या छायाचित्रात ‘पॉवरफूल’ असे काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 08:58 AM2021-07-10T08:58:14+5:302021-07-10T09:03:36+5:30

बोजड दागिने, अवास्तव मेकअप, भडक महागड्या साड्यांनी मढलेल्या स्त्री-लोकप्रतिनिधींच्या गराड्यात ‘पॉवर ड्रेसिंग’चे हे दर्शन तसे दुर्लभच!

What is ‘powerful’ in this photo nirmala sitharaman Smriti irani | या छायाचित्रात ‘पॉवरफूल’ असे काय आहे?

या छायाचित्रात ‘पॉवरफूल’ असे काय आहे?

googlenewsNext

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘रिस्टार्ट’ बटण दाबल्यानंतरच्या ताज्या केंद्रीय मंत्रिमंडळातल्या महिला सदस्यांचे हे व्हायरल छायाचित्र. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, महिला-बालकल्याण मंत्री स्मृती इराणी आणि वाणिज्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल या मंत्री परिषदेतल्या तीन ज्येष्ठ सदस्य वगळता बाकी सारे नवे चेहरे आहेत! छायाचित्रात मोजून नेमक्या नऊ स्त्रिया असल्याने ‘नवदुर्गा’ अशी लोकप्रिय कॅप्शन देणाऱ्यांची आयतीच सोय छायाचित्रकारानेच करून दिलेली असल्यामुळे अनेकांचे विचार-कष्ट वाचले हे उत्तमच!

-पण ही विशेष नोंद यासाठी, की हे छायाचित्र एका दिलासादायक बदलाची गोष्ट सांगते : आपले काम काय आहे, आपले स्थान काय आहे याची सूक्ष्म जाणीव (जाणते/अजाणतेपणाने) ठेवून सत्तास्थानावरील स्त्रियांनी केलेली विभिन्न पोतांची संयत, नेटकी वेषभूषा हे या छायाचित्राचे सांप्रतच्या भारतातले दुर्मीळ वैशिष्ट्य! केंद्रीय मंत्रीपदाची शपथ ग्रहण करण्यासारखा महत्त्वाचा सोहळा असताना चमकदार तोऱ्याचा ‘फोटोजेनिक’ मोह टाळून या स्त्रियांनी राखलेला आब या समूह छायाचित्रात मोठा देखणा, डौलदार दिसतो आहे. सार्वजनिक आयुष्यात महत्त्वाच्या स्थानावर असलेल्या कुणीही आपल्या वेषभूषेबाबत आणि प्रसंगाचे औचित्य राखण्याबाबत जागरूक असावे, ही खरेतर अगदी प्राथमिक अपेक्षा. पण इंदिरा-सोनिया-प्रियंका गांधींपासून आजच्या महुआ मोईत्रा यांच्यापर्यंतचे काही अत्यंत सन्माननीय अपवाद वगळता भारतीय राजकारणातल्या स्त्रियांमध्ये दुर्दैवाने या संकेतांची जाण अभावानेच दिसते. 

जगभरात सर्वत्र वेषभूषेपासून शारीरभाषेपर्यंतच्या अनेक ‘संकेतां’मधल्या बारीकसारीक खाचाखोचा शोधून संबंधित व्यक्तीच्या मानसिकतेचा, विचारसरणीचा अभ्यास एव्हाना रुळलेला असताना आपल्याकडे मात्र नगरसेविका ते आमदार ते मंत्री असा एकेक टप्पा पार करत जाणाऱ्या अनेक स्त्रिया डोळ्यात खुपेल अशा बोजड दागिन्यांनी मढलेल्या, अवास्तव मेकअपने सदा बरबटलेल्या आणि भडक महागड्या जरीकाठाशिवाय दुसरी साडी अंगाला न लावणाऱ्या अशा ‘असह्य’ होत जातात. कोणी काय खावे, प्यावे, ल्यावे हे व्यक्तिगत स्वातंत्र्याशी निगडित असते, हे खरेच! पण सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तींचे हे स्वातंत्र्य अमर्याद असत नाही. अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची शपथ घेताना तमिळनाडूत आजोळ असलेल्या कमला  हॅरीस  यांनी भारतीय वेश करावा, हा अमेरिकन भारतीय पॉवर-सर्कल्सचा मूर्ख आग्रह केराच्या टोपलीत टाकण्याचा विवेक कमला हॅरीस यांच्याजवळ असतो... एवढेच नव्हे, तर सिलिकॉन व्हॅलीत भरलेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या दिंडीत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतल्या डेमोक्रेटिक पक्षाच्या तत्कालीन लोकप्रतिनिधी (आपल्या नागपूरची माहेरवाशीण) स्वाती दांडेकर साडी न नेसता सूटमध्येच येतात; याचे कारण हेच की कोणत्या प्रसंगी तुम्ही काय परिधान करता यावरून तुमचे विचार, वर्तन आणि निष्ठांमधले बारीक कंगोरे सातत्याने टिपले जात असतात. पक्षाची बैठक असो, रस्त्यावरचे आंदोलन असो की विधिमंडळातले भाषण; सदासर्वकाळ पदरांच्या पट्ट्या काढून श्रीमंती भडक साड्या आणि दागिन्यांमध्ये मिरवणाऱ्या, लांबसडक केस मोकळे सोडून ते सतत सावरत राहाण्यात गुंतलेल्या महिला लोकप्रतिनिधींनी संयत दर्शनाचे धडे घ्यावेत, असे ‘हे छायाचित्र’ आहे, ते म्हणूनच! 

  ‘पॉवर ड्रेसिंग’ ही संज्ञा आता बरीच जुनी आहे आणि त्याबाबतचे संकेतही! शिवाय अजूनही खळ घातलेल्या चुरगळलेल्या खादीतून, बोटातल्या जाड अंगठ्या - कपाळावरचे विद्रूप टिळे - मनगटातल्या गंड्यांच्या जंजाळातून आणि आता गळ्यात लटकणारी पक्ष-निष्ठेची लांब फडकी - एकसाची मोदी जाकिटांमधून बाहेर येऊ न शकलेल्या पुरुष राजकारण्यांची याबाबतची जाण (अर्थातच सन्माननीय, अनुकरणीय अपवाद वगळता) काही फार अभिनंदनीय आहे असे नव्हे. एकुणात कारणे अनेक, पण आपल्या लोकप्रतिनिधींचे सर्वसाधारण दृश्य रूप हे तसे डोळ्यांना (त्याहून अधिक जाणिवांना) त्रासदायकच असते. मोदी मंत्रिमंडळातल्या या जुन्या-नव्या स्त्रियांनी मात्र एका आल्हादक बदलाची झुळूक दिली आहे.- वरवरचा, शब्दश: पोषाखी असला, तरी त्यांनी अंगीकारलेल्या एका महत्त्वाच्या बदलाचा ठसा आता त्यांच्या कामगिरीतही उमटो!

- अपर्णा वेलणकर, फिचर एडिटर, लोकमत
aparna.velankar@lokmat.com

 

Web Title: What is ‘powerful’ in this photo nirmala sitharaman Smriti irani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.