जे काही चालले आहे, त्याने फार क्लेश होतात!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 09:29 AM2022-06-27T09:29:32+5:302022-06-27T09:30:33+5:30
महाराष्ट्रातल्या राजकीय युध्दात कुणाचा विजय होईल, कुणाची हार; पण काहीही झाले तरी लोकशाहीचा आत्मा जिवंत राहिला पाहिजे!
विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
महाराष्ट्रातल्या राजकारणात जे काही चालले आहे त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. दुसऱ्या राज्यातले माझे मित्र मला विचारतात, ही आमच्याकडची कीड तुमच्याकडे कशी लागली? हे संकट कधी दूर होणार? त्याचे परिणाम काय होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खुर्ची जाईल का ? देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्तेत येतील का? एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाचे काय होणार? शिवसेना फुटेल का? पवार साहेबांची भूमिका काय असेल? आणि या सगळ्यात काँग्रेस पक्ष कुठे आहे?
- राजकारणातील पेच शत्रुत्त्वाच्या कडेलोटावर येऊन उभे आहेत. लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाच्या मनात आज एकच प्रश्न आहे : ‘ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का?’
- महाराष्ट्रात ज्या पातळीवर उतरुन राजकीय डावपेच चालले आहेत; त्याचे क्लेश होऊन मला घुसमटल्यासारखे वाटते आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला “हा असा” चेहरा कधीच नव्हता. महाराष्ट्राचे राजकारण प्रेम आणि सौहार्दाने परिपूर्ण असायचे. माझे वडील बाबूजी, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जवाहरलाल दर्डा महाराष्ट्राच्या राजकारणाचे एक प्रमुख आधारस्तंभ होते. त्यामुळे लहानपणापासूनच मी राजकारण जवळून पाहत आलो. सत्तेत असलेल्या बाबुजींबरोबर विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही हसत खेळत वागता / वावरताना पाहिले आहे. कट्टर विरोधी पक्षातल्या नेत्यांचा व्यक्तिगत स्नेह पक्का असे. ते सुख, दुःखे वाटून घेत. सभागृहाच्या बाहेर पडल्यावर मतभेद लांब ठेवत. एकत्र गप्पांचे अड्डे, जेवण हे होत असे. महाराष्ट्राची ही राजकीय परंपरा मी पाहिली आहे. या परंपरेचे पालन करणारे अनेक राजकीय नेते आजही दिसतात. मी व्यक्तिगत पातळीवर आजही या परंपरेचा सन्मान करतो आणि तसा वागतोही. परंतु सत्तेच्या गळेकापू स्पर्धेने महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला नख लावले, हे दुर्दैव होय! आज राजकीय नेत्यांना एकमेकांच्या रक्ताची तहान लागली आहे. वैचारिकता तर खुंटीला टांगून ठेवली गेली आहे. मी जवळपास ५०-५५ वर्षांपासून राजकारण अत्यंत जवळून पाहत आलो. अठरा वर्षे भारतीय संसदेचा सदस्य होतो. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, मोरारजीभाई, विश्वनाथ प्रताप सिंह, चंद्रशेखर, पी. व्ही. नरसिंहराव, देवेगौडा, इंदर कुमार गुजराल, अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांना मी संसदेत पाहिले. राष्ट्रीय पातळीवरही एकमेकांच्या सन्मानाची परंपरा राहिली आहे. संसदेच्या सभागृहात एकमेकांवर तुटून पडणारे नेते सभागृहाच्या बाहेर एकमेकांशी प्रेमपूर्ण व्यवहार करत. कडवट टीका करतानाही शालीनता सांभाळण्याची काळजी घेतली जात असे.
एकदा देवकांत बरुआ यांनी पंडितजींबद्दल अवमानकारक शब्द वापरले. पंडितजींनी त्यांना चहाला बोलावले आणि म्हटले की ‘पुष्कळ वेळा आपण अकारण उत्तेजित होता’. पंडित नेहरूंच्या निधनानंतर बरुआ त्यांना श्रद्धांजली वाहायला आले तेव्हा त्यांनी तीन वेळा नमस्कार केला. प्रसिद्ध पत्रकार चलपती राव यांनी त्यांना विचारले ‘तीन वेळा का बरे? त्यावर बरुआनी उत्तर दिले, ‘‘पहिला नमस्कार महान स्वतंत्रता संग्रामसेनानीला, दुसरा लोकशाही जिवंत ठेवणाऱ्या सेनापतीला आणि तिसरा मी केलेल्या चुकीसाठी. जिच्याबद्दल त्यांची माफी मागण्याची माझी हिंमत नव्हती!’’
