नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 07:40 AM2024-10-03T07:40:53+5:302024-10-03T07:42:12+5:30

नवरात्रीचे नऊ दिवस हे देवत्वाशी आंतरिक संबंध जोडण्याचे दिवस आहेत. हे दिवस आणि रात्रींमध्ये अवधान ठेवा तसेच या काळात ‘स्वतःबरोबर’ही राहा! 

"Whatever is good for me, I will get it" | नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’

नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’

गुरुदेव, श्री श्री रविशंकर

आपले मन संकल्प आणि विकल्पाने भरलेले असते. खरी शक्ती तुमच्या दृढनिश्चयामध्ये असते आणि प्रत्येक काम दृढनिश्चयानेच तडीला नेता येऊ शकते.  कमकुवत मनाचा निर्धार अप्रभावी असतो.  साधना आणि ज्ञानाद्वारे आपले मन बळकट केल्याने आपला संकल्पही बळकट होतो. 

आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्र-उत्सवाच्या पहिल्या तीन रात्री दुर्गेची, पुढच्या तीन रात्री लक्ष्मीची आणि नंतर शेवटच्या तीन रात्री सरस्वती देवीची पूजा केली जाते. आधी तमो आणि रजो गुणांच्या माध्यमातून सत्त्वगुणात आपली चेतना फुलते. मग दहावा दिवस विजयादशमी म्हणून साजरा करून या ज्ञानाचे सार सन्मानित केले जाते.

संकल्पाचा एक अर्थ म्हणजे आपली चेतना  अनंतामध्ये घेऊन जाणे आणि मनाला वर्तमान क्षणात आणणे. आपण एक इच्छा मनाशी करा, ती वातावरणात सोडून द्या आणि कोणत्याही अपेक्षेविना त्या दिशेने आपले काम करत राहा... असे केल्याने स्वप्न सत्यात उतरेल. समजा, तुम्हाला बंगलोरहून मुंबईला जायचे आहे. तुम्ही विमानाचे तिकीट खरेदी करता आणि मुंबईला पोहोचण्यासाठी दोन तास प्रवास करता; पण तुम्ही त्या दोन तासांच्या प्रवासात  ‘मला मुंबईला जावे लागेल’ किंवा ‘मी मुंबईला जात आहे’ असे सारखे म्हणत राहता का?- तसे करत असाल, तर मग रुग्णालयात भरती होणेच बरे! कधी कधी इच्छा ज्वराचे रूप घेते आणि आपले ध्येय साध्य होण्याचा प्रवास रोखते. ज्वररहित इच्छेबरोबरच, ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला मिळेल’ असा विश्वासही असायला हवा. 

येथे  मुख्य मुद्दे आहेत : साधना (आध्यात्मिक सराव आणि स्व-प्रयत्न) म्हणजे जागरूकता आणि ज्वराचा त्याग. सहसा  लोक डोळे बंद करतात आणि स्वतःच्या ‘आत’ जातात, तेव्हा  ‘हे ठीक नाही, ते ठीक नाही’ असे विचार येतात. त्यांना प्रत्येक गोष्टीत दोष दिसतो. ते ध्यान करू शकत नाहीत किंवा शांत होऊ शकत नाहीत. सतत कसल्या ना कसल्या कामात गुंतलेल्यांना वाटते, “सर्व काही ठीक आहे”. 
या दोन्ही पैलूंकडे पाहण्याची गरज आहे. जेव्हा तुम्हाला ‘आत ‘जायचे असेल तेव्हा  निवृत्तीची वृत्ती बाळगणे आवश्यक आहे- जे जसे आहे तसे ठीक आहे. जेव्हा तुम्हाला ‘बाहेर’ येऊन काम करायचे असेल तेव्हा तुमचे अवधान नेमके असले पाहिजे. असे केल्याने तुम्हाला छोट्या गोष्टींमध्येही परिपूर्णता दिसते. जिथे जिथे तुम्हाला अपूर्णता दिसते, तिथे तुम्ही ती कशी दुरुस्त करू शकता ते पाहा. या दोन्ही पद्धती तुम्हाला ध्यानाच्या खोल गुहेत शिरण्यास मदत करतील. ध्यानाचे मूलभूत तत्त्व आहे-मला काहीही नको आहे, मी काहीही करत नाही आणि मी काहीच नाही. 

नवरात्रीचे नऊ दिवस हे देवत्वाशी आंतरिक संबंध जोडण्याचे दिवस आहेत. या नऊ दिवसांत, आपण आपल्या सर्व छोट्या-छोट्या गोष्टी, छोट्या-छोट्या इच्छा, गरजा, आपल्याला त्रास देणाऱ्या छोट्या-छोट्या समस्या बाजूला ठेवूया आणि त्या दिव्य मातेला, त्या परम देवत्वाला म्हणूया, “मी तुझा/तुझी आहे, माझ्यासाठी तुझी जी इच्छा आहे, ती पूर्ण होवो.” या दृढ विश्वासाने, जेव्हा तुम्ही पुढे जाल, साधना कराल, तेव्हा तुम्हाला कशाचीही कमतरता भासणार नाही. प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे नैसर्गिकरीत्या येईल. आत्मविश्वासाने पुढे जा. नवरात्री ही अशी वेळ आहे जेव्हा देव सर्व मानसिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण करतो.  ज्यांना तुमची गरज आहे त्यांना मदत करा. या नऊ रात्री आत्म्यासाठी खूप शुभ आणि उत्साहवर्धक असतात. या दिवसांमध्ये अवधान ठेवा आणि स्वतःबरोबरही राहा.

Web Title: "Whatever is good for me, I will get it"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.