शराफतीची अपेक्षा होती काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2016 01:03 AM2016-09-23T01:03:40+5:302016-09-23T01:03:40+5:30
काश्मीर प्रश्नात संयुक्त राष्ट्र संघटनेने (युनो) मध्यस्थी करावी यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी घातलेली गळ वा विनंती युनोने नाकारल्यामुळे भारताला हुरळून जाण्याचे कारण नाही.
काश्मीर प्रश्नात संयुक्त राष्ट्र संघटनेने (युनो) मध्यस्थी करावी यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी घातलेली गळ वा विनंती युनोने नाकारल्यामुळे भारताला हुरळून जाण्याचे कारण नाही. युनो काय किंवा अमेरिका काय, दोहोंनी आजवर जी भूमिका घेतली आहे, तिचाच युनोने पुनरुच्चार केला इतकाच याचा अर्थ. पण तो करताना, काश्मीर हे भारताचे अभिन्न अंग आहे आणि तेथील स्थिती हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, ही भारताची रास्त आणि वास्तव भूमिका कुठे तरी छेदली जाते, हे सहसा लक्षात घेतले जात नाही. ती लक्षात घेतली गेली तर भारत देश त्याचे तो पाहून घेईल, पाकचा याच्याशी काही संबंध नाही असे युनो वा अमेरिकेने ठणकावून सांगितले असते पण तसे आजवर कधी झाले नाही व यापुढेही होण्याची शक्यता नाही. त्यामुळेच जेव्हां केव्हां युनोच्या आमसभेत बोलण्याची संधी मिळते तेव्हां पाकिस्तान हमखास काश्मीरचा प्रश्न उकरुन काढतो व मध्यस्थीची विनंती करतो. प्रत्येक वेळी त्याची ही विनंती फेटाळलीही जाते पण ती फेटाळतानाच काश्मीरबाबत पाकिस्तान हे राष्ट्रदेखील एक ‘स्टेक होल्डर’ असल्याचे अपरोक्षपणे मान्य केले जाते व कुरापती काढायला पाकच्या दृष्टीने तेवढे पुरेसे असते. पाकिस्तानचे विद्यमान तथाकथित लोक निर्वाचित पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी युनोच्या आमसभेत बोलताना, पुन्हा तोच प्रयोग सादर केला. काश्मीरची समस्या (?) सुटत नाही तोवर शांतता प्रस्थापित होणे कठीण आहे वगैरे नेहमीची भाषा करताना त्यांनी बुऱ्हान वानी या ठार मारल्या गेलेल्या हिजबुलच्या अतिरेक्याला ‘नायक’ संबोधित केले. त्यांच्या या भाषणाचे भारतीय नेत्यांना आणि माध्यमांना आश्चर्य वाटल्यासारखे दिसते. याचा अर्थ नवाझ शरीफ यांच्याकरवी त्यांना शराफत अपेक्षित असावी असे दिसते! नवाझ शरीफ जरी पाकी जनतेने निवडून दिलेले पंतप्रधान म्हणजे सरकार प्रमुख असले तरी युनोच्या आमसभेपुढे बोलण्यापूर्वी ते पाकिस्तानचे लष्कर प्रमुख राहील शरीफ यांच्याशी चर्चा करतात व त्यांचे मार्गदर्शन घेतात आणि मगच बोलायला सिद्ध होतात, यातच सारे आले. पण त्याच्याही पुढे म्हणजे हेच शरीफ या आधीही पंतप्रधान असतानाच्या काळात तत्कालीन लष्कर प्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी कारगील युद्ध छेडले आणि शरीफ यांना म्हणे त्याचा काही पत्ताच नव्हता. याचा अर्थ भारतीय पंतप्रधान आणि पाकी पंतप्रधान मुळातच समान पातळीवर नसल्याने त्यांच्यात त्या पातळीवर चर्चा होऊ शकत नाही व झाली तरी ती उपयोगी ठरत नाही. त्याचबरोबर शरीफ यांनी युनोत केलेल्या वक्तव्याला भारताच्या प्रतिनिधी श्रीमती एनाम गंभीर यांनी जशास तसे उत्तर दिले, यालाही फारसा अर्थ उरत नाही. अखेर ज्याचे त्याचे प्रश्न त्यालाच सोडवायचे असतात आणि त्या दृष्टीने भारत स्वत: याबाबत किती सक्षम किंवा सावध आहे, हेच महत्वाचे ठरते. भारत-पाक दरम्यानच्या नियंत्रण रेषेपासून (एलओसी) हाकेच्या अंतरावर असलेल्या उरी येथील लष्कराच्या मोक्याच्या तळावर पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ला करणार असल्याची आणि दहशतवाद्यांच्या तीन तुकड्या एलओसी ओलांडून भारतात शिरत असल्याची गुप्त वार्ता गुरुवारी म्हणजे प्रत्यक्ष हल्ला होण्याच्या तीन दिवस अगोदर गुप्तचर विभागाने लष्कराला आणि सीमेचे रक्षण करणाऱ्या यंत्रणांना दिली होती असे आता उघड झाले आहे. संरक्षण मंत्री जिला छोटीशी गफलत म्हणतात, ती हीच तर नव्हे? आणि हिला छोटीशी गफलत कसे म्हणता येईल? गुप्तचर विभागाने ठोस माहिती पुरवूनदेखील संबंधित यंत्रणांनी सावध होऊन आवश्यक ती खबरदारी घेतली नसेल तर दहशतवाद्यांनी बेसावध गाठून हल्ला केला, असे म्हणण्याला अर्थ उरत नाही. त्याचबरोबर मग जे अठरा जवान मारले गेले, त्यांनाही केवळ त्यांच्या वरिष्ठांची उदासीनता आणि हलगर्जीपणा यापायी हकनाक बळी जावे लागले असेही यातून दिसून येते. त्यामुळेच मग यापुढे आम्ही अधिक सतर्क राहू हे संरक्षण मंत्र्यांचे विधान व पंतप्रधानांनी जातीने एलओसीवरील सज्जतेची केलेली पाहाणी यालादेखील फारसा अर्थ उरत नाही. उरी लष्करी तळावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर व आपल्या अठरा जवानांची आहुती दिल्यानंतर भारतीय लष्कराने एलओसी ओलांडून व पाकी हद्दीत प्रवेश करुन दहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले अशा बातम्या प्रसृत झाल्या. हा वेंधळेपणा म्हणायचा की बावळटपणा? आजवर पाकिस्तानने कधी तरी आम्ही भारतीय हद्दीत शिरुन गोळीबार केल्याचा किंवा भारतीय सैनिक वा नागरिक यांना ठार केल्याचा उघड दावा केला आहे का? ते तर राहोच पण मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यात जो एकमात्र जिवंत अतिरेकी पकडला गेला त्या अजमल आमीर कसाबलाही पाकिस्तान्यांनी कधीच आपला मानले नाही. अशा स्थितीत भारतीय जवान आमच्या हद्दीत घुसखोरी करुन शिरले व त्यांनी आमच्या ‘निष्पाप’ नागरिकांना ठार मारले असा कांगावा पाकिस्तान पुन्हा भारतीय माध्यमांमधील संबंधित बातम्यांच्याच आधारे करु शकतो. एवढा मोठा खंडप्राय देश असूनही भारताला चिमुकला पाकिस्तान आपल्या खोडसाळपणाने का आणि कसा त्रस्त करतो याचे गमकदेखील मग अशाच काही बाबतींमध्ये असल्याचे दिसून येते.