संजय राऊतांच्या सुटकेनंतर आता काय होईल? अदृश्य हातांनी मदत केली असेल!..खरं-खोटं काय ते कळेलच!

By यदू जोशी | Published: November 11, 2022 07:56 AM2022-11-11T07:56:40+5:302022-11-11T07:57:51+5:30

राष्ट्रवादीचे नेते ‘आतच’ असताना राऊत कसे बाहेर आले ? - काही संशयात्मे म्हणतात, अदृश्य हातांनी मदत केली असेल!.. खरं-खोटं काय ते कळेलच !

What will happen after the release of Sanjay Raut | संजय राऊतांच्या सुटकेनंतर आता काय होईल? अदृश्य हातांनी मदत केली असेल!..खरं-खोटं काय ते कळेलच!

संजय राऊतांच्या सुटकेनंतर आता काय होईल? अदृश्य हातांनी मदत केली असेल!..खरं-खोटं काय ते कळेलच!

Next

यदु जोशी
सहयोगी संपादक,लोकमत

राष्ट्रवादीचे नेते ‘आतच’ असताना राऊत कसे बाहेर आले ? - काही संशयात्मे म्हणतात, अदृश्य हातांनी मदत केली असेल!.. खरं-खोटं काय ते कळेलच!

काँग्रेसचे नेते राहुल गांधी पदयात्रेच्या निमित्ताने तयार करीत असलेला माहोल आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची तुरुंगातून सुटका या दोन घटनांनंतर महाराष्ट्राचे राजकारण कसे असेल, याबाबत आता उत्सुकता आहे. राहुल यांना जनसामान्यांचा मिळत असलेला मोठा  प्रतिसाद आणि राऊत यांचे बाहेर येऊन डरकाळी फोडणे या दोन्ही गोष्टी एकाचवेळी घडत असल्याने भाजप-शिंदे सेनेला कुठेतरी काहीतरी धडधड होतच असेल. राऊत यांची तोफ सुरू झाली आहे. तुरुंगात १०० दिवस पूर्ण करून राऊत बाहेर आले आहेत. कैदेतले एकाकी क्षण आत्मचिंतन करायला लावतात.

राऊत यांनीही ते केलेच असेल; त्यातून त्यांची कुठली भूमिका तयार झाली, ते कळेलच. एकदा तुरुंगात गेल्यावर माणसं अधिक  बेडर होतात किंवा खचतात.  राऊत  अधिक निडर झाले असण्याचीच शक्यता अधिक! त्यातच त्यांची अटक बेकायदा होती, असे ताशेरे न्यायालयाने ओढणे, ही बाब ठाकरे गटाच्या पथ्यावर पडणारी आहे. पुढच्या काळात त्याचे भांडवल होत राहील. ठाकरे-शिंदे, ठाकरे-भाजप संघर्ष टोकाला जाऊ शकतो. काही नवीन चौकशा रडारवर येऊ शकतात. अनिल देशमुख, नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे नेते आतच आहेत; पण राऊत बाहेर आले, यात काही लोक राजकारण शोधत आहेत. कोणाचं, कुठे, काही बोलणं झालं असेल, अदृश्य हातांनी मदत केली असेल वगैरे लोक म्हणतात; खरं-खोटं त्या अदृश्य हातांनाच माहिती! काही अटी-शर्ती होत्या का? हेही काही दिवसांतच कळेल. राऊत पूर्वीसारखेच भाजप, शिंदेंवर तुटून पडले तर समजायचं की वैसा कुछ भी नही था! भाजपच्या कोणत्या नेत्यांवर ते तुटून पडतात, यालाही वेगळे संदर्भ असतीलच.

जनसंपर्काचा नवा ट्रेंड
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा बुलढाणा जिल्ह्याच्या टोकावरून पुढच्या आठवड्यात मध्य  प्रदेशात जाईल. त्यांनी तयार केलेलं वातावरण टिकवून वाढवण्यात महाराष्ट्रातील काँग्रेस नेते किती यशस्वी होतात, ते पाहायचं. राहुल यांनी या पदयात्रेच्या निमित्ताने स्वत:ला निर्विवादपणे  प्रस्थापित केलं आहे. त्यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीतील विजय हा पुढचा टप्पा असेल. तो टप्पा २०२४ मध्ये किंवा २०२९ मध्येही येईल कदाचित. तोवर संयम राखण्याची काँग्रेसच्या नेत्यांची किती तयारी आहे, यावर बरंच काही अवलंबून असेल.  राहुल गांधी हे आबालवृद्धांना छातीशी कवटाळत ज्या पद्धतीने लोकांमध्ये मिसळत आहेत; ते पाहता कपड्यांची इस्री न मोडणारे सर्वपक्षीय नेते ‘सोचने पे मजबूर’ झाले आहेत. राहुल यांच्याकडे आज देण्यासारखं काही नाही; पण ते विश्वास देत आहेत... आणि लोकांना तोच हवा आहे!

हा तर विरोधाभास !
राहुल सामान्यांमध्ये मिसळत असताना मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालय सामान्यांना दुपारी ३ पर्यंत बंद करण्यात आलं आहे. अर्थात दोष लोकांचाही आहे, मुख्यमंत्री कार्यालयात घुसायचं, अधिकारी केबिनमध्ये नसताना त्यांच्याकडील फायली धुंडाळायच्या, असे  प्रकार छुटपुट नेते, कार्यकर्त्यांकडून घडत होते. त्यामुळे नाईलाजाने दरवाजे बंद  करावे लागले. मात्र, गर्दीचं योग्य नियोजन करण्याचा पर्याय वापरता आला असता.  मी कुणालाही, कुठेही, कधीही भेटतो, असं मुख्यमंत्री शिंदे सांगतात आणि तसे वागतातदेखील. मुख्यमंत्री आरोग्य कक्षातून काही मिनिटांत चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या रुग्णांना तत्काळ मदत दिली जाते. अशा लोकमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचे दरवाजे दुपारी ३ पर्यंत सामान्यांसाठी बंद ठेवणं हा विरोधाभास आहे. अधिकाऱ्यांना लोक तसेही नकोच असतात. मंत्रालयात २ ते ४ या वेळेत लोकांना भेटणाऱ्या अधिकाऱ्यांचा मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी सत्कार केला पाहिजे. ते स्वत: रात्री ११ पर्यंत मंत्रालयात असतात!

शिंदेंचे बडबोले सैनिक
अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, संतोष बांगर, शहाजीबापू पाटील हे ढाल-तलवारीतली तलवार तोडायला पुरेसे आहेत. राज्यातले उद्योग बाहेर पाठविण्यापेक्षा यांना कुठेतरी पाठवा. आमदार, नेते जितके जास्त बरळतील तितकी त्यांची विश्वासार्हता कमी होईल आणि भाजपवरील त्यांचे अवलंबित्व वाढत जाईल. भाजपला तर तेच हवं आहे.  शिंदे गटातील खासदारांच्या मतदारसंघात केंद्रीय मंत्र्यांचे दौरे हा त्याचाच एक भाग आहे. आपणच आपल्या पक्षाची प्रतिमा मलीन केली तर चांगल्या प्रतिमेच्या शोधात भाजपच्या कुशीत जाण्याशिवाय शिंदेंच्या आमदारांना पर्याय नसेल. ढाल-तलवारीची जागा कमळ घेईल. शिंदे गटाला त्यांची प्रतिमा सांभाळावी लागेल. भाजपने शिंदेंशी युती केली आहे, प्रतिमेशी नाही. बडबोल्या लोकांचं महत्त्व वाढतं, तेव्हा अधोगती नक्की असते. या लोकांना आवर घातला जाईल का? 

Web Title: What will happen after the release of Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.