सत्ता-संपत्तीला ओलांडून जाणारे ‘सामर्थ्य’ कोणते?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 09:29 AM2023-07-15T09:29:16+5:302023-07-15T09:29:31+5:30

केवळ नाचण्याने नर्तक होता येत नाही. खूप वर्षांच्या साधनेनंतर नाचणारे शरीर बाजूला होऊन केवळ नृत्य तेवढे उरते, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही नर्तक बनता!

What is the 'power' that transcends power-wealth? | सत्ता-संपत्तीला ओलांडून जाणारे ‘सामर्थ्य’ कोणते?

सत्ता-संपत्तीला ओलांडून जाणारे ‘सामर्थ्य’ कोणते?

googlenewsNext

डॉ. सोनल मानसिंग, खासदार, ख्यातनाम ओडिसी नर्तिका

भारतातील शास्त्रीय नृत्याची प्रदीर्घ परंपरा, त्याभोवती गुंफलेली संस्कृती आणि त्यातून तयार होणारी भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ हा विषय अतिशय दुर्लक्षित असला, तरी खूप महत्त्वाचा आहे. भारतीय संस्कृती जगणे समृद्ध करते. भौतिक सुखांच्या मागे धावणे हा एकच मार्ग माहिती असलेल्या जगाला देण्यासारखे बरेच काही भारताकडे आहे, आनंद देणाऱ्या वेगळ्या वाटा दाखवण्याचे सामर्थ्य आहे; त्यात नृत्य हे फार फार महत्त्वाचे अंग होय! पाय आहेत आणि दिशा दिसतात, कुठेतरी जाण्याची ओढ असते, म्हणून केवळ प्रवास करत राहणे वेगळे आणि यात्रा करणे यात खूप फरक आहे. यात्रा करताना नजरेसमोर एक ध्येय असते. 

पंढरीच्या वारीला जाणारा वारकरी हा प्रवासी नसतो, तो यात्रेकरू असतो, तो याच अर्थाने! केवळ प्रवासाची झिंग माहिती असलेल्या जगाला यात्रेतून मिळणाऱ्या अवर्णनीय सुखाची अनुभूती देणारे अनेकानेक मार्ग ही भारताच्या  ‘सॉफ्ट पॉवर’ची वेगवेगळी अंगे आहेत. नृत्य हे त्यातले  एक. ते प्रवासाकडून यात्रेकडे नेते!  रोजच्या जगण्यापेक्षा वेगळी यात्रा, वेगळे ध्येय नृत्यसाधनेत अनुस्यूत आहे. आपण नर्तक कसे बनतो? केवळ नाचता येते म्हणून नर्तक होता येत नाही. नृत्य शिकताना तुम्ही शिकणारे होऊ शकाल किंवा चांगले सादरकर्ते होऊ शकाल... पण नृत्यात खूप वर्षांची साधना केल्यानंतर जेव्हा तुमच्यातील नाचणारे शरीर बाजूला होऊन केवळ नृत्य तेवढे उरते, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही नर्तक बनलेले असता.

आपल्या संगीतातून, नृत्यातून केवळ आनंद पसरवला जातो. नृत्य केल्याने आनंदमय शरीराचा अनुभव आपल्याला येतो. सुख, आनंद आणि आत्मबोध या तिन्ही गोष्टी नृत्य कलेतून भरभरून मिळतात. नृत्ययोग हादेखील अतिशय अविस्मरणीय अनुभूती देणारा प्रकार आहे. आत्मबोधासाठी नृत्य हा सहज, सार्थक, सशक्त मार्ग आहे. संस्कृतीला इंग्रजीत ट्रॅडिशन म्हटले जाते आणि हिंदीमध्ये परंपरा. परंपरा आणि रूढी हे दोन शब्द आपल्याकडे एकाबरोबर एक जोडून येतात; पण ते तसे नाही. परंपरा ही गुरू-शिष्याची असते, जी पुढे-पुढे चालत जाते. पण रूढी याचा अर्थ एकाच ठिकाणी रूतून बसणे. जी एकाच ठिकाणी घट्ट रूजलेली असते, ती रुढी! परंपरा ही सतत पुढे वाहत जाणाऱ्या नदीच्या प्रवाहासारखी असते.

मी नृत्य शिकले, त्याबद्दल मला  अवघ्या आयुष्यात कोणतेही प्रमाणपत्र मिळाले नाही, कोणतेही इनाम मिळाले नाही, या शिकण्याच्या प्रवासात हातावर छड्या मात्र मिळाल्या. माझ्या गुरुने मला छडीने शिकवले. कुठे चुकले की, ते लगेच शिक्षा करायचे. छडी दाखवायचे. त्यातून मी शिकत गेले. ही खरी गुरू-शिष्य परंपरा असते. शिकत शिकत, चुका सुधारत, मिळेल ते नवे घेत पुढे जाणे. गुरुंच्या शिकवणीमुळे मी आज वयाच्या ८० व्या वर्षीदेखील उभी आहे आणि नृत्य करू शकते. ही माझ्या गुरुंचीच कृपा आहे. जगात कोणाकडेही नाही असा जो अमूल्य ठेवा भारताकडे आहे, त्यातला एक दागिना म्हणजे भरतमुनींचे नाट्यशास्त्र!  नाट्यशास्त्रात सर्व काही आहे, त्यात काय नाही?- त्यामध्ये कला, ज्ञान, योग, भावना, भाव आहे. नृत्यामध्येही हे सर्व आहे. 

तुम्ही नृत्य करताना डोळ्यांनी बोलता, डोळ्यांनी रागवता. डोळे हे नृत्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण कामगिरी करतात. भारतीय नर्तक हा आपल्या शरीराच्या सर्व अंगांचा वापर करतो. पायांच्या बोटांपासून ते डोळ्यांपर्यंत, हातापासून ते कंबरेपर्यंत एकूण एक अवयव  नृत्यात सामावून घेतलेला आहे. एका अर्थाने नृत्य हा योगच आहे! नृत्ययोग!! नृत्यातील अनेक शरीररचना योगशास्त्रातल्याच तर आहेत. नृत्यात हस्तमुद्रा असते. त्यातून बोटांचा व्यायाम होतो; पण आजकाल तरुणाईची बोटे इतरच साधनांवर आणि खरेतर हातात असलेल्या चमकत्या पडद्यावर फिरत असतात. 

मी पाहते, की  त्यांची बोटे सरळ होतच नाहीत. ती वाकडीच असतात. मोबाइल किंवा लॅपटॉपववर फिरणारी  बोटे कायम मुडपलेली दिसतात. हातामधील पाच बोटांमध्ये पंचतत्त्व आहेत, हे या पिढीने जाणले पाहिजे. त्या पंचतत्त्वांमुळेच तर आपण नमस्कार करताना दोन्ही हात एकमेकांना जोडतो. जगाशी जोडले जात असताना आपण आपले सामर्थ्य विसरता कामा नये. आणि हे जगाच्या व्यासपीठावर कोणाही एका देशाचे सामर्थ्य हे केवळ सत्तेचे, संपत्तीचेच असते असे नव्हे, हेही विसरता कामा नये. ‘इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन’च्या वतीने ‘इंडियन डान्स कल्चर ॲन्ड सॉफ्ट पॉवर’ या विषयावर पुणे येथे झालेल्या व्याख्यानाचा संपादित अंश. 

शब्दांकन : श्रीकिशन काळे

Web Title: What is the 'power' that transcends power-wealth?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.