साईबाबांच्या कुळाचा शोध कशासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 02:31 AM2017-10-03T02:31:23+5:302017-10-03T02:31:29+5:30
साईशताब्दीचा प्रारंभ ध्वजस्तंभावर ‘ओम’ आणि ‘त्रिशूल’ बसवून झाला. साईबाबा एका जाती-धर्माचे नव्हते, तर विश्वस्तांनी हे ‘त्रिशूल’ का बाहेर काढले. साईबाबांचे जन्मगाव विकसित करण्याचे भाष्य राष्ट्रपतींनी केले. यातून नकळतपणे सार्इंचे कूळ शोधण्याचा तर प्रयत्न नाही ना?
साईशताब्दीचा प्रारंभ ध्वजस्तंभावर ‘ओम’ आणि ‘त्रिशूल’ बसवून झाला. साईबाबा एका जाती-धर्माचे नव्हते, तर विश्वस्तांनी हे ‘त्रिशूल’ का बाहेर काढले. साईबाबांचे जन्मगाव विकसित करण्याचे भाष्य राष्ट्रपतींनी केले. यातून नकळतपणे सार्इंचे कूळ शोधण्याचा तर प्रयत्न नाही ना?
ऋषीचे मूळ आणि कूळ शोधू नये म्हणतात. मात्र, महामहीम राष्ट्रपतींनी साईबाबांच्या समाधीच्या शताब्दी वर्षाचा प्रारंभ करताना केलेल्या विधानामुळे सार्इंचे कूळ शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. राष्ट्रपतींच्या विधानामुळे नकळत एका वादालाही प्रारंभ होऊ शकतो. साईबाबांचे जन्मगाव असलेल्या परभणी तालुक्यातील पाथरीचा राज्य सरकारने विकास करायला हवा, असे विधान राष्ट्रपतींनी केले. राष्ट्रपतींनी कदाचित हे विधान कुठलाही हेतू न ठेवता केले असेल, पण त्यांच्या या विधानातून वेगवेगळे सामाजिक व राजकीय संदर्भ निघण्यास सुरुवात झाली आहे.
खुद्द साईबाबा आपले गाव, आईवडील, जात-धर्म याबाबत काहीच बोलत नव्हते. शिर्डी संस्थानने प्रकाशित केलेल्या साईसतचरित्रात त्यांच्या कुळाचा आणि जातधर्माचा काहीच उल्लेख नाही. साईबाबा हिंदूंना हिंदू वाटायचे व मुस्लिमांना मुस्लीम. ‘जन्म बाबांचा कोण्यादेशी, अथवा कोण्या पवित्र वंशी, कोणा माता पितरांच्या कुशी, हे कोणाशी ना ठावे’ हे साईचरित्र सांगते. साईचरित्राला प्रमाण मानून शिर्डी संस्थानने आजवर सार्इंचे गाव व कूळ शोधण्याचा प्रयत्न केला नाही. भाविकांनाही ती गरज भासली नाही. त्यामुळेच शिर्डी हे धर्मनिरपेक्षतेचे सर्वात मोठे प्रतीक बनले. गावानेही हे प्रतीक जपले. पण, याच तत्त्वाला नख लावण्याचा प्रयत्न विद्यमान विश्वस्त मंडळाने सुरू केला की काय? ही शंकेची पाल चुकचुकली आहे. साईबाबांच्या समाधीला पुढील वर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त सुरू झालेल्या शताब्दी महोत्सवाचा प्रारंभ राष्टÑपतींनी ध्वजारोहणाने केला. कुंभमेळ्यात असेच ध्वजारोहण होते. कुंभमेळ्यातील धर्मध्वजावर ओम, त्रिशूल असते. साईसंस्थाननेही आपल्या ध्वजावर ‘ओम’, ‘त्रिशूल’ बसविले आहे. यातून संस्थानला नेमका काय संदेश द्यायचा आहे? संस्थान सध्या भाजपच्या अधिपत्याखाली आहे. संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे हे संघनिष्ठ मानले जातात. इतर विश्वस्तही संघाच्या शाखेत गेलेले आहेत. त्यामुळे ही ध्वजवंदना साईबाबांना हिंदू ठरविण्यासाठी तर नाही ना? संघाचा अजेंडा रेटण्यासाठी भाजपने शाळांतील पुस्तकांचे देखील भगवेकरण केल्याचा आरोप होतो. येथे तर मंदिरच आहे. मंदिराला भगवा रंग देणे सर्वात सोपे. हा भगवा रंग संस्थानने तेथील फलकांवर आणलाही आहे. त्याची पुढील पायरी पाथरी असावी. राष्ट्रपतींना पाथरीबद्दलची माहिती कुणीतरी जाणीवपूर्वक दिली असावी, असा आरोप झाला आहे. पाथरीत जाणे चूक नाही, पण पाथरीत गेले म्हणजे आपोआप साईबाबांचा वंश व त्यांचा जातीचा दाखलाही अलगद हाती येईल. एकीकडे शंकराचार्यांनी साईबाबा देव नाहीत, ही आरोळी ठोकायची अन् दुसरीकडे संघ स्वयंसेवकांनी त्यांचा वंश शोधायला सुरुवात करायची. याचा अन्वयार्थ काय काढायचा? साईबाबा धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक आहेत, ही ओळख कुणाला तरी खटकते आहे का? ही ओळख पुसण्यासाठी तर हा सगळा खटाटोप नसावा?