स्वत:च निर्माण केलेल्या प्रश्नांऐवजी दिवंगतांवर टीका करण्याची ही कोणती तऱ्हा?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 05:52 AM2019-05-11T05:52:56+5:302019-05-11T05:55:14+5:30
वर्तमानात स्वत:च निर्माण केलेल्या प्रश्नांऐवजी दिवंगतांवर टीका करण्याची ही कोणती त-हा? संघ ज्या थोर भारतीय परंपरेचा गौरव करतो ती हीच आहे का? ही परंपरा लोकशाहीचेच नव्हे, तर भारतीय सभ्यतेचे सारे संकेत मोडणारी आहे.
दिवंगतांवर टीका करणे हे आपल्या परंपरेत सभ्यतेचे लक्षण मानले जात नाही. अगदीच सडकछाप भांडण असेल तर ते क्वचित कधी आई-बहिणींपर्यंत (बापापर्यंत सहसा नाही) जाते. पण त्यापलीकडे आजा-आजी, त्याअगोदरच्या पितरांपर्यंत ही टीका वा शिवीगाळ जात नाही. मात्र आपल्या सध्याच्या राजकीय व्यवहाराने ही परंपरा मोडून थेट इतिहासात गडप झालेल्या पितरांपर्यंत पोहोचण्याचे व त्यांना शिवीगाळ करण्याचे मनावर घेतले आहे. राहुल गांधींवरची मोदींची टीका समजण्याजोगी आहे. सोनिया गांधींवरही त्या राजकारणात असल्याने ते टीका करू शकतात. पण राजीव गांधी, त्याआधी इंदिरा गांधी व त्याही आधी पं. जवाहरलाल नेहरूंपर्यंत पोहचून त्यांना नावे ठेवण्याचे त्यांचे व त्यांचे सारथी अमित शहा यांचे वर्तन परंपरेएवढेच सभ्यतेतही न बसणारे आहे.
वर्तमानात अनेक प्रश्न आहेत आणि त्यातले अनेक मोदींच्या सरकारने उभे केले आहेत. बेरोजगारीत वाढ, नोटबंदी, जीएसटी, भाववाढ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आर्थिक ताण व राजकीय खून हे प्रश्न आताचे आहेत. त्यातल्या काहींना इतिहासही आहे. परंतु कोणत्याही लोकशाही देशात सत्तेवरचे सरकार आपल्या चुकांसाठी व प्रश्नांसाठी पूर्वीच्या सरकारांना दोषी धरत नाही. ती फक्त आपली व त्यातही संघाच्या सरकारांनी नव्याने सुरू केलेली तºहा आहे. पं. नेहरूंना जाऊन आता पंचावन्न वर्षे झाली. इंदिरा गांधींची हत्या पस्तीस वर्षांपूर्वी झाली. राजीव गांधींच्या स्फोटक खुनालाही पंचवीस वर्षांचा काळ लोटला. राहुल आणि प्रियंका ही त्यांची आताची पिढी त्यांचा पक्ष व विचारधारेला पुढे नेत आहेत. त्यांच्यावर कोणताही आरोप नाही किंवा त्यांच्यावर कोणती टीका करता येत नाही. त्यामुळे ‘तुम्ही नाहीतर तुमचे आईवडील, आजोबा-पणजोबा’ असा विचार करून मोदी व शहा यांची सध्याची सडकछाप शिवीगाळ सुरू आहे. त्यांचा या शिवीगाळीतला उत्साह एवढा दांडगा की ते प्रसंगी त्याही मागे ते थेट म. गांधींपर्यंत जातात.
ज्यांच्या पावलांच्या धुळीची बरोबरी आपण करू शकत नाही त्या महात्म्यांना आणि महापुरुषांना नावे ठेवण्याची त्यांची तयारी पाहिली, की संघ ज्या थोर भारतीय परंपरेचा गौरव करतो ती ही आहे की काय, असा प्रश्न आपल्याला पडतो. अशी शिवीगाळ फारसे काही न शिकलेल्या स्मृती इराणी, योगी आदित्यनाथ, गिरीराज किंवा प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केली, तर ते त्यांच्या पोरकटपणापायी एकदा समजून तरी घेता येईल. पण पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष नेहरू व महात्मा गांधींना आजच्या राजकारणात ओढू लागले, तर ते कसे समजायचे? संघाने स्वातंत्र्यलढ्यात कधी भाग घेतला नाही. त्यापासून दूर राहून त्याला नावे ठेवण्याचेच काम त्याने केले.
त्यांच्या या टीकेनंतरही काँग्रेसच्या नेतृत्वात देश स्वतंत्र झाला. त्यासाठी प्रथम गांधींना मारले गेले. आता ते मारणारे म्हणतात, ‘गांधींऐवजी नेहरूंना मारले असते तर अधिक बरे झाले असते.’ त्या माणसांशी मोदी व शहा यांचा प्रत्यक्ष संबंध नसला, तरी त्यांच्यात एक वैचारिक अनुबंध आहेच. ही असभ्यता व हा ओंगळपणा थांबविण्यासाठी आपली जरब वापरण्याऐवजी मोदी त्यांच्या सुरात सूर मिसळून स्वत:च नेहरू व गांधींपर्यंत शिवीगाळ करायला पोहचत असतील; तर त्यांना हीच परंपरा जिवंत ठेवायची आहे, असा अर्थ काढता येतो. टीका अंगलट येत असूनही अशा दिवंगत व्यक्तींच्या चारित्र्याबाबत चर्चा घडविणे, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणे; एवढेच नव्हेतर, पुरावे नसतानाही त्यांच्या नावे यंत्रणेच्या दुरुपयोगाचा आरोप करून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सामान्य माणसे, जनता, देश व एकूणच जागतिक लोकमत यांना हे न पचणारे आहे. मात्र तीच परंपरा डोक्यात घट्ट बसवून घेतलेल्यांना तसल्या घाण शिवीगाळीवरही टाळ्या वाजवता येतात आणि ती शिवीगाळ हाच आपल्या परंपरेचा पराक्रम वाटू लागतो. दु:ख, अशी परंपरा जगवण्याचे नाही. ही परंपरा लोकशाहीचेच नव्हेतर, भारतीय सभ्यतेचे सारे संकेत मोडणारी आहे, हे आहे. यातून ही निर्ढावलेली माणसे काही शिकतील अशी अपेक्षा बाळगण्यात फारसा अर्थ नाही. मात्र ही लोकशाही कधीतरी निकोप व स्वच्छ व्हावी, यासाठी ही सफाई लवकर व्हावी एवढेच येथे म्हणायचे.