संशोधन आणि संशोधन वृत्तीचे काय होते?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 11:15 AM2019-05-07T11:15:56+5:302019-05-07T11:17:15+5:30
मिलिंद कुलकर्णी भारतीय शिक्षण पध्दतीविषयी बरे-वाईट असे खूप काही बोलले जाते. सरकार बदलते तसे अभ्यासक्रमदेखील बदलत असतात. पुरातन काळात ...
मिलिंद कुलकर्णी
भारतीय शिक्षण पध्दतीविषयी बरे-वाईट असे खूप काही बोलले जाते. सरकार बदलते तसे अभ्यासक्रमदेखील बदलत असतात. पुरातन काळात आम्ही खूप विज्ञानवादी, समृध्द होतो, मध्यंतरी आक्रमणामुळे आमच्या शिक्षण व संशोधनावर मर्यादा आल्या. दीडशे वर्षांच्या इंग्रजाच्या राजवटीत केवळ कारकून तयार करणारे शिक्षण देण्यात आले. आम्ही तेज:पूंज इतिहास विसरलो, असा एक युक्तिवाद मांडला जातो. विज्ञान संमेलनात केंद्रीय मंत्रीच अशास्त्रीय विधाने करीत असतो. दीडशे वर्षांच्या राजवटीवर खापर आम्ही गेली ७० वर्षे फोडत आहोत. या काळात आम्ही आमुलाग्र बदल का करु शकलो नाही? परदेशात शिकायला आणि नोकरीनिमित्ताने स्थायिक होणाऱ्या तरुणाईला रोखण्यात येणाºया अपयशाला आमची शिक्षणपध्दती, रोजगार निर्मिती करणारी यंत्रणा, समाज आणि सरकार हे जबाबदार नाहीत काय? ‘बे्रन ड्रेन’विषयी केवळ कंठशोष करण्यात काय हशील आहे?
महाराष्टÑाच्या शिक्षण पध्दतीविषयीच बोलूया. किती बदल झाले? धोरणात सातत्यदेखील राहिले नाही. मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, सेमी इंग्रजी माध्यम ही माध्यमे, पुन्हा स्टेट बोर्ड, सीबीएसई, आयसीएसई हे बोर्ड आले. तालुक्याच्याठिकाणी इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले. बरे सगळ्या शाळांच्या नावांमध्ये ‘ग्लोबल, इंटरनॅशनल’ अशी नावे आहेत, इमारती चकाचक आहेत. मोठी मैदाने आहेत. तगडे शुल्क घेतले जाते. परंतु, एका तुकडीत ८० विद्यार्थी, अप्रशिक्षित शिक्षकवर्ग, अभ्यासक्रमाच्या पुस्तकांसोबत पूरक पुस्तकांची सक्ती, शिक्षणामधील प्रेम, आनंद हरपून सक्ती, पाठांतर, स्पर्धा यात मुले भरडली जात आहेत, असे एकंदरीत चित्र आहे. मराठी शाळांविषयी आम्ही केवळ गळा काढतो, परंतु, ती वाचविण्यासाठी कुणालाच रस नाही. मातृभाषेतून दिले जाणारे शिक्षण विद्यार्थ्याला लवकर समजते, आत्मसात होते हे आम्हाला पटत असूनही आम्ही पाल्याला इंग्रजी माध्यमांमध्ये घालतो. पालकांचे इंग्रजीशी सख्य नाही, पण मुलगा फाडफाड इंग्रजी बोलला पाहिजे. इंग्रजीशिवाय त्याचे भवितव्य धोक्यात येऊ नये, असा भाबडा आशावाद बाळगत ही प्रक्रिया निरंतर वाढत आहे.
कलचाचणी, बुध्दयांक चाचणी असे शास्त्रीय प्रयोग अलीकडे सुरु झाले आहेत. पण खरोखर त्याचा उपयोग होत आहे काय? पालकांनी पाल्याच्या लहानपणीच ठरवून टाकलेले असते की, तो कोण होणार? त्यासाठी आठवीपासून क्लासेस, आर्थिक नियोजन अशा तरतुदी केल्या जातात. पालकांच्या अपेक्षांचे मोठे ओझे बाळगत पाच वर्षे प्रचंड मेहनत करतो. या काळात त्याच्या आवडीनिवडी, मित्र, खेळ, नातेवाईकांकडील लग्नकार्ये यापासून त्याला पूर्ण अलिप्त ठेवले जाते. अभ्यास, क्लास एवढेच त्याचे विश्व बनते.
स्पर्धात्मक युगात चांगल्या महाविद्यालयात, चांगल्या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला नाही की, त्याच्यासह पालकांचा अपेक्षाभंग होतो. आभाळ कोसळल्यासारखी स्थिती होते. पाल्याचा तर पुरता हिरमोड होतो. न्यूनगंडाने तो पछाडतो. अनिच्छेने पर्यायी अभ्यासक्रम, महाविद्यालय निवडतो, मात्र यावेळी तो उत्साह, जोश नसतो. शिक्षणाविषयीच्या उर्मी नाहिशा होतात. आवड असलेल्या क्षेत्रात काही करता आले नाही, याची खंत असते. ज्याच्या पाठीमागे धावलो, ते मिळाले नाही, हे दु:ख आणि आता पोटपाण्यासाठी काहीतरी करायचे म्हणून पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणे यात इतिकर्तव्यता आहे, अशी भावना निर्माण होते.
आम्ही मुलांना असे धड ना इकडचे ना तिकडचे असे करीत आहोत. अशा मानसिकतेची मोठी फौज तयार होत आहे. शाळकरी जीवनात प्रयोगशाळेत रमणारे, विज्ञान प्रदर्शनात उत्साहाने नवनवे प्रयोग करणारे, आवडीच्या क्रीडा प्रकारासाठी तासन्तास मैदानात वेळ घालविणारे, क्रीडा स्पर्धांसाठी वेगवेगळ्या गावांना जाणारे, लेखन, भाषण, गायन , वादन, नृत्य अशा कलाप्रकारांनी समृध्द झालेले मन वेगवेगळ्या मैफली गाजविण्याचे आणि बड्या गुरुंचे गंडे बांधण्याचे स्वप्न पाहत असताना व्यावहारीक जीवनातील शिक्षणाच्या पदव्या त्यांना खुणावू लागतात आणि आवडीचे क्षेत्र दूर राहते आणि ‘सब घोडे बारा टके’ अशा झुंडीत ही मुले सहभागी होतात. काय साधतोय, यातून आपण हा उद्विग्न करणारा प्रश्न मनात येतोच.