हिंसाचाराचा धर्म कोणता ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 12:52 AM2018-08-13T00:52:20+5:302018-08-13T00:53:40+5:30

मुंबईच्या वैभव राऊत या ‘हिंदूू अतिरेक्या’सह त्याच्या तीन साथीदारांना त्यांच्याजवळील बॉम्ब्ससकट ताब्यात घेऊन महाराष्ट्राच्या अतिरेकविरोधी पथकाने एका जुन्या व खुनी परंपरेचे आताचे पाईक उघड केले आहेत.

 What is the religion of violence? | हिंसाचाराचा धर्म कोणता ?

हिंसाचाराचा धर्म कोणता ?

Next

मुंबईच्या वैभव राऊत या ‘हिंदूू अतिरेक्या’सह त्याच्या तीन साथीदारांना त्यांच्याजवळील बॉम्ब्ससकट ताब्यात घेऊन महाराष्ट्राच्या अतिरेकविरोधी पथकाने एका जुन्या व खुनी परंपरेचे आताचे पाईक उघड केले आहेत. ऐन सणांच्या काळात स्फोट घडवून अनेकांचे (अर्थातच अल्पसंख्याकांचे) मृत्यू घडवून आणण्याचा त्या गुन्हेगारांचा इरादा त्यामुळे निकामी झाला आहे. हिंदुत्ववाद्यांच्या अतिरेकाचे नाव काही काळापूर्वी संसदेत घेतले गेले तेव्हा भाजपाच्या सभासदांनी त्याविरुद्ध गदारोळ केला होता. हेमंत करकरे यांनी मालेगावपासून समझोता एक्स्प्रेसपर्यंत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेत एका तथाकथित साध्वीसह काही शस्त्राचाऱ्यांना पकडले तेव्हाही भाजपाने करकरे यांच्या घराभोवती निषेधाचे फलक लावले होते. अतिरेकाचा संबंध धर्माशी नसतो, तो वृत्तीशी असतो हे वास्तव या गदारोळवाल्यांना कधी समजले नाही वा समजूनही त्यांनी त्याकडे डोळेझाकच केली. ज्यू, मुसलमान, ख्रिश्चन, हिंदू, बौद्ध, पारशी यासह सर्वच धर्मातल्या कडव्या वृत्ती गुन्हेगारीकडे प्रवृत्त होतात. त्यांचे नमुने केवळ आजच्या जगानेच नाही तर इतिहासानेही पाहिले आहेत. बुद्धाच्या तपश्चर्येत अडथळे आणणारे, शंकराचार्यांच्या आईच्या अंत्ययात्रेवर बहिष्कार घालणारे, ज्ञानेश्वरांना जातीची प्रमाणपत्रे मागणारे, तुकोबाची गाथा इंद्रायणीत बुडविणारे, ज्योतिबांचा छळ करणारे, सावित्रीबार्इंवर शेण फेकणारे, आगरकरांच्या प्रेतयात्रा त्यांच्या जिवंतपणीच काढणारे, गांधीजींवर गोळ्या झाडणारे आणि दाभोलकर- पानसरे- कलबुर्गी व गौरी लंकेशचा खून करणारे लोक डोळ्यासमोर आणले की हिंदुत्वातली कडवी व अतिरेकी परंपराही दिसू लागते. आपल्या सर्वोच्च न्यायालयाने या लोकांची तुलना अमेरिकेत कृष्णवर्णीयांच्या हत्या करणाºया कू क्लक्स क्लॅनच्या हिंसाचाºयांशी नुकतीच केली आहे. खुनी प्रवृत्तीचे लोक जगात सर्वत्र व सर्व धर्मात आहेत. त्यांचा देश, धर्म व माणुसकी यातील कशाशीही संबंध नाही. अपराध्यांना जात नसते, धर्म नसतो व देशही नसतो. त्यांचा विचार कायद्याच्या कक्षेत गुन्हेगार म्हणूनच करायचा असतो. वैभव राऊत व त्याचे साथीदार एकटेही नाहीत. त्यांचा अपराधही त्याचा एकट्याचा नाही. त्यामागे खुनाची चटक असलेल्या अतिरेकी संघटना आहेत. त्या शक्तिशाली तर आहेतच, शिवाय त्यांना हात लावायला सरकारही भिताना दिसले आहे. वैभव राऊत व त्याच्या सहकाºयांचा हिंदुत्ववाद्यांशी व सनातन या भयकारी संस्थेशी संबंध असल्याचेही राज्याच्या तपास यंत्रणांनी सांगितले आहे. त्यामुळे हेमंत करकरे यांनी केलेल्या तपासात त्रुटी ठेवून त्यांनी पकडलेले आरोपी सोडण्यात पुढाकार घेतलेल्या पोलिसातील ‘छुप्या अतिरेक्यांची’ तोंडेही आता काळवंडली असतील. कोणताही गुन्हेगार हा देशाचा व समाजाचा अपराधी असतो. त्याचा विचार ‘आपला’ वा ‘परका’ म्हणून करता येत नाही. सारे जग सध्या या अतिरेक्यांच्या कारवायांनी हादरलेले व अनेक जागी रक्तबंबाळ झालेले दिसत असताना तरी अशा टोळक्यांना पकडून त्यांना अद्दल घडविणे ही केवळ राष्टÑीयच नाही तर जागतिक व नैतिक जबाबदारी बनली आहे. वैभव राऊतचे नाव गौरी लंकेशच्या खुनाशीही जुळले आहे. त्याचमुळे या प्रकरणाचा छडा पूर्ण तयारीनिशी व त्यात कोणतीही पळवाट राहणार नाही याची काळजी घेऊन झाला पाहिजे. या खुनी परंपरेने महाराष्टÑाला यापूर्वी अनेकवार बदनाम केले आहे. बदनामीचा हा कलंक धुवून टाकण्याची जबाबदारी व संधीही या वैभव नावाच्या अपराध्याने राज्य सरकार व त्याच्या तपास यंत्रणांना दिली आहे. ती त्यांनी त्यांच्या कायदेशीर टोकापर्यंत नेऊन ‘या देशात कायद्यासमोर सारे समान आहेत’ या सूत्राविषयीचा विश्वास समाजात नव्याने जागविला पाहिजे. अन्यथा या देशात फक्त अल्पसंख्याकांनाच गुन्हेगार धरले जाते व बहुसंख्याकांना अशा अपराधात मोकळे सोडले जाते हा आताचा समज कायम होईल.

Web Title:  What is the religion of violence?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.