टोकाची राजकीय आक्रमकता काय कामाची?

By किरण अग्रवाल | Published: August 4, 2024 12:08 PM2024-08-04T12:08:11+5:302024-08-04T12:09:54+5:30

Politics : राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या तरुणवर्गाने उद्दिष्टप्राप्तीचे भान राखणे गरजेचे

What is the use of extreme political aggression? | टोकाची राजकीय आक्रमकता काय कामाची?

टोकाची राजकीय आक्रमकता काय कामाची?

-  किरण अग्रवाल

 

राजकीय आंदोलनातील सहभागानंतर एका तरुण कार्यकर्त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला, ही घटना विषण्ण करणारीच आहे. या घटनेचे कोणतेही राजकारण न करता तरुण पिढीला आपण कोणती वाट दाखवीत आहोत, याचा विचार व्हायला हवा.

खरे तर राजकारणाच्या व्याख्या व उद्दिष्टे अलीकडच्या काळात बदलून गेली आहेत, तरी अंतिमत: ते करायचे कशासाठी? तर समाजाच्या व गाव- शहराच्या विकासासाठी, हे विसरता येत नाही; परंतु याच राजकारणातून एखाद्या उमेदीच्या तरुणाला जीव गमावण्याची वेळ येते तेव्हा दृष्टीआडच्या बाबींकडे लक्ष वेधले जाणे स्वाभाविक ठरते.

राजकारण हे केवळ निवडणुकीपुरते न राहता आता सदा सर्वकाळ, बारमाही स्वरूपाचे झाले आहे. आता आतापर्यंत एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवून लोक विकासासाठी मात्र हातात हात घेऊन काम करणारे नेते बघायला मिळत; मात्र असे राजकीय सामंजस्य आता दुर्मीळ होत चालले आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांची, टीका-टिप्पणीची पातळी व्यक्तिगत स्तरापर्यंत घसरली आहे. त्यामुळे अनावश्यकपणे एकमेकांकडे जणू शत्रू असल्यासारखे बघितले जाऊ लागले आहे. यात नेत्यांमध्ये प्रसंगी समझोते होतातही; परंतु स्थानिक पातळीवर कार्यकर्ते जे आपसांत भिडून परस्परांशी वैर पत्करून बसतात; ते सहजासहजी संपुष्टात येत नाही.

महत्त्वाचे म्हणजे, राजकीय अस्तित्वासाठीची उपक्रमशीलता गैर नसतेच; त्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ती प्रदर्शित होते तेव्हा भलेही सामान्यांचा त्यात सहभाग लाभो अगर न लाभो; परंतु ती टीकेची बाब ठरत नाही. अलीकडे मात्र सामान्यांच्या मुद्यांऐवजी पक्ष व नेत्यांबद्दलच्या निष्ठा व्यक्त करण्यासाठी आंदोलने होऊ लागली आहेत. ती करतानाही जेव्हा भान न बाळगता आक्रमकताच अंगीकारली जाते तेव्हा अनपेक्षित प्रकार घडून येतात जे नेत्यांसाठी भलेही सुखावह ठरत असतील; परंतु सामान्यांमध्ये मात्र प्रश्न निर्माण करणारेच ठरतात. राजकारण व राजकारण्यांबद्दलची ‘निगेटिव्हिटी’ वाढण्यासच त्यामुळे मदत होते. दृष्टीआडच्या या बाबी आहेत; पण त्याबद्दल गांभीर्याने कोणीही विचार करताना दिसत नाही.

आमदार अमोल मिटकरी यांनी ‘मनसे’चे नेते राज ठाकरे यांच्यावर टीका करताना कथित आक्षेपार्ह शब्द वापरल्याने अकोल्यात त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. यावेळी मिटकरी यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. यात आरोपी ठरलेले सर्वच कार्यकर्ते काही पूर्णवेळ राजकारण करणारे नाहीत. आपला उदरनिर्वाह, चरितार्थ चालवून राजकारणाद्वारे काही चांगले करून दाखविण्याची धडपड करणारे कार्यकर्ते आहेत; पण आततायीपणा करून बसले. कोणाच्या सांगण्याला भरीस पडून त्यांच्याकडून हे कृत्य घडले व कारवाई वगैरे बाबी हा पोलिसांच्या तपासणीचा भाग आहे; पण अकोल्यासारख्या ठिकाणीही अशा पातळीपर्यंत राजकारण घसरते, हे शोचनीयच म्हणायला हवे.

याच आंदोलनात सहभागी एक तरुण, जो वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून भविष्याची स्वप्ने रंगवण्याच्या वयात होता. त्याला घटना घडून गेल्यानंतर अचानक अस्वस्थता वाटू लागली व त्यातच पुढे हृदयविकाराने त्याचा जीव गेला, ही अतिशय दुःखद घटना! नेमके काय व कशामुळे झाले, हे तपासात पुढे येईलच; परंतु जे घडले ते दुर्दैवी आहे. राजकारण व अनुषंगिक बाबी ठेवा बाजूला; पण एक तरुण जीव असा गमावला गेला व संबंधित कुटुंबीयांवर हकनाक दुःखाचा डोंगर कोसळला; ही यानिमित्ताने राजकीय प्रवाहात अनायासे ओढले जाणाऱ्या तरुणांसाठी आत्मपरीक्षण करायला लावणारी बाब ठरली आहे.

जय मालोकार या तरुणाच्या मृत्यूचे राजकारण अजिबात कुणी करू नये, पक्षाचे लेबल चिकटवूनही त्याकडे कोणी पाहू नये. पाहायचेच तर एवढेच पाहा की, एका वेगळ्या आशा-अपेक्षेतून, ऊर्मीतून जो तरुणवर्ग राजकारणाकडे वळू पाहतो आहे त्या तरुणाईत याच स्तंभाच्या प्रारंभी म्हटल्याप्रमाणे राजकारण करायचे कशासाठी? यासंबंधीची जाण व भान कसे जागविता येईल? कारण बाकी काहीही होऊ द्या; पण जीव जाण्यास यत्किंचितही कारण ठरणारे राजकारण घडता कामा नये.

सारांशात, व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपांच्या व असंवैधानिक मार्गाचा अवलंब घडून येणाऱ्या राजकारणातून कुणाचेही भले होत नसते. तरुणवर्गाने वाहवत जाऊन राजकारण करण्याऐवजी यासंबंधीचे भान बाळगणे गरजेचे आहे.

Web Title: What is the use of extreme political aggression?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.