कर्नाटकात काय हाेईल? भाजपसमोर आव्हाने कोणती? अन् काँग्रेसला लाभ मिळणार का? 

By वसंत भोसले | Published: April 9, 2023 08:47 AM2023-04-09T08:47:14+5:302023-04-09T08:48:24+5:30

कर्नाटक विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानिमित्त गेल्या दोन महिन्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राज्याचा आठवेळा दौरा केला आहे.

What will happen in Karnataka | कर्नाटकात काय हाेईल? भाजपसमोर आव्हाने कोणती? अन् काँग्रेसला लाभ मिळणार का? 

कर्नाटकात काय हाेईल? भाजपसमोर आव्हाने कोणती? अन् काँग्रेसला लाभ मिळणार का? 

googlenewsNext

कर्नाटकातील निवडणूक ही पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकापूर्वीची ही पहिली सेमी फायनल असेल. येत्या डिसेंबरमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान आदी राज्य विधानसभा निवडणुकीची दुसरी सेमीफायनल होणार आहे. त्या तीन राज्यांतही काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत आहे. जी आगामी लोकसभा निवडणुकीचा अजेंडा निश्चित करणार आहेत.

कर्नाटक विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानिमित्त गेल्या दोन महिन्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राज्याचा आठवेळा दौरा केला आहे. अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केली आहेत. याचे कारण की, गेल्या चार वर्षांतील भाजपच्या कारकिर्दीविषयी सांगण्यासारखे काही नाही आणि मतदारांना प्रभावित करणारे नेतृत्वही भाजपकडे राज्यात नाही. याउलट प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने सातत्याने प्रभावीपणे प्रचार करीत कर्नाटकातील भाजपचे सरकार भ्रष्ट आणि अकार्यक्षम असल्याचे जनतेवर बिंबवून टाकले आहे. यातूनही विजयापर्यंत पोहोचण्यासाठी आणि सत्ता राखण्यासाठी भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचा वापर करावा लागणार आहे. त्या दृष्टीने ही निवडणूक निर्णायकी ठरणार आहे.

भाजपसमोर आव्हाने कोणती?  
भाजपने तीन महत्त्वाच्या चुका केल्या आहेत. एक पक्षांर्तगत गटबाजी रोखता आली नाही. परिणामत: पक्षाचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुराप्पा यांना मुख्यमंत्री पदावरून दूर करावे लागले. दुसरी चूक होती येडियुराप्पा यांच्या जागी सौम्य प्रवृत्तीचे असलेले बसवराज बोम्मई यांच्याकडे नेतृत्व दिल्याने पक्षात उत्साह नाही. येडियुराप्पा यांच्याच तालावर चालणारे बोम्मई अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली. त्यांच्या सावलीतून बोम्मई बाहेर पडलेच नाहीत. तिसरी महत्त्वाची चूक करून विरोधकांना प्रचाराचे मुद्दे भाजपनेच दिले. भ्रष्टाचाराच्या पातळीवरील या चुकीने सरकार बदनाम झाले, सरकारी कामात किमान चाळीस टक्के कमिशन दिल्याशिवाय कामच मिळत नाही, असा आरोप होत राहिला. त्याला खोडून काढण्यात भाजपला शक्य झाले नाही. सरकारी कंत्राटदार संघटनेने मंत्री आणि भाजपच्या आमदारांना कंटाळून आंदोलन छेडले. एका कंत्राटदाराने केलेली आत्महत्या खूप गाजली. 

काँग्रेसला लाभ मिळणार का? 
दावणगिरे जिल्ह्यातील भाजपच्या आमदारांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणी पाच कोटी रोख रकमेसह पकडण्यात आले. सध्या ते तुरुंगात आहेत. या साऱ्या प्रश्नांवर काँग्रेसने सातत्याने आवाज उठविला. राज्यव्यापी प्रजा आवाज यात्रा काढून वातावरण तापते ठेवले. निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच शंभर उमेदवारांची यादी जाहीर केली. दुसरी यादीही आता जाहीर करण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा केली. त्या काळात कर्नाटकात चांगला प्रचार करून घेतला. शिवाय भाजपमधील अंतर्गत गटबाजीला बळी पडलेले आणि जनता दलातील नाराज आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. ही जमेची बाजू असली तरी सत्ता मिळाल्यास मुख्यमंत्रिपदी काेण विराजमान होणार? याचे उत्तर भाजपला देता येत नाही. याउलट काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात गटबाजी आहे. तरीदेखील उमेदवार निवडीची प्रक्रिया पूर्ण करीत काँग्रेसने आघाडी घेतली आहे.

मोदी-शहांच्या दोन डझन सभा  
भाजपला या निवडणुकीत गटबाजी, येडियुराप्पा यांना बाजूला करणे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाने बेजार करणार आहे. निवडणूक जाहीर होताच विविध संस्थांनी जे सर्व्हे जाहीर केले त्यामध्ये सत्तारूढ भाजपचा पराभव होण्याचे संकेत असल्याचे स्पष्ट दिसत होते. यावर उपाय म्हणून भाजपने तातडीने अनेक केंद्रीय मंत्र्यांना कर्नाटकात पाठविण्याचा निर्णय घेतला. शिवाय नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या दोन डझन सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यांच्या प्रतिमा हीच आता भाजपसाठी जमेची बाजू असणार आहे. 

जनता दल किंगमेकर ठरणार का?  
उत्तर कर्नाटकात भाजपविरुद्ध काँग्रेस अशी लढत आहे, तर दक्षिण कर्नाटकात तिरंगी लढती होतील. वक्कलिग समाजावर प्रभाव असलेल्या जनता दलाचे या विभागात चांगले अस्तित्व आहे. मागील निवडणुकीत या पक्षाने ३७ जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी ३० जागा दक्षिण कर्नाटकातून मिळविल्या होत्या. भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सत्ता संपादनासाठी लढत असली तरी जनता दलास चांगले यश मिळाले तर तो पक्ष किंगमेकर ठरू शकतो. मात्र, यावेळची स्थिती तशी नाही. काँग्रेस-जनता दल आघाडीचे सरकार पडले तेव्हा जनता दलाच्या तीन आमदारांनी राजीनामे दिले. निवडणुका जाहीर झाल्यावर चार आमदारांनी पक्ष सोडला आहे. अशा परिस्थितीत जनता दलास अस्तित्वासाठी लढावे लागेल.

Web Title: What will happen in Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.