आपली मुलं कोणत्या माध्यमात शिकतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 04:50 AM2018-12-08T04:50:58+5:302018-12-08T04:51:14+5:30

मातृभाषेतील शिक्षणाच्या बाजूने समाजाला उभे करणे हे कितीही आव्हानात्मक असले तरी आजच्या प्रतिकूल परिस्थितीत याकरता जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

In what medium do our children learn? | आपली मुलं कोणत्या माध्यमात शिकतात?

आपली मुलं कोणत्या माध्यमात शिकतात?

Next

- डॉ. वीणा सानेकर
मातृभाषेतील शिक्षणाच्या बाजूने समाजाला उभे करणे हे कितीही आव्हानात्मक असले तरी आजच्या प्रतिकूल परिस्थितीत याकरता जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठीप्रेमी पालक महासंमेलन हा असाच एक सकारात्मक प्रयत्न आहे. मराठी शाळा हा मराठीच्या अस्तित्वाचा कणा आहे या धारणेतून मराठी अभ्यास केंद्राने सहयोगी शाळा व सहयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या वर्षापासून हे महासंमेलन सुरू केले.
गेल्या वर्षी मुंबईतील मध्य उपनगरात सायन येथे पहिले महासंमेलन झाले आणि या वर्षी गोरेगाव येथील महाराष्ट्र विद्यालयात येत्या ८ व ९ डिसेंबर रोजी संमेलनाचे भव्य आयोजन केले गेले आहे. ८ तारखेला मराठी शाळा जागर फेरीपासून संमेलनाची सुरुवात होईल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख संमेलनाचे उद्घाटन करतील. तर महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई प्रमुख पाहुणे असतील. गेल्या वर्षीच्या संमेलनात ‘शिक्षणाच्या माध्यमाबाबत आई म्हणून माझी भूमिका’ या विषयावर मत मांडणाऱ्या अभिनेत्री चिन्मयी सुर्वे यांची उपस्थिती या पालक संमेलनास आहे.
मातृभाषेतून शिकून विविध क्षेत्रांमध्ये यश प्राप्त केलेल्या यशवंतांशी संवाद हे या संमेलनातले महत्त्वाचे सत्र आहे. तसेच मराठी शाळांमध्ये महानगरापासून ग्रामीण भागापर्यंत वेगवेगळ्या शाळांमध्ये शिक्षणातले विविध प्रयोग करणाºया शिक्षकांचे प्रयोग सर्वदूर पोहोचणे, त्यांची चर्चा होणे, मराठी शाळांच्या सक्षमीकरणाकरता नावीन्यपूर्ण उपायांचा शोध घेणे गरजेचे आहे. संमेलनाच्या दुसºया दिवशी या विषयावरील सत्रात बेळगाव, नांदेड, कराड येथील मराठी शाळांकरता मूलभूत काम करणारे अर्जुन कोळी, शिवाजी आंबुलगेकर, गोविंद पाटील यांसारखे शिक्षक सहभागी होत आहेत. या सत्रात ग्राममंगलच्या माध्यमातून ज्ञानरचनावादी शिक्षणाची पायवाट घालून देणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे सहभागी होत आहेत. कोणत्या भाषेत आपल्या मुलांना शिकवायचे याचा अधिकार आईला असतो का? किंवा महाराष्ट्रात घराघरातील मातांचा शिक्षणाचे माध्यम म्हणून मायबोलीवर विश्वास आहे का? याविषयी अंनिस कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर, अभिनेत्री संपदा जोगळेकर आयुर्वेदतज्ज्ञ चंदा बिराजदार आणि सई तांबे या आई म्हणून आपली भूमिका मांडणार आहेत.
राजकीय पक्षांच्या मराठी शाळांच्या प्रश्नांबाबतच्या भूमिकेत यापुढील काळात पुरेशी स्पष्टता येणे गरजेचे आहे. या संमेलनात या मुद्द्याला काही तरी टोक येईल आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी केवळ पोकळ आश्वासने देणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. संमेलनात मुंबईच्या महापौरांची उपस्थिती, ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांचा अध्यक्षीय समारोप, लेखक व उद्योजक मंदार भारदे यांची समारोप सत्रातील उपस्थिती, कौशल इनामदार यांचा ‘लाभले आम्हांस भाग्य’ हा कार्यक्रम, विविध वृत्तवाहिन्यांवरील निवेदकांचे सूत्रसंचालन, पालक व शिक्षकांसाठी स्पर्धा होणार
आहेत.
महाराष्ट्रातील प्रयोगशील शाळांचे स्टॉल आणि वीस प्रकाशकांचे स्टॉल्स ही तर पर्वणीच ठरावी. एकूणात मराठी अभ्यास केंद्र व नूतन विद्यामंदिर, दहा सहयोगी संस्था आणि दहा सहयोगी शाळा यांनी संयुक्तपणे आयोजित केलेले हे मराठीप्रेमी पालक संमेलन शिक्षणक्षेत्रात एक नवे वारे घेऊन आले आहे. मराठी शाळा आम्हाला हव्या आहेत की नाहीत, या प्रश्नाबाबत कायमच संभ्रमात असणारा मराठी भाषिक समाज या संमेलनाला किती हजेरी लावतो यावर संमेलनाचे यश अवलंबून आहे.
( लेखिका शिक्षणतज्ज्ञ आहेत.)

Web Title: In what medium do our children learn?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.