लेखकाला ‘भित्रा’ ठरवणाऱ्या व्यवस्थेचे काय करावे?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 09:25 AM2022-04-19T09:25:53+5:302022-04-19T09:31:30+5:30

लेखकाने आजूबाजूच्या कोलाहलापासून अनभिज्ञ वा उदासीन राहता कामा नये. हे योग्यच, पण सक्ती झाली, तरी त्याने त्या कोलाहलाला शरणही जाता कामा नये.

What should be done about the system that calls the author coward | लेखकाला ‘भित्रा’ ठरवणाऱ्या व्यवस्थेचे काय करावे?

लेखकाला ‘भित्रा’ ठरवणाऱ्या व्यवस्थेचे काय करावे?

Next

अभिराम भडकमकर, ख्यातनाम साहित्यिक

साहित्यिकाचं मूळ काम आपल्या आजूबाजूला जे काही आहे त्याच्याकडे बघणं, त्याचा अन्वयार्थ लावणं आणि ते साहित्य मांडणं असा होतो.  आजूबाजूला म्हणजे नेमकं कुठे, कुठपर्यंत, म्हणजे लेखकाचा भवताल असा एका स्थळ-काळापुरता बांधून घालता येतो का, सध्या ‘समकालीन’ वास्तव असा एक शब्द फार ऐकू येतो; पण साहित्यात, कलेत समकालीन नामक काही असतं का, असू शकतं का, आताच्या कोलाहलात हा प्रश्न कदाचित असंवेदनशील वाटेलही; पण आजचे साहित्य समकालीन वास्तवाला भिडते का, यावर परिसंवाद घेण्याआधी साहित्याचं ते काम आहे का, याचा विचार व्हायला नको का? 

- म्हणजे मग साहित्यिकाने आजूबाजूच्या परिस्थितीकडे कानाडोळा करायचा का, असा प्रश्न येऊ शकतो. साहित्य आजूबाजूचे सामजिक, धार्मिक, राजकीय प्रश्न  कवेत घेणार की नाही, एकीकडे लेखक एका काळापुरता बांधील राहू शकत नाही म्हणायचं आणि दुसरीकडे या सगळ्यांचीही लेखनात अपेक्षा करायची, असं कसं होऊ शकेल आणि लेखकाला या भवतालापासून दूर राहता येईल का? माझ्या मते, महान लेखक ही कोंडी फोडण्यात यशस्वी ठरतो तो इथेच. तो त्याला ज्ञात असलेल्या काळाचा तुकडा घेतो आणि तत्कालीन भवतालाबद्दल बोलताबोलता सार्वकालिक होत जातो. म्हणूनच शेक्सपिअर गोष्ट सांगतो ती त्या काळातली असूनही ती मला माझी, आजची वाटू शकते. मोठा लेखक कदाचित समकालीन शोषणाने सुरुवात करील; पण एकूणच माणसातली शोषकवृत्तीच उलगडून काढेल. जसे महर्षी व्यास षडविकाराने लिप्त माणसाची मांडणी करतात. जी. ए. नियतीचा धांडोळा घेतात, तर चिं. त्र्यं. खानोलकर अज्ञाताच्या प्रदेशाचा. दळवींना माणसाच्या लैंगिक घुसमटीचा, तर चेकोव्हला महत्त्वाकांक्षांनी जखडलेल्यांचा शोध खुणावतो. हे सर्व एका मूलभूत चिंतनाकडे नेणारं असतं आणि ते तात्कालिकतेच्या पल्याड जातं.

याचा अर्थ आजूबाजूच्या परिस्थितीबाबत अनभिज्ञ असणं अथवा उदासीन असणं असा नव्हे, तर एक मोठीच जबाबदारी लेखकावर असते असा आहे. केवळ सद्य:स्थितीबाबत एक जागृती किंवा तात्पुरती उपाययोजना (ज्यात असहमती वा  लढ्यापासून सत्तांतरापर्यंत सर्व काही येईल) यासाठी जनमानस तयार करणे इतपतच मर्यादित भूमिका अपेक्षित नाही, असा आहे. यासाठीही साहित्यकृतीचा वापर होऊ शकतो; पण ते सर्वथैव, एकमात्र प्रयोजन असू शकत नाही. लेखकाला स्थळकाळ निरपेक्ष असा शोध घ्यायचा असतो. तो एकाचवेळी समकालीन आणि सार्वकालीन असतो तो याच अर्थाने.

लेखक त्याला आकळलेल्या आयुष्याचा एक तुकडा म्हणजेच आयुष्य मानत नाही. मोठ्या लेखकाकडे जीवनाकडे समग्रपणे पाहण्याची शक्ती निर्माण होते. मग त्याचं साहित्य जेव्हा दुःखाकडे  बघतं, नीती- अनीतीकडे बघतं  आणि मग त्याची दुःखाची व्याख्या व्यापक होऊन जाते.  साहित्यिकाला असं दुःखाचं एक समग्र भान आलं की, दुःखाचा परीघच वाढतो.

लेखकाने आजूबाजूच्या कोलाहलापासून अनभिज्ञ वा उदासीन राहता कामा नये हे योग्यच; पण तसंच त्या कोलाहलाला शरणही जाता कामा नये. साहित्यबाह्य प्रवाह आज तर अधिक जोमानेच साहित्यिकांकडून विविध अपेक्षा करीत आहेत. अगदी उच्चरवाने करीत आहेत. या मोजपट्टीत बसलो नाही तर असंवेदनशील अगदी भित्रे वगैरेही ठरवले जाण्याची व्यवस्था कार्यरत असली तरीही लेखकाने आपल्या अंत:स्वराला या गोंगाटात हरवू देता कामा नये. गर्दीत राहून एकटेपण जपलं पाहिजे. एकदा लेखकानं आपलं अस्तित्व एका विविक्षित काळापुरतं नसतंच हे मान्य करून टाकल्यानंतर सभोवातालाशी किंवा त्या मोजपट्टीच्या निकषावर उतरत बसण्याची तमा तरी का बाळगावी?

 लेखकाचं लेखन तो असताना आणि नसतानाही पायपीट करीत राहतं किंबहुना ते त्या ताकदीचं असावं. नाव, पैसा, पुरस्कार हे थांबे क्षणभर विसाव्यासाठी आवश्यक असतीलही; पण पायपीट हेच लेखकाचं भागधेय असतं. ही पायपीट सुखकर होत नाहीच; पण किमान अंगवळणी तरी पडावी इतकाच प्रयास तो करू शकतो.

abhiram.db@gmail.com
(मराठी वाङ्मय परिषद बडोदे, यांनी आयोजित केलेल्या साहित्य संमेलनात केलेल्या अध्यक्षीय भाषणातले संपादित टिपण)

 

Web Title: What should be done about the system that calls the author coward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.