राष्ट्रवादीचे काय होणार?
By admin | Published: May 4, 2015 12:08 AM2015-05-04T00:08:15+5:302015-05-04T00:08:15+5:30
परस्परविरोधी भूमिकांच्या डोहात राष्ट्रवादी काँग्रेस अजूनही गटांगळ्या खात आहे. यापुढे आम्ही कधीही जातीयवादी पक्षांसोबत जाणार नाही, असे पुन्हा
यदू जोशी -
परस्परविरोधी भूमिकांच्या डोहात राष्ट्रवादी काँग्रेस अजूनही गटांगळ्या खात आहे. यापुढे आम्ही कधीही जातीयवादी पक्षांसोबत जाणार नाही, असे पुन्हा प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर सुनील तटकरे यांनी जाहीर केले. पण याच पक्षाने भाजपासोबत विदर्भातील जिल्हा परिषदांमध्ये सत्तेसाठी युती केलेली आहे त्याचे काय? या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळाले नाही. तटकरे हे राष्ट्रवादीच्या संस्कृतीमध्ये पुरते मुरलेले आहेत. केवळ सात महिन्यांपूर्वी त्यांना हे पद मिळाले होते. आताच्या परिस्थितीत प्रदेशाध्यक्ष होण्याची मनापासून अन्य कोणाचीही तयारी नसावी. शरद पवारांचे नेतृत्व मानणाऱ्या पक्षातील समजदार नेत्यांची अजित पवारांमुळे घुसमट होते हे आजचे नाही. अनेकदा या नेत्यांनी तशी भावना खासगीत बोलून दाखविली आहे. अशावेळी अजित पवारांचे रागलोभ सांभाळण्याचा संयम असलेले तटकरे पुन्हा प्रदेशाध्यक्ष झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीची रया गेली. प्रदेश मुख्यालयातील वर्दळ आटली आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता असे जन्मापासूनचे या पक्षाचे तंत्र गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत बिघडले आणि पक्ष जमिनीवर आला. अजित पवार, तटकरे यांच्यावर सिंचन घोटाळ्याची टांगती तलवार आहे. छगन भुजबळ आणि त्यांचे कुटुंबीय घाम पुसत अँटीकरप्शनचे उंबरे झिजवत आहेत. या पार्श्वभूमीवर, प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे वजनदार नेते, चांगली प्रतिमा असलेले दिलीप वळसे पाटील, संयमी आणि अभ्यासू असलेले जयंत पाटील, महिला, तरुणींची पसंती मिळू शकते अशा सुप्रिया सुळे, ग्रामीण महाराष्ट्राची जाण असलेले रणजितसिंह मोहिते, मुस्लीम आणि उत्तर भारतीयांमध्ये चांगले नाव असलेले नवाब मलिक आदिंना घेऊन राष्ट्रवादीने अध्यक्षीय मंडळ नेमले असते तर त्यातून वेगळा संदेश गेला असता. पण पक्षावर आपलीच पकड असावी हा आग्रह असलेल्यांची अडचण झाली असती. एक वा द्विचालकानुवर्ती असलेल्या पक्षाकडून इतक्या व्यापकतेची अपेक्षाही नाही. ‘आपल्या पक्षाचे काय होणार’ ही चिंता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सतावत आहे. तटकरे पुन्हा प्रदेशाध्यक्ष झाल्याने त्याचे उत्तर मिळणार नाही. गणेश नाईक यांनी आपल्या घराण्यातील कोणालाही नवी मुंबई महापालिकेत उभे केले नाही. त्याचा आदर्श पक्षातील इतरांनी घ्यावा हे म्हणणे सोपे आहे; पण घराणेशाहीला फाटा देणे ही नाईक यांची राजकीय अगतिकता होती. तो त्यांचा त्याग नव्हता. अगतिकतेतून केलेली बाब ही त्याग कशी मानायची? घराणेशाही अन् वतनदारी संपेल त्या दिवशी एक तर राष्ट्रवादी संपेल किंवा प्रचंड लोकाभिमुख तरी होईल. पण तसे करून बघण्याची जोखीम कोण घेणार?
जाता जाता : भाजपाचे मंत्री आणि आमदारांमध्ये समन्वयाचा किती अभाव आहे याचा हा अनुभव. विदर्भातील आमदारानेच सांगितलेला. भाजपाचे मंत्री भाजपा आमदाराच्या गावात जाताना त्यांना विचारतही नाहीत याची प्रचिती देणारा हा किस्सा. या आमदारांना बाजूच्या जिल्ह्यातील असलेल्या राज्यमंत्र्यांचा फोन आला. त्यांच्यातील संवाद असा -
राज्यमंत्री - गावातलं तुमचं जनसंपर्क कार्यालय खूप बढिया आहे. आमदार- ‘तुम्ही कधी बघितलं?’.
राज्यमंत्री - ‘मी एकदोन कार्यक्रमांसाठी आलो होतो गावात. त्यावेळी तुमच्या कार्यालयासमोरून गेलो.’
आमदार- साहेब! मी तर त्या दिवशी गावातच होतो. एक फोन तर करायचा होता! आपली भेट झाली असती.
राज्यमंत्री - पुढच्या वेळी आलो की फोन करीन.