भेटीचे फलित काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 02:00 AM2018-06-08T02:00:41+5:302018-06-08T02:00:41+5:30
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर झालेल्या चर्चेचा नेमका तपशील कधीच जगजाहीर होणार नाही. किंबहुना, तो बहिर्मुख होऊ नये यासाठीच तर ती चर्चा बंद दाराआड होती.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर झालेल्या चर्चेचा नेमका तपशील कधीच जगजाहीर होणार नाही. किंबहुना, तो बहिर्मुख होऊ नये यासाठीच तर ती चर्चा बंद दाराआड होती. ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ अशी अवस्था असलेल्या दोन राजकीय पक्षांचे प्रमुख जेव्हा अशा प्रकारे भेटतात, तेव्हा त्या भेटीमागे निश्चित असे काही सुप्तहेतू दडलेले असतात. त्यात सार्वजनिक व्यवहार, राष्टÑहित आणि व्यापक समाजहिताचा काहीएक संबंध नसतो. त्यामुळे शहा-ठाकरे यांच्या भेटीत अशा कुठच्याच मुद्यावर चर्चा झाली नसणार हे ओघाने आलेच. मग या भेटीमागचा हेतू काय आणि साध्य काय? उत्तर एकच, शिवसेनेची नाराजी दूर करणे! शहांच्या भेटीने ठाकऱ्यांची नाराजी दूर झाली की नाही, हे आगामी काळात दिसून येईलच. पण त्यांच्या नाराजीचे नेमके मुद्दे तरी काय आहेत? वाढती महागाई, शेतकºयांचे प्रश्न, इंधन दरवाढ, बेरोजगारी, हे मुद्दे तर नक्कीच नसणार. उद्धव ठकारे नाराज आहेत, ते त्यांना सत्तेत मिळणाºया दुय्यम वागणुकीमुळे. केंद्रात त्यांचा इनमिन एक मंत्री आणि तोही दुर्लक्षित खात्याचा. राज्याच्या मंत्रिमंडळातही तुलनेत कमी महत्त्वाची खाती. केंद्रात भाजपाचे बहुमत असल्याने आणि शिवसेनेवाचून त्यांचे पान अडत नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना ढुंकूनही विचारत नाहीत आणि राज्यात त्यांच्या मताला काडीची किंमत नाही. मागील लोकसभा निवडणुकीपर्यंत दोन्ही पक्षांची युती होती. मोदी लाटेत दोन्हीकडचे काही ओंडकेही तरून गेले. पण याच यशामुळे दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बेटकुळी फुगल्याने विधानसभा निवडणुकीत त्यांना स्वबळ आठवले. त्यातून २५ वर्षे अभेद्य असलेल्या युतीची ताटातूट झाली. पण तरीही निवडणुकीनंतर संख्याबळाच्या जोरावर भाजपाने सत्ता हस्तगत केली. शिवसेनाही मागाहून सत्तेत सहभागी झाली आणि काडीमोड झालेल्या संसाराची सत्तेच्या वेदीवर पुन्हा घडी बसली. इथपर्यंत सारे काही ठिकठाक होते. पण त्यानंतर झालेल्या कल्याण-डोंबिवली आणि मुंबई महापालिका निवडणुकीत पुन्हा भांड्याला भांडे लागले. मोठा भाऊ कोण? यावरून वादाची ठिणगी पडली आणि दोन्ही बाजूने त्यात तेल ओतण्याचे काम झाल्याने दुराव्याची धग कायम राहिली. एक पाय सत्तेत आणि दुसरा सत्तेबाहेर, अशी तारेवरची राजकीय कसरत करत ठाकरे आणि कंपनीने भाजपाचा पाणउतारा करण्याची एकही संधी सोडली नाही.
केंद्रात आणखी एक मंत्रिपद हवे, अशी सेनेची मागणी असताना सुरेश प्रभूंना परस्पर मंत्रिपदे दिल्याने ठाकरे चांगलेच दुखावले गेले. शिवाय, पालिका निवडणुकीत ठाकरेंच्या संपत्तीचा मुद्दा उपस्थित करून भाजपा नेत्यांनी त्यांच्या जखमेवर मीठ चोळले. शिवाय, मुंबई महापालिकेत सत्तेवर असलेल्या सेनेला मुंबई मेट्रो, कोस्टल रोड, यासारख्या योजना राबविताना विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळे सेनेची नाराजी वाढत गेली. आजवर सेनेची मनधरणी करण्याची गरज भाजपा नेत्यांना पडली नाही. पण तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकीत सेनेची ही नाराजी परवडणारी नाही, याची जाणीव झाल्यानेच शहांनी मातोश्रीवर पायधूळ झाडण्याची तसदी घेतली. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांनंतर विरोधकांच्या मोर्चेबांधणीला हुरुप आलेला असल्याने किमान एनडीएतील घटक पक्षांना जवळ ठेवण्याशिवाय शहा-मोदींना पर्याय उरलेला नाही. त्यामुळेच शहांनी मातोश्रीवर तब्बल अडीच तास घालविले. शहांची ही शिष्टाई यशस्वी झाली, तर त्याचा फायदा दोन्ही पक्षांना होऊ शकतो. दोन्ही नेत्यांच्या देहबोलीतून ‘आॅल वेल’ असल्याचे संकेतही मिळाले खरे; पण राजकारण ऐनवेळी कोणते वळण घेईल, हे सांगणे कठीण.