‘त्यांना’ कोणती शिक्षा द्यायची?

By admin | Published: September 20, 2016 05:31 AM2016-09-20T05:31:47+5:302016-09-20T05:31:47+5:30

पाकिस्तानने स्वत: वा आपल्या हस्तकांकरवी भारतावर हल्ला केला की भारत सरकार काही कर्मकांडे नित्यनेमाने पार पाडत असते.

What punishment should they give? | ‘त्यांना’ कोणती शिक्षा द्यायची?

‘त्यांना’ कोणती शिक्षा द्यायची?

Next


पाकिस्तानने स्वत: वा आपल्या हस्तकांकरवी भारतावर हल्ला केला की भारत सरकार काही कर्मकांडे नित्यनेमाने पार पाडत असते. ‘हा हल्ला शिक्षेवाचून राहाणार नाही’ असे पंतप्रधानांनी म्हणायचे. ‘पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र आहे’ हे घासून गुळगुळीत झालेले विधान गृहमंत्र्याने उच्चारायचे. ‘योग्य वेळ येताच पाकिस्तानला धडा शिकवू’ हे संरक्षण व्यवस्थेने सांगायचे. सेनाप्रमुखांनी घटनास्थळाला भेट द्यायची. संरक्षणमंत्र्यांनी श्रीनगरला जाऊन यायचे. ‘दातांच्या चाव्याला जबड्याच्या चाव्याने उत्तर मिळेल’ असे सत्ताधारी पक्षाच्या एका हलक्या पुढाऱ्याने जाहीर करायचे. हल्ल्यात मृत्यू पावलेल्या शहिदांवर पुरस्कार, देणग्या, भेटी, सन्मान आदिंची कृतज्ञ उधळण करायची आणि संरक्षण विभागाचे सल्लागार अजित डोवाल यांनी बैठकीमागून बैठकी घेत ‘पुढल्या’ योजना आखायच्या. खरे तर देश या साऱ्याला आता कंटाळला आहे. लाल बहादूर शास्त्रींचे बळ आणि इंदिरा गांधींचे सामर्थ्य इतक्या हल्ल्यांनंतरही देशाच्या सरकारला एकवटता येऊ नये याचा अर्थ जनतेला कळतो. आपण पाकिस्तानच्या अण्वस्त्रांना आणि क्षेपणास्त्रांना भितो काय? त्याच्या बाजूने चीन आपले शस्त्रागार घेऊन उभा राहील ही शंका आपल्याला भेडसावते काय? रशिया हा आपला एकेकाळचा मित्र देश स्वत:च तुटल्यामुळे आपली होणारी पाठराखण संपली काय? आणि अमेरिका हा देश त्यात एवढे दिवस पाणी भरल्यानंतरही पाकिस्तानवर निर्बंध घालायला नकार देत असेल तर त्याचे व आपले खरे नाते काय? संरक्षण मंत्री पर्रिकर दर दिवशी देशाची वाढलेली लष्करी ताकद सांगतात. डोवाल यांना संरक्षणाचे सगळे डावपेच समजतात असे सरकार सांगते आणि मोदींच्या प्रत्येक भाषणातला स्वर जास्तीचा चढा असतो. सरकारातली माणसे जळत्या प्रश्नांविषयी न बोलता नुसतीच विकासाचे न दिसणारे फुगे हवेत सोडताना दिसतात. गेली साठ वर्षे पाकिस्तान सीमेवर भांडण करीत आहे आणि गेल्या दोन अडीच वर्षात त्याची तीव्रता वाढली आहे. त्याचे घुसखोर पूर्वी एखाद दुसऱ्या सैनिकाला अडवायचे वा एखाद्या पलटणीवर गोळीबार करायचे. आता ते थेट पोलीस ठाण्यांवर आणि भारताच्या लष्करी तळांवर हल्ले करतात. त्यांना सहजपणे सीमा ओलांडता येते. हल्लेखोरी करून परतही जाता येते. आम्ही मात्र सीमेचा आदर सांभाळत आपली कुंपणे आतूनच मजबूत बनविण्याच्या प्रयत्नात असतो. झालेच तर आमचे सैनिक आणि पोलीस आमच्याच नागरिकांवर छऱ्यांच्या बंदुका चालवतात. शहरातली आणि ग्रामीण भागातली अल्पवयीन मुले मारतात. मात्र या सैनिकांना १४ कि.