वाचनीय लेख - ‘खोडसाळ’ बातम्यांनी भारताचे काय बिघडेल?
By विजय दर्डा | Published: April 8, 2024 07:45 AM2024-04-08T07:45:14+5:302024-04-08T07:45:32+5:30
भारतात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना ‘नेमकी वेळ’ साधून ब्रिटिश माध्यमांमध्ये निराधार बातम्या पेरल्या जातात, याचा अर्थ काय?
डाॅ. विजय दर्डा
भारताने २०२० पासून आतापर्यंत पाकिस्तानात २० जणांची ‘ठरवून हत्या’ केलेली आहे, अशी बातमी ‘गार्डियन’ या ब्रिटिश वृत्तपत्राने दिली आहे. वृत्तपत्राने या बातमीसाठी कोणताही हवाला/आधार/पुरावा दिलेला नसल्याने मी ती बातमीच मानत नाही. केवळ काही पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या वक्तव्यांचा आधार घेऊन अशा प्रकारची बातमी छापणे ही बेजबाबदार पत्रकारिताच होय! भारतामध्ये ऐन निवडणुकीच्या काळात अशा प्रकारची बातमी छापण्यामागचा नेमका हेतू काय आहे? बातमीत काय म्हटले आहे, हे सर्वांत प्रथम माहीत करून घेऊ. भारताची गुप्तचर संस्था रिसर्च अँड ॲनालिसिस विंग- रॉ ने २०१९ मध्ये पुलवामातील हल्ल्यानंतर अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले होऊ नयेत यासाठी आधीच बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने एक मोहीम हाती घेतली. त्याकरिता परदेशी भूमीवर काही करावे लागले, तरी ते करावे असे ठरले. या मोहिमेंतर्गतच पाकिस्तानमध्ये आतापर्यंत २० हत्या झाल्या आहेत. रॉचे नियंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडे आहे, असेही या बातमीत म्हटले आहे.
‘गार्डियन’ला काय म्हणायचे आहे हे आपण नक्कीच समजू शकतो. पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या दस्तावेजाच्या आधारे बातमीतील तपशील दिला गेला यातच या वृत्तपत्राची नियत स्पष्ट होते. पाकिस्तान भारताला बदनाम करणारी कागदपत्रे तयार करील हे तर उघडच आहे. ‘टार्गेट किलिंग’ची ही मोहीम भारत संयुक्त अरब अमिरातीतून संचालित करीत होता. त्यासाठी स्लीपर सेल तयार केला गेला. पाण्यासारखा पैसा खर्च केला गेला. या सगळ्याला दोन वर्षे लागली, असे या बातमीत म्हटले आहे. मग प्रश्न असा की या दोन वर्षांत पाकिस्तानने काय केले? संयुक्त अरब अमिरातीत स्लीपर सेल तयार झाले आणि पाकिस्तानला त्याचा सुगावाही लागला नाही? हा सगळा अहवाल बनावटरीत्या तयार केला गेलेला दिसतो. या बातमीत खलिस्तानचा समर्थक गुरुपतवंत सिंह पन्नू हा मृत असल्याचे म्हटले आहे. वास्तवात तो जिवंत आहे. लोकांनी यावर प्रश्न उपस्थित केल्यावर वृत्तपत्राने त्यात तत्काळ सुधारणा केली. परंतु, जिवंत माणसाला मृतांच्या यादीत आपण कसे टाकले यावर कोणतीही टिप्पणी केली नाही.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनीही भारतावर ‘टार्गेट किलिंग’चा आरोप केलेला आहे. तेथे खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर आपापसातील वैमनस्यातून मारला गेला. कॅनडाने केवळ आरोप केले, कोणतेही पुरावे दिले नाहीत. अमेरिकेनेही भारताला घेरण्याचा प्रयत्न केला. ब्रिटनमध्ये खलिस्तान लिबरेशन फोर्सचा प्रमुख अवतार सिंह खांडा याचा रहस्यमय मृत्यू झाला. तसेच, पाकिस्तानात दहशतवादी परमजितसिंह पंजवार याची गोळ्या झाडून हत्या केली गेली. या दोन्ही घटनांशी भारताचा संबंध जोडला गेला. भारताने नेहमीच असे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘परदेशी भूमीवर टार्गेट किलिंग भारताच्या धोरणात बसत नाही’, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. त्यांच्याशी मी पूर्णतः सहमत आहे. तर, माझा प्रश्न असा की, कोण कोणाला मारतो आहे? पाकिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांच्या गोळ्यांनी मारले गेलेले लोक ना पाकिस्तानचे राजकीय नेते होते, ना कुणी सज्जन सामान्य लोक होते. ते दहशतवादी होते आणि दहशतवाद्यांमध्ये आपापसात चकमकी झडत असतात. दहशतवादाच्या मागे ड्रग्ज माफिया, शस्त्रास्त्रांचे सौदागर यांचा हात असतो. दहशतवादाचा आता कुठल्याही विचारधारेशी काहीही संबंध राहिलेला नाही. आपापसातील वैमनस्यातून हत्या होत राहतात. यात भारताला का ओढले जात आहे? आपल्या निवडणूक फायद्यासाठी कॅनडा खलिस्तान्यांना पाळतो, पोसतो. अमेरिकेत ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यातही संघर्ष चालू आहे. भारतात निवडणुका होत आहेत. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलिन करणे हा गार्डियनचा हेतू स्पष्ट होतो. एकेकाळी ब्रिटनच्या पत्रकारितेविषयी साऱ्या जगात आदरभाव होता; परंतु या पत्रकारितेत भारताविषयी विद्वेष स्पष्ट दिसत आहे. भारताचा विकास अनेक देशांच्या पचनी पडत नाही आणि त्यातूनच हे असे हल्ले होत आहेत. असे हल्ले करणाऱ्यांनी एक लक्षात ठेवावे : भारत देशाची लोकशाही हा काही कच्च्या मातीतून तयार केलेला वाघोबा नाही. त्याची मुळे खूप खोल आहेत. या मुळांना स्वातंत्र्य लढ्यातील सेनानींनी आपल्या बलिदानाने सिंचित केले आहे. या देशाचा प्रत्येक नागरिक देशभक्त आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या विचारधारा काहीही असोत ते निवडणुका शर्थीने लढतात. परंतु, या देशातले राजकीय नेते आपल्या देशाविरुद्ध षड्यंत्र रचत नाहीत; देशाची लूट करून आपले घर भरत नाहीत. असे लुटारू जेव्हा भारताला सल्ले देतात तेव्हा त्यांची कीव येते.
आम्ही भगवान महावीर, भगवान बुद्ध आणि महात्मा गांधी यांचे अनुयायी जरूर आहोत. आम्ही अहिंसेवर विश्वास ठेवतो. परंतु, याचा अर्थ असा नव्हे की, भारत कमजोर आहे! घरात घुसून मारण्याचा ठेका कोणत्या एका राष्ट्राने घेऊन ठेवलेला नाही. भारतही ते करू शकतो.
गरज पडली तर आम्ही घरात घुसू. जगाने हे जरूर लक्षात ठेवावे की भारताच्या मानमर्यादेला कोणी धक्का लावण्याचा प्रयत्न करील, तर त्याला योग्य धडा शिकवताना हा देश जराही मागेपुढे पाहणार नाही.
(लेखक लोकमत समूह, एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आहेत)