संपादकीय - मंत्रिमंडळ विस्ताराचे काय होईल? कधी होईल?
By यदू जोशी | Published: July 21, 2023 12:22 PM2023-07-21T12:22:05+5:302023-07-21T12:22:37+5:30
राष्ट्रवादीच्या ऐनवेळच्या एंट्रीमुळे भाजप, शिंदेसेना व अपक्ष आमदारांत खूप अस्वस्थता आहे. त्याची दखल घेत ऑगस्टमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल?
यदु जोशी
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत, अजित पवार यांना ते पद मिळेल वगैरे खूप बातम्या पसरवून झाल्या, टिरबाजीही झाली, पण तसे काहीही झाले नाही अन् होणारही नाही. भाजप २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत अजित पवारांना शिंदेंपेक्षा मोठे करणार नाही. महाराष्ट्राबाबतचे वेळापत्रक दिल्लीने ठरविलेले आहे, त्यानुसार सगळे होईल, पण, मग राष्ट्रवादीच्या ऐनवेळच्या एंट्रीमुळे मंत्रिपद हुकले म्हणून भाजप, शिंदेसेना अपक्ष आमदारांमध्ये खूप अस्वस्थता आहे. या अस्वस्थतेची दखल घेत ऑगस्टमध्ये विस्तार केला जाऊ शकतो. बाहेरून आदिती तटकरे कॅबिनेट मंत्री झाल्या अन् निष्ठावान माधुरी मिसाळ, मनीषा चौधरी, देवयानी फरांदे वंचित राहिल्या. आलेल्या हसन मुश्रीफ, छगन भुजबळ मंत्री झाले. मुश्रीफ तर त्यांच्या पत्नीने भाजपविरुद्ध केलेला आक्रोशही विसरले. जणू काही झालेच नव्हते, असे दाखवत भाजपच्या गळ्यात पडले. राष्ट्रवादीने (अजित पवार) त्यांच्या वाट्याचे दहावे मंत्रिपद जयंत पाटील आज ना उद्या आपल्याकडे येतील, या आशेवर रिक्त ठेवले आहे म्हणतात. पण, जयंतराव मोठ्या साहेबांना सोडून जाणार नाहीत. डॉ. संजय कुटे, संभाजी पाटील निलंगेकर, कृष्णा खोपडे, आशिष शेलार हे भाजपचे ज्येष्ठ घरी बसले आहेत. ते सगळे पक्षाच्या महाविजय अभियान २०२४ चे बळी आहेत, दुसरे काय!
ट्रिपल इंजिन सरकार
विधिमंडळ अधिवेशनात शक्तिशाली सत्तापक्ष विरुद्ध अशक्त विरोधी पक्ष असे चित्र पाहायला मिळते आहे. एक मुख्यमंत्री अन् दोन उपमुख्यमंत्री असल्याने सत्ताधारी पक्षांना फ्लोअर मॅनेजमेंटमध्ये अडचण येत नाही. आठवडा सरला, काँग्रेसला विरोधी पक्षनेते पदासाठीचे नाव ठरविता आलेले नाही. लवकर एकमत होईल ती काँग्रेस कसली? भविष्यात भाजपमध्ये जाऊ शकतात म्हणून त्यांच्याविषयी काड्या करायच्या. संग्राम थोपटेंचे नाव आले रे आले की मंत्रिपद मिळाले नाही म्हणून त्यांनी पुण्याच्या काँग्रेस कार्यालयात काही वर्षापूर्वी केलेल्या राड्याचे फोटो, बातम्या दिल्लीत पोहोचल्या करायच्या. सुनील केदारांचे नाव आले की जिल्हा बँकेचे भूत उभे करायचे, असे सगळे चालते. या काड्यांचा फटका नेत्यांवरुन पुढे पक्षाला बसत गेला तरी सुधारत नाहीत. ज्येष्ठ नेत्यांना पदाचा मोह आवरत नाही अन् तरुणतुकीमध्ये अस्वस्थता आहे.
दुसरीकडे विरोधी बाकावर बसलेल्या राष्ट्रवादीची अवस्था केविलवाणी आहे. जयंत पाटील, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड यांनी धुगधुगी ठेवली आहे. अजित पवारांशिवाय पक्षाची काय अवस्था होऊ शकते ते दिसतेच आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचा आवाज केव्हाच कमी झाला आहे. 'मातोश्री'वर सिधा निशाणा साधत आरोप करणारे सोमय्या यांची सीडी आल्यावरही ठाकरे सेनेने विधानसभेत या विषयावर बाळगलेले मौन खूपच खटकणारे होते. 'मातोश्री'चा 'म' जरी कोणी काढला तरी पेटून उठणारे एकेकाळचे आमदार आठवले, विधान परिषदेत अनिल परबांनी सोमय्यांवर निशाणा साधून चौकशीची घोषणा करवून घेतली. विधानसभेत यावर काहीही बोलायचे नाही, अशी कोणती रणनीती ठरलेली असेल तर ती आखणाऱ्यांनाच लखलाभ महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव दिसत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडे असलेले विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला हवे आहे. त्यावरूनही दोन पक्षांमध्ये खटके उडतील. तीन पक्षांच्या वज्रमूठ सभा पुन्हा सुरू होण्याची तूर्त तरी शक्यता दिसत नाही.
तिकडे तीन पक्ष आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अन् अजित पवार यांच्यासह ट्रिपल इंजिनचे सरकार धावू लागले आहे.
राष्ट्रवादीची महत्त्वाकांक्षा
राष्ट्रवादीला सत्तेशिवाय करमत नाही हे दिसलेच. त्यांचे राजकारण महत्त्वाकांक्षी अन् रेटून नेणारे आहे. पैशांतून सत्ता अन् सत्तेतून पुन्हा पैसा हा त्यांचा स्थायीभाव आहे. सत्तेचा उपयोग आपला पक्ष मजबूत करण्यासाठी कसा करायचा याचे राष्ट्रवादीइतके तंत्र कुणालाही ठाऊक नाही. ते करण्याच्या नादात ते आपल्याला दाबायला कमी करणार नाहीत, अशी भाजपची व विशेषतः शिंदेंच्या शिवसेनेची भीती आहे. युतीधर्माला जागू, अशी हमी राष्ट्रवादीने दिली तरच पुढचे सुरळीत होईल, अन्यथा दरदिवशी काही ना काही खटके उडत राहतील.
शिवसेनेत बंड झाले तेव्हा शरद पवार हे उद्धव ठाकरेंच्या भेटीला आवर्जून गेले होते. राष्ट्रवादीत बंड झाल्यापासून उद्धव ठाकरे हे शरद पवारांना भेटायला गेलेले नाहीत. अजित पवारांनी अचानक केलेले बंड, त्याला शरद पवार यांची संमती होती अशा बातम्या येणे, त्यातून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणे यामुळे उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्याबाबत सावध झाले असावेत, अशी एक शक्यता आहे. त्यामुळे या दोघांमधील संबंध कसे आकार घेतात ते पाहायचे.