मानवी हक्कांचं काय होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 04:18 AM2018-08-05T04:18:11+5:302018-08-05T04:18:19+5:30

गेल्या दशकात परदेशातल्या अनेक दाम्पत्यांनी भारतात येऊन सरोगसीच्या माध्यमातून ‘अपत्यसुख’ मिळविले.

What will happen to human rights? | मानवी हक्कांचं काय होणार?

मानवी हक्कांचं काय होणार?

Next

-अ‍ॅड. स्मिता सरोदे-सिंगलकर
गेल्या दशकात परदेशातल्या अनेक दाम्पत्यांनी भारतात येऊन सरोगसीच्या माध्यमातून ‘अपत्यसुख’ मिळविले. सरोगसीसाठी सुलभपणे गर्भ भाड्याने मिळणारा देश म्हणून भारताने जगात नावलौकिक मिळविण्यात इतक्यात प्रगती केली आहे. जकार्ता, अमेरिका, ब्रिटन, कोरीया येथील अनेक दाम्पत्ये सरोगसीसाठी भारतात येतात. भारतात महिलेचे गर्भाशय केवळ ६0 हजार रुपयांत भाड्याने मिळते, धक्कादायक वास्तव आहे.
सरोगसीचा व्यापार भारतात वाढण्याचे प्रमुख कारण म्हणून आपल्याला ‘गरिबी’कडे बघता येईल. भारतातील महिला या काटक, शाकाहाराचे प्रमाण अधिक असलेल्या तसेच व्यसनाचे प्रमाण कमी असलेल्या आहेत. त्यामुळे कमी खर्चात स्वस्थ्य प्रकृतीचे मूल मिळविण्याच्या हेतूने परदेशी दाम्पत्यांचा ओढा भारतात येऊन सरोगसीद्वारे मूल मिळवण्याचा होता. परंतु नव्या तरतुदींनुसार परदेशी दाम्पत्याला भारतीय महिलांचे गर्भाशय सरोगरीसाठी वापरता येणार नाही, त्याचप्रमाणे लग्नाला पाच वर्षे पूर्ण न झालेले दाम्पत्य, समलिंगी जोडपे, लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणारे जोडपे तसेच स्वत:चे मूल जन्माला घालण्यास सक्षम असलेल्या दाम्पत्यास सरोगसीचा पर्याय उपलब्ध नाही.
खरेतर, दत्तक घेण्याचा प्रकार फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे. दत्तक प्रक्रि येसंदर्भात काही प्रश्न समोर येऊ लागल्यानंतर दत्तक घेण्यासंबंधी काही (कठीण वाटणारे) नियम व किचकट प्रक्रिया तयार करण्यात आली. त्यामुळे आज दत्तक घेण्यास इच्छुक असलेल्यांची संख्या कदाचित कमी होताना दिसते. सरोगसीचा पर्याय त्यामानाने अधिक सोपा, जवळचा वाटायला लागला आहे. आपल्या रक्ताचे, आपल्या जिन्सचे, आपला चेहरामोहरा घेऊन जन्माला येणारे मूल असावे या इच्छेने सरोगसीद्वारे मूल जन्माला घालण्याचा प्रकार चर्चेत येणे साहजिकच आहे.
सरोगसी कायद्यानुसार नोंदणीकृत करण्यात आलेल्या क्लिनिकनाच सरोगसीसंबंधित प्रक्रिया राबविण्याचा अधिकार आहे. कोणतेही सरोगसी क्लिनिक, बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, मानवी भ्रूणतज्ज्ञ डॉक्टर किंवा कोणत्याही व्यक्तीला ‘व्यावसायिक सरोगसी’ कोणत्याच प्रकारे करता येणार नाही. सरोगसीचा व्यावसायिक वापर जसे की सरोगेट माता किंवा तिच्या नातेवाइकाला, प्रतिनिधीला रोख रक्कम देऊन अपत्याची खरेदी/विक्री करणे तसेच वैद्यकीय खर्चाव्यतिरिक्त आर्थिक मोबदला देणे म्हणजे ‘व्यावसायिक सरोगसी’ आहे, ज्यावर आता कायद्याने बंदी आणलेली आहे Þ
