मुलांचा जीव घेणाऱ्या ऑनलाइन गेम्सचे काय करायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2024 08:12 AM2024-08-03T08:12:34+5:302024-08-03T08:13:23+5:30

मुलांना ऑनलाइन गेमिंग इतके आकर्षक का वाटते? - कारण, गेमिंग करताना मेंदूमध्ये स्त्रवणारे डोपामाइन हे मनाला आनंदाची जाणीव देणारे हार्मोन!

what to do with online games killing children | मुलांचा जीव घेणाऱ्या ऑनलाइन गेम्सचे काय करायचे?

मुलांचा जीव घेणाऱ्या ऑनलाइन गेम्सचे काय करायचे?

गुंजन कुलकर्णी, मानसोपचारतज्ज्ञ

पुण्यातल्या पिंपरी भागात एका १५ वर्षाच्या मुलाने ऑनलाइन गेमिंगच्या नादात १४ व्या मजल्याच्या बाल्कनीतून उडी मारली, त्यात त्याचा मृत्यू झाला. अस्वस्थ करणारी ही भयानक घटना. व्हिडीओ व ऑनलाइन गेमिंग  या व्यवसायाचे भारत हे जगातील सर्वांत मोठे मार्केट आहे. भारतातील सहजपणे इंटरनेट उपलब्ध असणाऱ्यांपैकी ६०% किशोरवयीन  मुले रोज ३ तासांपेक्षा जास्त वेळ सोशल मीडिया आणि ऑनलाइन गेमिंगमध्ये व्यतीत करतात. 

किशोरवयामध्ये मुलांच्या मेंदूमध्ये अनेक बदल होत असतात. नवीन न्यूरॉन्सची जोडणी होत असते. समस्या सोडवणे, निर्णय घेणे, सारासार विचार करणे अशी क्लिष्ट आणि आयुष्यभर उपयोगी पडणारी कौशल्ये आत्मसात करण्याची प्रक्रिया या वयात मेंदूमध्ये होत असते. काही अंशी ही जीवनकौशल्ये गेमिंगच्या माध्यमातून शिकता येऊ शकतात; पण या उपयुक्ततेला खूप मर्यादा आहेत. गेमिंग कंपन्यांना आपल्या मुलांच्या मेंदूच्या विकासाशी फारसे देणे-घेणे नसते. त्यांच्यासाठी जितक्या लहान वयात जितकी अधिक मुले वेळ, ऊर्जा आणि पैसा गुंतवतील तितका त्यांचा आर्थिक आलेख वाढत असतो. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी या कंपन्या लक्ष खेचून घेणारे, जास्तीत जास्त काळ गुंतवून ठेवणारे गेमिंग फिचर्स मार्केटमध्ये आणत राहतात. किशोरवयीन मुले तर त्यांचे खूप महत्त्वाचे ग्राहक आहेत. कारण त्यांचे लक्ष खेचून घेणे सोपे असते.

मुलांना हे गेम्स इतके आकर्षक का वाटतात? - कारण, गेमिंग करताना मेंदूमध्ये स्त्रवणारे डोपामाइन हे मनाला आनंदाची जाणीव देणारे हॉर्मोन. एखाद्या कृतीला ताबडतोब काहीतरी बक्षीस (गेममध्ये पॉइंट्स, स्पेशल पॉवर्स, वेपन्स, सोशल मीडियावर लाइक्स, हार्ट्स, टॅग्ज) मिळत गेले तर ही जाणीव वारंवार होत राहते. ती जाणीव सतत हवीहवीशी वाटत राहते. काही काळाने त्यासाठी अजून मोठ्या उत्तेजनाची (पुढची लेव्हल विकत घेण्याचे फिचर्स) गरज निर्माण होत जाते. या मानवी प्रवृत्तीचा पद्धतशीर विचार करून व्हिडीओ गेम्स डिझाइन केले जातात. गेमिंगमध्ये खूप वेळ घालवणाऱ्या व्यक्तींच्या हे लक्षात येत नाही की, कालांतराने ‘ते गेम खेळत नसतात, तर गेम त्यांना खेळवत असतो.’ 

तासनतास ऑनलाइन गेमिंग खेळणाऱ्या मुलांच्या विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो, रोजचे आयुष्य अतिशय नीरस वाटू लागते. भावनिकदृष्ट्याही ती कमकुवत होत जातात.  गेम्समधली हिंसा त्यांच्या वागण्यात आक्रमकता आणू शकते. मुलांचा आपल्या विचारांवर, वागण्यावर ताबा राहत नाही.
ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म्सचा अजून एक मोठा धोका म्हणजे सायबर क्राइम. मुले बऱ्याचदा आपली खासगी माहिती इंटरनेटवर देतात,  फोटो पाठवतात, काही वेळा पालकांपासून लपवून पैशांचे व्यवहार करतात. हे सगळे किती धोकादायक असू शकते, याची त्यांना या वयात जाणीव नसते.

पालक, शिक्षक काय करू शकतात? 

आपले मूल इंटरनेटवर काय करते याबाबत सतर्क राहा. गरज असेल तिथे तंत्रज्ञानाची माहिती असणाऱ्या मित्रमंडळींची मदत घ्या. मुलांशी गेमिंगबद्दल मोकळेपणाने आणि स्पष्ट बोला. मुलांची काही कौशल्ये विकसित करण्यासाठी गेमिंगचा चांगला वापर करून घेता येईल का, याचा विचार करा. स्क्रीन, इंटरनेट, गेमिंगच्या पलीकडच्या प्रत्यक्ष जगाचे एक्स्पोजर मुलांना सातत्याने मिळेल, यासाठी प्रयत्नशील राहा. ट्रेकिंग, कॅम्पिंग, प्रवास, स्पर्धात्मक  खेळ, घरातली कामे, बँकेचे व्यवहार, आर्थिक नियोजन अशा कृतींतून मुलांची जीवनावश्यक कौशल्ये विकसित होऊ शकतात. फक्त ‘गेम खेळू नको, अभ्यास कर’ हे वाक्य वारंवार ऐकवून काही साधणार नाही. वर उल्लेख केलेली काही लक्षणे मुलांमध्ये दिसत असतील; त्याविषयी चिंता वाटत असेल तर मानसिक आरोग्यातील तज्ज्ञांची (सायकॉलॉजिस्ट, सायकिॲट्रिस्ट) मदत घ्या.
gunjan.mhc@gmail.com


 

Web Title: what to do with online games killing children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे