत. पण ते शक्य वाटत नाही. गाझावरच्या हल्ल्याबद्दलची नाराजी दाखवण्यासाठी इराणनं इस्रायलवर २०० रॉकेटं सोडली. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनं लेबनॉनवर हवाई आणि खुष्कीचं आक्रमण केलं. त्यात दहा लाख लेबनीज बेघर झाले आणि १६०० मेले.

इराणच्या अली खामेनी यांनी शुक्रवारच्या मशिदीतल्या बयानात म्हटलं की, इस्रायलला लेबनॉनवरचे हल्ले महाग पडतील. त्यावर इस्रायलचे नेतान्याहू म्हणाले की, इराणला त्यांनी टाकलेली रॉकेटं महाग पडतील. इस्रायलनं इराणवर नेम धरला आहे. अमेरिकेचं आरमार भूमध्य समुद्रात सज्ज आहे. ते आरमार काहीही करू शकतं. इस्रायलचं संरक्षण करू शकतं, इराणवर हल्ला करू शकतं.

काय होईल? युद्ध आखाती प्रदेशात पसरेल? इराण, लेबनॉन, येमेन आणि गाझा अशी ही साखळी आहे. गाझावरचं इस्रायलचं आक्रमण इराणला मान्य नाही. इराणनं तशी नाराजी व्यक्त केलीय. पण स्वतः कारवाई न करता लेबनॉनमधली हस्तक संघटना हिजबुल्लाह आणि येमेनमधले बंडखोर हुती यांचा वापर इराणनं केलाय. हुतींनी लाल समुद्रात अमेरिका-इस्रायल यांच्यासाठी मालवाहतूक करणाऱ्या जहाजांवर रॉकेटं फेकली. लेबनॉनमध्ये पाय रोऊन बसलेल्या हिजबुल्लाहनं इस्रायलवर रॉकेटं फेकली. हे सारं इराणच्या मदतीनं आणि चिथावणीनं चाललं आहे हे साऱ्या जगाला माहीत आहे.

अशा स्थितीत इराणलाच धडा शिकवण्यावाचून इस्रायलला गत्यंतर नाही आणि तेच करण्याची तयारी इस्रायलनं केली आहे. इस्रायल दोन गोष्टी करू शकतं. इराणच्या अणुशस्त्र केंद्रांवर हल्ला किंवा/आणि इराणच्या तेल विहिरींवर हल्ला. इराण अणुबाँब तयार करण्याच्या खटपटीत आहे. ते इराणला जमलं तर इस्रायलवरचा दबाव वाढेल. पण असा हल्ला कठीण आहे. कारण अणुप्रक्रिया केंद्र जमिनीत खोलवर आहेत, अनेक ठिकाणी पसरलेली आहेत, तिथवर जाणं कठीण आहे. दुसरं असं की समजा केंद्रं उद्ध्वस्त केली तरीही त्यामुळं इराणचा अणुकार्यक्रम थांबणार नाही. कारण इराणकडं आता त्याचं तंत्रज्ञान आहे. इराण प्रक्रिया केंद्र पुन्हा उभारू शकेल. शिवाय अणुकेंद्रावर स्फोट होऊन काही गोंधळ झाला तर इस्रायललाच त्याचा त्रास होणार आहे.  इराणमधल्या तेल विहिरी, तेल प्रक्रिया केंद्रावर हल्ला करणं इस्रायलला सहज शक्य आहे. दूर पल्ल्याचे हल्ले करण्याचं तंत्र इस्रायलजवळ आहे. पण कोणतीही कारवाई केली तर इराण काय प्रत्युत्तर देईल ते कळायला मार्ग नाही. इराण थेट इस्रायलवरच हल्ला करू शकतो.
 
नुकतीच इराणनं इस्रायलवर सोडलेली रॉकेटं घातक ठरली नव्हती. इराणची माहिती असणारे जाणकार सांगतात की इस्रायलला चिमटा काढण्यासाठी इराणनं मुद्दामच अगदीच लुळा हल्ला केला होता. इराणनं प्रभावी हल्ला करायचं ठरवलं तर दोन देशांत युद्ध उद्भवेल. तसं घडलं तरी इराण, लेबनॉन, येमेन, गाझा एवढ्यापुरतंच युद्ध मर्यादित राहील. आज घडीला सीरिया, इराक, तुर्किये, इजिप्त, अरब अमिराती, सौदी अरेबिया या आखाती देशांना युद्ध करण्याची इच्छा नाही. बहुतेक देशांची अमेरिकेशी मैत्री आहे आणि इस्रायलशी संबंध आहेत. त्यामुळं वरीलपैकी कोणीही इराणच्या बाजूनं युद्धात उडी घेण्याची  शक्यता दिसत नाही.

नेतान्याहूंची खुमखुमी मात्र अजून शमलेली नसल्यानं इराणच्या तेल विहिरींवर हल्ला होण्याची शक्यता आहे. हा लेख प्रसिद्ध होताना कदाचित हल्ल्याला सुरुवातही झालेली असेल. नेतान्याहू बेभान आहेत. शहाणपणा आणि नेतान्याहू यात फारकत झालीय. गाझावर कितीही बाँब टाकले आणि लेबनॉनमध्ये कितीही माणसं मारली तरीही हमास संपणार नाही. इस्रायलनं पॅलेस्टाईन आणि वेस्ट बँक परिसरात केलेल्या अत्याचारांमुळं पॅलेस्टिनी माणसं त्रस्त आहेत. इस्रायल पॅलेस्टिनी गावं अजूनही गिळंकृत करत आहे. त्यावरचा राग हमासनं अत्यंत चुकीच्या पद्धतीनं व्यक्त केला, १५०० निष्पाप इस्रायली नागरिक मारले. पण त्याचा बदला म्हणून तब्बल ४७ हजार माणसं मारण्याचा परिणाम पॅलेस्टिनींवर खोलवर झालेला आहे. 

इथून पुढं पॅलेस्टिनी प्रतिकार दहशतवादाच्या रूपात असेल, गनिमी काव्यानं ते लढतील. इस्रायलची जनता इथून पुढं कधीही रात्रीची झोप स्वस्थपणे घेऊ शकेल, असं वाटत नाही. अमेरिकेला हे सारं समजतंय. इस्रायलमध्ये अमेरिका गुंतलेली आहे. अमेरिका शब्दबुडबुडेयुक्त निषेध आणि चिंता  व्यक्त करेल, बस. 

इराणच्या विहिरींवर हल्ला करणार अशी शक्यता व्यक्त झाली. तेलाचे आंतरराष्ट्रीय भाव ४ टक्क्यानं वाढले. हल्ला झाला तर भाव कडाडतील. याचा फायदा अमेरिकेला आणि रशियाला होणार आहे. म्हणजे तीही एक पर्वणीच म्हणायची. तेवढं होईल, मग युद्ध थांबेल.

इराण आणि इस्रायलला मोठं युद्ध करायची इच्छा नाहीये. दोन्ही देशांच्या प्रमुखांची खुमखुमी शमवण्यापुरतंच काहीतरी होण्याची शक्यता जास्त दिसते.

damlenilkanth@gmail.com
 

Web Title: what is the meaning of senseless attacks counter attacks in the middle east

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.