सरोगसी संदर्भातील नियमावलींमध्ये मुख्यत्वे सरोगेट मदरचा विचार होण्याची आवश्यकता आहे. गर्भाशयात मूल वाढवत असताना गर्भवती स्त्रीच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेत अनेक बदल होतात, अनेक यातनांमधून तिला जावे लागते. त्यामुळे अशा महिलेच्या आणि बाळाच्या आरोग्यासंदर्भातील अडचणींबद्दलही विचार करण्याची गरज आहे. तसेच गर्भपात झाला किंवा प्रसूतीच्या वेळेआधीच मूल जन्माला आले, तपासात सोनोग्राफीमध्ये मुलात काही व्यंग असल्याचे आढळले, मुलामध्ये मानसिक आजार निर्माण झाल्यास, मृत बालक जन्माला आल्यास, जबाबदारी कोणाची, हादेखील प्रश्न महत्त्वाचा आहे. बाळंतपणानंतर झालेली शरीराची हानी भरून काढण्यासाठी बाळंतिणीची विषेश काळजी घेणे आवश्यक असते. छोट्या कुटुंबांची संख्या देशात अधिक आहे. सरोगसीसाठी नातेवाइकांमधील महिला असण्याची अट वाढत असताना पुनर्विचार करण्याची गरज आहे. संबंधित दाम्पत्याला अशी नातेवाइकांमधील सरोगेट मदर उपलब्ध नसेल तर काय, हा प्रश्न उपस्थित होतो. तसेच अशी महिला नात्यातील आहे हे सिद्ध करण्यासाठी काही ठरावीक उपायदेखील नियमावलींमध्ये नाहीत. क्लिष्ट नियम तयार करून लोकांना कायद्याचे पालन करण्याचा तिटकारा येईल किंवा ते भ्रष्ट मार्गांचा अवलंब करतील असे सरोगसीच्या संदर्भातील नियम करण्यात आल्याचे काही बाबतींत दिसते.
आज एकीकडे बाळाला स्तनपान देण्याप्रति जागरूकता निर्माण केली जात असताना मात्र सरोगसीद्वारे जन्माला आलेल्या अपत्याच्या स्तनपानाच्या अधिकारांचे काय, हा प्रश्न कोणालाही महत्त्वाचा वाटत नाही असे प्रस्तावित नियमांवरून दिसते. बाळाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी तसेच प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी पहिल्या काही दिवसांत मातेचे दूध मिळणे आवश्यक आहे, असे वैद्यकशास्त्रानेही मान्य केले आहे. स्तनपानाविषयक कायद्याची पायमल्ली यातून होते. सरोगेट मदरचे भावनिक नाते गर्भावस्थेच्या नऊ महिन्यांत बाळाशी जोडले जाते. मूल दूर झाल्यावर तिला मानसिक धक्का बसू शकतो. अशावेळी तिला मानसिक समुपदेशनाची गरज भासू शकते या मुद्द्यांचा विचार नियमावलीमध्ये होणे गरजेचे आहे.
अलीकडे नागपुरात समोर आलेल्या घटना फारच धक्कादायक आहेत. रॅकेटमधील डॉक्टर आणि एजंट यांनी मात्र गर्भश्रीमंत जोडप्यांना बाळ देऊन लाखो रुपये कमविले. यावरून तरतुदींची अंमलबजावणी शून्य आहे हेच समोर येते.
सरोगसीच्या नावाने गरीब महिला अन्यायाला बळी पडणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे. काही श्रीमंतांची गरज/इच्छा पूर्ण करीत असताना, काही डॉक्टरांचा व्यावसायिक लाभ होत असताना ‘सरोगेट मदर’चा विचारसुद्धा एक जिवंत माणूस म्हणून करणे आवश्यक आहे. स्त्रियांच्या शरीरांचा वापर व शोषण एक वस्तू म्हणून होण्याचे एक नवीन क्षेत्र म्हणून ‘सरोगसी’ तंत्रज्ञानाचा वापर टाळणे मानवीहक्कांचा विचार आहे.

Web Title: What will happen to human rights?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.