‘एक अलबेला’चं पुढं काय होणार ?
By admin | Published: July 3, 2016 02:36 AM2016-07-03T02:36:51+5:302016-07-03T02:36:51+5:30
भगवानदादांच्या ‘अलबेला’ या चित्रपटाबाबतीत जे त्या काळी घडलं होतं तेच या ‘एक अलबेला’ चित्रपटाबाबतीत घडताना दिसते आहे. त्यात काहीही बदल नाही. यामुळे तेव्हा काय आणि
- मंगेश देसाई
भगवानदादांच्या ‘अलबेला’ या चित्रपटाबाबतीत जे त्या काळी घडलं होतं तेच या ‘एक अलबेला’ चित्रपटाबाबतीत घडताना दिसते आहे. त्यात काहीही बदल नाही. यामुळे तेव्हा काय आणि आज काय तेच चालू आहे. परिस्थिती फारशी बदललेली नाही याची खात्री पटली. त्यामुळेच आता पुन्हा अनेक प्रश्न मनात साचत चालले आहेत.
सगळीकडे ज्या चित्रपटाची चर्चा आहे, त्यातली गाणी गाजत आहेत. मंगेशच्या भगवानदादाचं आणि विद्या बालनच्या गीता बालीचं सगळीकडून कौतुक होत आहे.. ज्या सिनेमाला समीक्षकांनी उचलून धरलं.. मीडियानं उचलून धरलं.. तो चित्रपट चित्रपटगृहांत नाही का, असा प्रश्न अनेकांना पडला. तसाच हा प्रश्न मलाही पडला आणि त्यानंच मला खूप त्रास झाला.
खरंतर, या लेखमालेची सुरुवात वेगळीच करायची होती; पण कालपासून माझ्या मनात खूप वादळं निर्माण झाली. त्यांना वाट करून देणं फार गरजेचं होतं. आणि त्यासाठी आपली वाटणारी माणसंच पाहिजेत.
मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, बीड, नांदेड एवढंच नाही, तर यू.के. असे देश-परदेशातले प्रेक्षक अनेक दिवसांपासून ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते तो ‘एक अलबेला’ २४ जूनला प्रदर्शित झाला. सोमवारपासून काही लोकांचे तो चित्रपट पाहण्याचे बेत पावसाने बदलायला लावले. निसर्गापुढे कोण काय करणार? म्हणून गेल्या सोमवारपासून मित्रमंडळी आणि नातेवाइकांबरोबर ‘एक अलबेला’ पाहण्याचं प्लॅनिंग अनेक लोकांनी केलं. आणि अॅडव्हान्स बुकिंगसाठी आॅनलाइन बघायला सुरुवात केली. तर चित्रपट कुठेच दिसेना. म्हणून बरीच माणसं चित्रपटगृहांकडे गेली तर समजलं की ‘एक अलबेला’ आता चित्रपटगृहांत नाही.
मी २८ जूनला माझ्या वाढदिवसानिमित्त आणि ‘एक अलबेला’निमित्त आलेल्या २५०० फोन कॉल्सला उत्तर दिले. साधारण ३ हजारच्या वर मेसेजेसला उत्तरं दिली. त्यातले अनेक माझ्या फिल्ममधले मित्र, ओळखीचे होते. (ते तर खोटे बोलणार नाहीत ना!) प्रत्येकाने माझे, सिनेमाचे कौतुक केले. मी प्रत्येकाला बुकिंगबद्दल विचारत होतो. आणि आॅड डेला ५० टक्केच्या वर बुकिंग होतं असं उत्तर ऐकत होतो. थिएटरला भेट दिली. तेव्हाही हा सिनेमा लोकांना आवडतो आहे, चालणार, पावसाने थोडा प्रेक्षक स्लो झाला आहे. पण तरीही येणार अशी उत्तर ऐकली. अनेक पन्नाशीच्या वर असलेल्या आजोबा, काकींचे आशीर्वाद घेतले आणि एवढं सगळं असतानाही शुक्रवारपासून हा सिनेमा कोठेच नाही. हे भयानक आणि लाजिरवाणं आहे. भगवानदादांच्या ‘अलबेला’ या चित्रपटाबाबतीत जे घडलं तेच या ‘एक अलबेला’ चित्रपटाबाबतीत घडताना दिसतंय. त्यात काहीही बदल नाही. आजही तेच चालू आहे याची खात्री पटली. आणि पुन्हा अनेक प्रश्न मनात आले. ज्यांना हा सिनेमा आवडला ते ढं आहेत का? माझं, सिनेमाचं भरभरून कौतुक करत होते. ते माझे दुश्मन आहेत का?
सिनेमासृष्टीत राजकारण आणि तेही घाणेरडं राजकारण शिरलं आहे, हे सिद्ध झालं. तेवढा आत्मपरीक्षण करणारा नट आहे. एवढी छान प्रसिद्धी. विद्या बालनसारखी उत्कृष्ट अभिनेत्री, भगवानदादांचं व्यक्तिचरित्र असतानाही आणि सिनेमा लोकांना पाहायचा असतानाही असा तो थिएटरवरून काढून टाकला जातो तर इतर मराठी सिनेमा निर्मात्यांनी काय करावे? सीडी घरीच बघावी. मराठी माणसांच्या महाराष्ट्रात मराठी (चालणाऱ्या) सिनेमांचेच हे हाल इतर भाषिक करणार असतील तर माझा या ‘मराठी चित्रपट’सृष्टीवरचा विश्वास फार काळ टिकणार नाही. माझीच माणसं मला साथ देत नसतील तर बाकीच्या भाषांचे सिनेमे करून मी आनंदात राहीन. ते कसेही वागले तरी फार वाईट वाटणार नाही; कारण ते माझे नाहीतच. मला माझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरे माझे प्रेक्षकच देऊ शकतात. आणि अजून एका प्रश्नाचं उत्तर द्यावं, या आठवड्यात एकही नवीन सिनेमा प्रदर्शित होत नसतानाही ‘एक अलबेला’ चित्रपटगृहांतून का काढला?
(जुलै महिन्याचे मानकरी असलेले लेखक प्रसिद्ध अभिनेते आहेत.)