अटलजी पंडितजींचे प्रखर टीकाकार होते. परंतु ते निवडणूक हरल्यानंतर पंडितजींनी त्यांना संसदेत आणले. अटलजी त्यांच्यावर कठोर प्रहार करत असत. परंतु त्यात शालीनता, लोकशाही मूल्यांविषयी आस्था होती. १९७७मध्ये जनता पार्टी सरकारात अटलजी परराष्ट्रमंत्री झाले. त्यानंतर साऊथ ब्लॉकमध्ये असलेले नेहरूंचे तैलचित्र कोणीतरी काढून टाकले. एक दिवस अटलजी तिथून जात होते आणि त्यांनी विचारले, पंडितजींचे चित्र कुठे आहे? कोणीही उत्तर दिले नाही, पण दुसऱ्याच दिवशी ते चित्र पुन्हा तिथे लागले. १९७१ मध्ये भारताने पाकिस्तानला मात दिली, त्यावेळी इंदिरा गांधींना अटलजींनी दुर्गा संबोधले. काश्मीर प्रश्नावर १९९४मध्ये पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात भारताला घेरण्याचा प्रयत्न केला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी विरोधी पक्षाचे नेते अटलजींना जिनिव्हाला पाठवले होते. १९८८ मध्ये अटल बिहारी वाजपेयी किडनीच्या आजाराशी झुंजत होते. उपचारासाठी अमेरिकेला जाणे गरजेचे होते. परंतु पैशांची अडचण होती. ही गोष्ट राजीव गांधी यांना कळताच त्यांनी संयुक्त राष्ट्रात न्यूयॉर्कला जाणाऱ्या प्रतिनिधी मंडळात अटलजींना सामील केले आणि सांगितले की, उपचार करूनच परत या. राजीव गांधींच्या निधनानंतर स्वतः हा प्रसंग सांगून अटलजी म्हणाले होते, ‘राजीवजी नसते तर मी जिवंत राहिलो नसतो’ अगदी अलीकडे राज्यसभेत गुलाम नबी आझाद यांना निरोप देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोळ्यात पाणी आले होते.
सन्मान, प्रेम आणि सहयोगाची अशी पुष्कळ उदाहरणे सांगता येतात. परंतु बदललेल्या काळात राजकीय नेत्यांमधील नातेसंबंध बिघडत चालले आहेत. सत्तेचे राजकारण काय आजच होते आहे, असे नव्हे. वसंतदादा पाटील यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या शरद पवारांनी रातोरात दादांना धक्का दिला आणि सरकार पडले. पवार ज्या पी. ए. संगमा यांच्या बरोबर काँग्रेसमधून बाहेर पडले ते संगमाही पुढे त्यांना सोडून गेले. पुष्कळ लोकांनी वेगवेगळे पक्ष सोडले. आपापले नवे गट / पक्ष उभे केले. शिवसेनेच्या बाबतीत सांगायचे तर १९९१मध्ये छगन भुजबळ, २००५ साली नारायण राणे आणि नंतर राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली. त्यावेळी पक्ष सत्तेत नव्हता. पण, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आता बऱ्याच लोकांनी पक्ष सोडला तेव्हा शिवसेना सत्तेत आहे. यावेळी जास्त कटुता आणि विखार दिसतो. खूप वर्षांपासून एकमेकांचे शत्रू असल्यासारखी भाषा वापरली जाते आहे. लढाई राजकारणाची असली, तरीही त्यात शालीनता आणि किमान माणुसकी असली पाहिजे. वर्तमानातला सर्वाधिक त्रास देणारा प्रश्न म्हणजे, लोकशाहीचा आत्मा कसा वाचेल? - या प्रश्नाने मी अस्वस्थ आहे. या विचित्र घुसमटीचा अनुभव अनेक लोक आज घेत असतील.