काय गरज होती या उद्धटपणाची?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 01:21 PM2023-07-30T13:21:54+5:302023-07-30T13:22:46+5:30
दुबळ्या संघाने भंबेरी उडवल्यानंतर तीळपापड होणे साहजिकच... पण म्हणून ‘ही’ पातळी गाठावी?
रोहित नाईक, वरिष्ठ उपसंपादक
यामालिकेतून खूप शिकण्यास मिळाले. क्रिकेटव्यतिरिक्त खूपच. जी पंचगिरी या सामन्यात झाली ती अनपेक्षित होती. पुढच्यावेळी जेव्हा आम्ही बांगलादेशला येऊ तेव्हा नक्कीच आम्हाला या प्रकारच्या पंचगिरीचा सामना करावा लागेल, अशा तयारीनेच येऊ.’ ही प्रतिक्रिया होती भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिची. बांगलादेशविरुद्धचा अखेरचा आणि तिसरा एकदिवसीय सामना बरोबरीत सुटल्यानंतर भारतीय कर्णधाराचा तोल गेला.
सामन्यात पंचांचा निर्णय न पटल्याने तिने रागाने बॅट स्टम्पवर मारली आणि तंबूत परतताना पंचांनाही बडबडली. पुरस्कार सोहळ्यात वरील वक्तव्य केल्यानंतरही हरमनप्रीतचा राग कमी झाला नव्हता. दोन्ही संघांना संयुक्तपणे ट्रॉफी देण्यात आली, तेव्हा बांगलादेशची कर्णधार निगार सुल्ताना हिला हरमन म्हणाली की, ‘फक्त तुम्हीच का आलात? पंचांनाही बोलवा. सामना बरोबरीत सोडवण्यात त्यांचाही वाटा आहे.’ तसेच हरमनने ट्रॉफीही काहीशी स्वत:कडेही खेचली. यामुळे बांगलादेशच्या कर्णधाराने फोटोशूटवर बहिष्कार टाकत आपल्या संघाला तंबूत नेले. यानंतर हरमनप्रीतवर टीका झाली आणि आयसीसीनेही तिच्यावर दोन सामन्यांची बंदी घातली.
यामुळे झाले काय? हरमनप्रीतने केवळ बेधडकपणे झालेल्या अन्यायाविरुद्ध ‘निडरपणे’ आवाज उठवला असे सांगत काहींनी तिचे समर्थन केले. तिने आवाज उठवला ठीक आहे, पण आवाज उठवण्याची तिची पद्धत पूर्णपणे चुकली. क्रिकेटविश्वातील सर्वात बलाढ्य बोर्डाचे प्रतिनिधित्व करताना हरमनप्रीतने समजूतदारपणा दाखवणे आवश्यक होते. खेळांमध्ये चुकीच्या पद्धतीने निर्णय देणे नवे नाही आणि क्रिकेटमध्ये तर नाहीच नाही. सर्वात चांगले उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर. सचिनविरुद्ध जर एकही चुकीचा निर्णय दिला गेला नसता, तर आज त्याच्या आंतरराष्ट्रीय शतकांची संख्या १२०-१२५ हून अधिक नक्कीच झाली असती. प्रत्येक चुकीच्या निर्णयावर सचिनने कधीच असा आक्रस्ताळेपणा केला नाही. उद्धटपणा तर दूर, कधी त्या पंचाविरुद्ध एक शब्दही काढला नाही. केवळ निराश मनाने मैदान सोडले आणि पुन्हा नव्या जोमाने त्याच पंचासमोर आत्मविश्वासाने फटकेबाजी केली. म्हणून सचिनला या खेळातील देवत्व मिळाले.
महिला प्रीमियम लीगमध्ये (डब्ल्यूपीएल) हरमनप्रीतची निवड मुंबई इंडियन्स संघात झाली तेव्हा तिला आनंद होता तो सचिनच्या संघात प्रवेश झाल्याचा. सचिन सर्वच क्रिकेटपटूंसाठी आदर्श आहे. मात्र, त्याच्याकडील कोणता गुण आपण आत्मसात केला, याचा विचार आता या क्रिकेटपटूंना करावा लागेल. क्रिकेटविश्वाची पंढरी असलेल्या ‘लॉर्ड्स’ मैदानाच्या गॅलरीमध्ये सौरव गांगुलीने सर्वांसमोर आपले टी-शर्ट हवेत फिरवत शिस्तप्रिय ब्रिटिशांना आक्रमक रूप दाखवले होते. त्याच्या या आक्रमकतेमागे भारतीयांना कमी लेखल्याची एक ‘चीड’ होती. इथे बांगलादेशसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध नको तितकी आक्रमकता दाखवून हरमनप्रीतने काय मिळवले ते तिलाच ठाऊक? हीच मग्रुरी हरमनप्रीत ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडसारख्या संघांविरुद्ध त्यांच्याच देशात दाखवू शकेल का?
मुळात हरमनप्रीतला हा विषय वाढवण्याची गरजच नव्हती. बांगलादेश एकदिवसीय क्रमवारीत सातव्या, तर भारतीय संघ चौथ्या स्थानी आहे. तरीही पहिला सामना जिंकत बांगलादेशने आघाडी घेतली. यानंतर दुसरा सामना सहजपणे जिंकत बरोबरी साधलेल्या भारतीय संघाकडून मालिका विजयाची अपेक्षा होती. अखेरचे ५ बळी केवळ ३४ धावांत गमावल्याने भारताला बरोबरीवर समाधान मानावे लागले. बांगलादेशसारख्या संघाविरुद्ध जर असे झुंजावे लागत असेल, तर कर्णधार म्हणून हरमनप्रीतला आपल्या संघाच्या क्षमतेबाबत अधिक विचार करण्याची गरज आहे. पण तिने हा सगळा राग आधी स्टम्पवर आणि नंतर पंचांवर काढला. या सर्व प्रकरणात इभ्रत गेली ती भारताची.
ज्यावेळी विराट कोहलीची भारताच्या कर्णधारपदी निवड झाली होती, तेव्हा तो भारताला सौरव गांगुलीनंतरचा लाभलेला पहिला आक्रमक कर्णधार ठरला होता. यावर खुद्द गांगुलीने ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, ‘खेळाडूमध्ये आणि विशेष करून कर्णधारामध्ये आक्रमकता असायलाच हवी. पण, त्याचबरोबर ती आक्रमकता कुठे आणि कशी वापरावी, हेही महत्त्वाचे आहे.’ आज गांगुलीचा हाच संदेश सर्वच खेळाडूंनी लक्षात घेणे गरजेचे आहे.