प्रताप सरनाईकांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रामागची नेमकी रणनीती काय? आणि कुणाची?
By यदू जोशी | Published: June 20, 2021 07:26 PM2021-06-20T19:26:48+5:302021-06-20T19:27:38+5:30
प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे महत्त्वाचे आमदार आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राने खळबळ उडवून दिलेली आहे.
यदू जोशी
मुंबई - प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे महत्त्वाचे आमदार आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राने खळबळ उडवून दिलेली आहे. मोठ्या झाडाखाली लहान झाडे वाढत नाहीत असं म्हणतात. एकनाथ शिंदेंसारखे दिग्गज नेते ठाण्यात असतानाही सरनाईक यांनी स्वत:ची जागा निर्माण केली. ते आणि त्यांची मुले ही 'मातोश्री'शी म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबाशी जवळचे संबंध राखून आहेत. 'मातोश्री'शी जवळीक असलेल्यांमध्ये प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री अनिल परब, आ. रवींद्र वायकर हे तिघेही आहेतच. सरनाईक यांनी ही तिन्ही नावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात घेतली आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतले तर केंद्रीय चौकशी संस्थांकडून त्यांना होणारा नाहक त्रास थांबेल अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचे पत्रात नमूद केले आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे होतात पण आमची होत नाहीत ही शिवसेनेच्या काही आमदारांची व्यथाही त्यांनी मांडली आहे. एवढेच नव्हे तर काँग्रेस, राष्ट्रवादीकडून शिवसेनेचे कार्यकर्ते फोडले जात आहेत आणि काँग्रेसने तर एकला चलो रेचा नारा दिला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा आपल्यामागे लागू नये म्हणून महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्री आणि सनदी अधिकारी आपल्या नकळत केंद्रातील सत्ताधारी पक्षाशी हातमिळवणी करीत आहेत असे महत्त्वाचे विधानही त्या पत्रात आहे.
प्रताप सरनाईक यांची 'मातोश्री'शी असलेली आत्यंतिक जवळीक लक्षात घेता त्यांनी नेतृत्वाशी चर्चा न करताच हे पत्र दिले असावे का हा प्रश्न आता विचारला जात आहे. सरनाईक यांना ठाणे जिल्ह्यापासून असलेल्या स्वत:च्या मर्यादांचे उत्तम भान आहे. शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे आणि भाजपसोबत जावे एवढा मोठा सल्ला ते नेतृत्वाला स्वबळावर देतील असे राजकीय जाणकारांना वाटत नाही. शिवसेनेच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार जावे आणि शिवसेना-भाजपचे सरकार यावे हे खासगीत बोलणे वेगळे आणि नेतृत्वाला पत्र देऊन ते सार्वजनिक करणे यात फार मोठा फरक आहे. हे पत्र ९ जून २०२१ रोजी म्हणजे ११ दिवसांपूर्वी लिहिलेले आहे. याचा अर्थ पत्र सार्वजनिक करावे की करू नये यासाठी ११ दिवसांचा अवधी घेण्यात आला हे स्पष्ट आहे.
महाविकास आघाडीचे सरकार हे उद्धव ठाकरे यांच्या आणि पर्यायाने शिवसेनेच्या नेतृत्वात आहे. भाजपसोबत न जाता महाविकास आघाडी करून सरकार स्थापनेचा निर्णय हा उद्धव ठाकरे यांचा होता. सरकार पाच वर्षेच काय पंचवीस वर्षे टिकेल असे ठाकरे म्हणत आले आहेत. असे असताना सरनाईक यांनी भाजपसोबत जाण्याची मांडलेली भूमिका ही जर त्यांची स्वत:ची असेल तर मग ती ठाकरे यांच्या भूमिकेच्या विरोधात जाणारी आहे. एकप्रकारे मग ती बंडाची भाषा म्हणावी लागेल. सरनाईक यांनी केवळ स्वत:च्या विचाराने ते पत्र दिलेले असेल तर मग महाविकास आघाडीबाबत बांधिल असलेली शिवसेना आणि शिवसेनेचे नेतृत्व त्यांच्यावर कारवाई करू शकेल. अशी कारवाई झाली नाही, सरनाईक यांना लेखी विचारणा झाली नाही तर मग ते पत्र प्लान्ट करण्यात आले असा त्याचा अर्थ होईल.
या पत्राचे वेगवेगळे अर्थ घेतले जात आहेत. काँग्रेसने एकला चलो रेच्या घेतलेल्या भूमिकेला चाप लावण्यासाठी दबावतंत्राचा भाग म्हणून तर हे पत्र लिहिले गेले नाही ना, अशी शंका येत आहे. काँग्रेस एकटी लढणार असेल तर शिवसेना व राष्ट्रवादी एकत्रितपणे लढेल असे संकेत शिवसेना आणि राष्ट्रवादीकडूनही दिले जात आहेत.हे पत्र काँग्रेसवर दबाव टाकण्याचा भाग म्हणून शिवसेना व राष्ट्रवादीची एकत्रित खेळी नाही ना असा तर्कही उपस्थित केला जात आहे. आताच्या सरकारमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी हे एकमेकांच्या अधिक जवळ असल्याचे मानले जाते. असे असतानाही या सरकारमध्ये शिवसेना आमदारांची कामे होत नाहीत हे सरनाईक यांचे विधान सरळसरळ निधी वाटपाची जबाबदारी असलेल्या उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधणारे ठरते. या पत्राच्या निमित्ताने राष्ट्रवादीवरदेखील निशाणा साधला गेला आहे. शिवसेना आमदारांमधील अस्वस्थतेला सरनाईक यांनी वाट करून दिली की त्या आडून शिवसेनेनेच राष्ट्रवादीला 'आमच्या आमदारांची अडवणूक करू नका' असा दम दिलाय?
सरनाईक यांच्या पत्राच्या निमित्ताने काँग्रेस व राष्ट्रवादीबाबतची नाराजी व्यक्त करून शिवसेना सरकारमधून बाहेर पडण्यासाठीचे मैदान तयार करत आहे का? येत्या पाचसात दिवसात काय घडामोडी घडतात यावरून ते समजेलच.