माणूस म्हातारा न होता २०० वर्षं जगला तर आयुष्य कसं असेल ?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 05:48 AM2022-04-30T05:48:23+5:302022-04-30T05:48:38+5:30
‘अँटी एजिंग ड्रग्ज’, ‘स्टेम सेल थेरपी’ अशा अनेक मार्गांनी वार्धक्य लांबवण्याचे जोरदार प्रयत्न सध्या चालू आहेत. या धडपडीला यश येईल?
अच्युत गोडबोले
माणसाचं सरासरी आयुर्मान २०२० साली ७८.९३ वर्षं होतं. हे आयुर्मान वाढवण्यासाठीच्या माणसाच्या धडपडीला आजचं प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यामुळे प्रचंडच वेग आलाय. ‘जेरोंटोलॉजी’ म्हणजे वार्धक्य शास्त्राची शाखा! १९६१ साली लिओनार्डो हेफ्लिक नावाच्या एका संशोधकानं एका पेट्री डिशमध्ये गर्भातल्या काही पेशी ठेवून त्यांना पोषक द्रव्यं दिल्यावर त्या पेशींचं १०० वेळा विभाजन झालं. पण त्यानंतर मात्र त्यांचं विभाजन थांबलं. या शेवटच्या विभाजनानंतर कल्चरमध्ये बरेच बदल दिसायला लागले. हे बदल वृद्धत्वाकडे झुकणारे होते. याचाच अर्थ त्या पेशी आता ‘वृद्ध’ झाल्या होत्या पण १०० वेळा विभाजन झालं आहे; आणि आता थांबायला हवं हे पेशींना कसं कळतं ? - या प्रश्नांची उत्तरं अजूनही पूर्णपणे मिळालेली नाहीत.
‘आपल्या खाण्यामधून ३० टक्के कॅलरीज वजा केल्या, (म्हणजेच खाणं कमी केलं) तर आपलं आयुर्मान ३० टक्क्यानं वाढतं’ अशी एक थिअरीही समोर आली होती. ठरावीक वेळी फक्त ठरावीकच जीन्स ‘ॲक्टिव्ह’ ठेवण्याची तसंच क्रोमोझोममध्ये काही बिघाड झाला तरी तो दुरुस्त करण्याची जबाबदारी ‘सर्टुइन’ची असते. या प्रोटिनचा उपयोग करून वृद्धत्व थांबवता येईल का असाही संशोधकांचा विचार चाललाय. आपल्या शरीरातल्या क्रोमोझोम्सच्या दोन्ही टोकाला ‘टेलिमिअर्स’ असतात. पेशींच्या प्रत्येक विभागणीच्या वेळी त्यांची लांबी कमी कमी होत जाते. ती लांबी एका मर्यादेपर्यंत कमी झाली की मग पेशींची विभागणी थांबते. या मर्यादेला ‘हेफ्लिक लिमिट’ असं म्हटलं जातं. या ‘टेलिमिअर्स’ची लांबी कमी न होऊ देण्यासाठीच्या प्रयत्नांदरम्यान कॅन्सर पेशींमध्ये ‘हेफ्लिक लिमिट’ नसते हे लक्षात आलं. कारण त्यांच्यात ‘टेलोमेराझ’ नावाचं एक एन्झाईम असतं आणि त्यामुळे पेशींची विभागणी थांबत नाही; उलट कॅन्सरच्या पेशींच्या विभागणीचा वेग वाढवण्यात टेलोमेराझचा मोठाच हात असतो .
‘या किंवा यासारख्या एन्झाईमचा वृद्धत्व रोखण्यासाठी वापर करता येईल’ अशी आशा आता संशोधकांना वाटायला लागली आहे. थोडक्यात पेशींना अमरत्व प्राप्त करून देता येईल अशी आशा आता निर्माण झाली आहे. पण पेशी अवाक्याबाहेर वाढणंही चांगलं नाही. त्यामुळे एन्झाईमचा वापर करताना अशा अनेक बाबींचा विचार करायला लागणार आहे. त्याचबरोबर ‘अँटी एजिंग ड्रग्ज’ तयार करण्याचेही सध्या जोरदार प्रयत्न चालू आहेत. ‘स्टेम सेल थेरपी’ हाही तारुण्य टिकवण्यासाठी एक पर्याय मानला जातोय. वृद्धत्त्वामुळे उत्पन्न होणाऱ्या अनेक आजारांच्या मुळापर्यंत जाऊन ती कारणं नष्ट करण्याचेही संशोधकांचे प्रयत्न चालू आहेत.
१९७० साली कॅलिफोर्निया विद्यापीठातल्या मायकेल रोझनं फळांवरच्या माशांचं (फ्रुटफ्लाईज) आयुष्य ७० टक्क्याने वाढवण्यात यश मिळवलं. १९९१ साली कोलोराडो विद्यापीठातल्या थॉमस जॉन्सन यानं ‘नेमाटोड्स’ या जंताच्या प्रकारात मोडणाऱ्या प्राण्याचं वय ११० टक्क्याने वाढवणारा जीन शोधण्यात यश मिळवलं. त्याला त्यानं ‘एज-१ (Age -1)’ असं नाव दिलं. नंतर यीस्टवर केलेल्या प्रयोगांदरम्यान कोणत्या प्रकारचा जीन वय वाढवण्यासाठी कारणीभूत असतो हेही संशोधकांना समजलं. आता खालच्या पातळीवरच्या सजीवांमध्ये वार्धक्य येण्यासाठी एज-१, एज-२ आणि डॅफ-२ असे जीन्स कारणीभूत असतात आणि असेच जीन्स माणसांमध्येही आहेत हे संशोधकांना वाटतं आहे. पण हे जीन्स शोधायचे कसे? पूर्वी हे खूपच अवघड काम होतं. पण आता बायोइन्फर्मेटिक्स आणि डेटा ॲनेलेटिक्स मदतीला धावून येणार आहेत. त्या आधाराने ‘जिनोम सिक्वेन्सिंग’ करणं सोपं आणि स्वस्त होईल, तेव्हा लाखो लोकांचे असे सिक्वेन्सेस ‘डेटा ॲनेलेटिक्स’च्या सॉफ्टवेअरला देऊन त्यातले पॅटर्न्स शोधून, वार्धक्यासाठीचे जीन्स शोधून, जीन थेरपीसारखी तंत्रं वापरून ते जीन्स चक्क बदलून आपलं आयुष्य प्रचंड प्रमाणात वाढवू शकू. हे स्वप्नवत आणि अवघड वाटत असलं तरी अशक्य नाही. २१०० सालापर्यंत आपलं सरासरी आयुर्मान किती असेल याविषयी ८९ ते १३० वर्षं असे अनेक अंदाज आहेत.
- पण माणूस म्हातारा न होता २०० वर्षं जगला तर आयुष्य कसं असेल ? त्याला कंटाळा नाही का येणार ? मग कदाचित ७०-८० वर्षं झाल्यावर तो गोळ्या घेऊन १०-२० वर्षं झोप काढेल. पुन्हा जागा होईल; नवीन मित्रमैत्रिणी, नवीन हॉटेल्स, नवीन सिनेमे या सगळ्यांचा आनंद लुटेल, पुन्हा १०-२० वर्षं झोपेल वगैरे. त्यावेळचं आयुष्य कसं असेल हे कोणी सांगावं ?
godbole.nifadkar@gmail.com
(दीर्घायुष्य : उत्तरार्ध)
(ख्यातनाम लेखक, सहलेखिका-आसावरी निफाडकर)