मी. अंतरावर असलेला रावळपिंडीचा पाकिस्तानी लष्करी तळ दिसत नाही आणि तेवढ्या अंतरातल्या त्याच्या हालचालींची माहिती आपल्या गुप्तचर यंत्रणांनाही कधी मिळत नाही. दहशतीला व दहशतखोरांना सात्विक वा बचावात्मक उत्तरे समजत नाहीत. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तरे द्यावी लागतात. ती नेहरू-पटेलांनी दिली. तशी शास्त्री व इंदिराजी यांनीही दिली. नंतरचा काळ मिठायांच्या देवाणघेवाणीचा. बसयात्रा आणि समझोता एक्स्प्रेस यांच्या दौडण्याचा. कारगील युद्धानंतरही हे दौडणे आणि मिठायांची देवाणघेवाण यात फरक पडलेला कुणाला दिसला नाही. आताचा काळ पंतप्रधानांच्या वारंवार होणाऱ्या पाक दौऱ्यांचा आणि त्यातही अकस्मात दिलेल्या खासगी भेटींचा. त्याही प्रयत्नांना महत्त्व आहे. त्यातून सद््भाव निर्माण होतो अशी अनेकांची धारणा आहे. पण शत्रू यालाच दुबळेपण समजत असेल तर काय? पाकिस्तानातून येणारे हल्लेखोर स्वत:ला जैश व अन्य कोणत्या संघटनेचे सभासद म्हणवितात. पण त्यांच्या हातची शस्त्रे पाकिस्तानची असतात ही गोष्ट अनेकदा सिद्ध झाली. त्याचे किती पुरावे आपण पाकिस्तानला पेश केले. पण नाठाळांवर चांगुलपणाचा वा सत्याचा प्रभाव पडत नाही. त्यांच्या माथ्यावरच हाणावे लागत असते. त्यातून पाकिस्तानचा इतिहासच मुजोर, नाठाळ व हल्लेखोरीचा आहे. भारतानेही गेली साठ वर्षे संरक्षणाच्या क्षेत्रात बऱ्याच दंडबैठका मारल्या. अण्वस्त्रांपासून शक्तिशाली शस्त्रांपर्यंतचे उत्पादन त्यानेही केले. शक्तिशाली क्षेपणास्त्रे त्याच्याजवळही आहेत. पाकिस्तान छोट्याशाही निमित्ताने अणुयुद्धाला आरंभ करील व ते युद्ध कमालीचे विनाशकारी असेल हे वास्तव आपल्या कारवाईच्या आड येत असते काय? पण मग ते पाकिस्तानच्या कारवायांनाही प्रतिबंध करीतच असणार. पाकिस्तान काहीही म्हणत असला तरी अणुयुद्धांचा काळ आता इतिहासजमा झाला आहे. अण्वस्त्रांची ताकद त्याच्या वापरात नसून त्याच्या दहशतीतच तेवढी उरली आहे. पाकिस्तानजवळ ते कळण्याएवढेही शहाणपण नसेल तर गोष्ट वेगळी. आपली अणुविषयक दहशत पाकिस्तानला समजून देण्यात आपले राजकारण अपयशी झाले आहे काय? १७ जवानांची परवाची शहादत आपल्या या अपयशातून आली काय? हुतात्म्यांना अमरपण लाभत असते. पाकिस्तानी हल्ल्यात बळी पडलेले भारतीय जवान अमर झाले आहेत. त्यांना हा देश कायमची मानवंदना देत राहील. पण त्यांच्या हौतात्म्याला आमचे राजकारण कारणीभूत झाले असेल तर त्याचे काय करायचे? आणि ते करणाऱ्यांना कोणती शिक्षा द्यायची?

Web Title: What punishment should they give?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.