लोक काय काहीही म्हणतात !
By सचिन जवळकोटे | Published: March 3, 2019 06:31 AM2019-03-03T06:31:40+5:302019-03-03T06:33:46+5:30
लगाव बत्ती
सचिन जवळकोटे
थोरले काका बारामतीकरांनी परवा थेट सांगून टाकलं, ‘माढ्याची बारामती करू, असं मी कधीच बोललो नव्हतो !’ हे ऐकताच दोन्ही जिल्ह्यातील भोळ्या-भाबड्या जनतेचे डोळे खाडकन् उघडले गेले. गेली दहा वर्षे पाहिलेलं ‘स्वप्न’ एका क्षणात ‘भ्रम’ कॅटेगिरीत मोडलं गेलं. खरंतर ‘मी असं म्हणालो नव्हतो,’ हे वाक्य थोरल्या काकांच्या तोंडून आम्ही पामरांनी लहानपणापासून ऐकलेलं; मात्र ज्यांनी मोठ्या विश्वासानं निवडून दिलेलं, त्यांच्यावरच हे डायलॉग ऐकण्याची वेळ आली. अरेरेऽऽ. असो. या भ्रमनिराशेच्या वेदनेतून काही नेत्यांना पत्रं लिहिलीयंत, त्याचाच हा गोषवारा.
प्रिय थोरले काका,
आपल्या पुनर्गमनामुळे आम्ही आनंदीत झालोत की गोंधळलो आहोत, हेच नेमकं लक्षात येईनासं झालंय. ‘माझं मत.. भावी पंतप्रधानाला मत,’ असं ज्या शिवारात दहा वर्षांपूर्वी मोठ्या कौतुकानं सांगितलं गेलं होतं, तिथंच आता ‘माढा.. बारामतीकरांना पाडा!’ अशा पोस्ट मोबाईलवर गराऽऽ गराऽऽ फिरताहेत. विशेष म्हणजे, यात तुमचेच काही शिलेदार मोठ्या त्वेषानं उतरलेत म्हणे. गेली पन्नास वर्षे आपण अजिंक्य राहिलात. आपला पराभव करणं म्हणजे आजपावेतो स्वप्नातीत गोष्ट समजत होतो; मात्र माढ्याच्या रणांगणात ज्या पद्धतीचे मेसेज लोकांमधूनच फिरू लागलेत, ते पाहता नव्या चमत्काराचे किंवा विक्रमाचे धनी होण्याची लोकांनाच घाई लागली की काय, अशी भीती वाटू लागलीय.
यावेळीही आपल्यासोबत पहिल्या फळीतले सारेच नेते आहेत; मात्र लोकांना घड्याळ्यापर्यंत पोहोचविणारी प्रत्यक्ष मैदानातली यंत्रणा अकस्मातपणे का बिथरलीय, हेच कुणाच्या नीट लक्षात येईनासं झालंय. साताºयात प्रभाकर लोधवडेकरांना अन् सोलापुरात विजयदादा अकलूजकरांना झुलवत ठेवून शेवटच्या क्षणी तुम्ही खासदारकीवर हक्क सांगितलात, हेच कदाचित इथल्या लोकांना न आवडलेलं. राजानं राजासारखं रहावं. स्वत:च्या साम्राज्यातलंच सिंहासन सांभाळावं. एकनिष्ठ सरदारांच्या मनसबदारीवर अधिकार गाजवावा; मात्र हक्क दाखवू नये.. असं म्हणे लोक म्हणतोहेत... पण जाऊ द्या सोडा; लोक काय काहीही बोलतात !
ता.क. : ‘विजयदादांना राज्यसभेवर पाठविणार,’ असं तुम्ही अकलूजमध्ये म्हणालात, तेव्हा तिथल्या चाणाक्ष पत्रकारांनीही तत्काळ याचं मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केलं.. कारण परत पुढल्या वर्षी कुणाच्या कानावर हे वाक्य पडू नये म्हणजे मिळविली; ‘असं मी म्हणालोच नव्हतो !’
प्रिय राजन मालक,
मोहोळमधल्या एका लग्नात म्हणे तुम्हाला शेटफळचे ‘मनोहरभाऊ’ दिसले. नेहमीप्रमाणे तुम्ही त्यांच्याजवळ जाऊन आपुलकीनं चौकशी केलीत, तेव्हा त्यांनी रागारागात तुमचा हात झटकला. ‘माझ्याशी बोलत जाऊ नका म्हणून एकदाच सांगितलं होतं ना !’ असंही त्यांनी सुनावलं. हा सारा प्रकार शेकडो व-हाड्यांनी याचि देही याचि डोळा पाहिला. खरंतर, असा प्रसंग यापूर्वीही कैकवेळा घडलेला; मात्र लोकांसमक्ष प्रथमच. असो. शत्रुला मित्र बनविण्याची तुमची हातोटी मात्र बारामतीकरांच्या पावलावर पाऊल टाकण्याजोगी. जाता-जाता अजून एक आठवलं ‘बाळराजें’नीही तुमचं हे कसब अवगत करायला हरकत नाही; पण ‘लक्ष्मणरावां’चं काय करायचं हो? कारण पूर्वीचा मित्र नंतर शत्रू बनणं राजकारणात नेहमीच धोकादायक.
होली बिडरीऽऽ महाराज !
प्रिय महाराज,
सध्या गौडगावचा मठ जगाच्या नकाशावर आलाय की काय महाराऽऽज. ‘भगवा नेता’ म्हणून योगी आदित्यानंतर आता तुमचाच नंबर लागणार दिसतोय. कधी नव्हे ते दोन्ही देशमुखही तुमच्यासोबत देवेंद्रपंतांना भेटायला आलेले. भलेही ‘सुभाषबापूं’ची इच्छा असू दे..नसू दे; परंतु ‘दक्षिण’मध्ये ‘तम तम मंदीं’ना दुखवून चालणार नाही, हे ओळखण्यात बापू चाणाक्ष; मात्र तुम्ही तर म्हणे त्यांच्यापेक्षाही हुशार. केवळ सोलापूरवरच विसंबून न राहता थेट कर्नाटकातून दिल्लीशी लिंक लावली. डायरेक्ट येडीयुरप्पाच? यप्पोऽऽ बक्कळ भारी...पूर्वी इंडीच्या पाटलांसाठी मदतीला धावणारे देवेगौडा आठवले. असो. आजपर्यंत लोकांना आशीर्वाद देणारे हात आता मतदारांसमोर जोडले जाऊ नयेत, असंही काही लोकांना वाटू लागलंय. ही इच्छा केवळ तुमच्या हितचिंतकांचीच की ‘हात’वाल्या कार्यकर्त्यांचीही, हे एकदा ‘वालेंच्या प्रकाशआण्णां’ना विचारायला हवं. होली बिडरी महाराजऽऽ तुम्ही जास्त विचार करू नका. तेवढं टेलरकडं शिवायला टाकलेला नेहरू शर्ट कधी घालणार, तेवढं सांगा.
( लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)