यूझर्सना गंडवणारे व्हॉट्सॲपचे माहिती गोपनीयता धोरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 03:32 AM2021-01-13T03:32:55+5:302021-01-13T03:34:23+5:30

सोशल मीडिया कंपन्या त्यांच्या मर्जीनुसार ग्राहकांना वापरून घेत आहेत. त्यामुळे ‘आमचे खुले इंटरनेट आम्हाला परत द्या’, असे म्हणायची वेळ आली आहे.

WhatsApp information privacy policy that annoys users | यूझर्सना गंडवणारे व्हॉट्सॲपचे माहिती गोपनीयता धोरण

यूझर्सना गंडवणारे व्हॉट्सॲपचे माहिती गोपनीयता धोरण

googlenewsNext

दिपक शिकारपूर

जगातील कोट्यवधी वापरकर्ते सोशल मीडिया व अनेक ॲप वापरतात. वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारांत आपल्याला घरबसल्या जगाची ओळख करून देणारी संवाद माध्यमे म्हणजे फेसबुक, व्हाॅट्सॲप, ट्विटर आणि इंस्टाग्राम असे थोडक्यात म्हणता येईल. त्याचा वापर वैयक्तिक व व्यावसायिक स्तरावर होतो. हे सर्व करताना अनेक प्रकारची माहिती (गोपनीय सुद्धा) प्रसारित होते. ती संबंधित व्यक्तीलाच पाठवली असल्याने तिसऱ्या व्यक्तीला ती माहिती मिळेल ह्याची पुसटशी शंकासुद्धा माहिती पाठवणाऱ्याला नसते; पण ह्यामुळेच काही मोजक्या कंपन्या बलाढ्य बनल्या असून, त्यांच्याकडे कोट्यवधी व्यक्तींची गोपनीय व खासगी माहिती एकवटली आहे. या माहितीचा गैरवापर या कंपन्या सर्रास करतात आणि त्यातून आपले व्यापारी जाळे अधिक पसरवतात. अनेक टेलिकॉलर्स ही माहिती विकत घेतात व डिजिटल मार्केटिंग या गोंडस नावाआडून हा व्यापार चालतो.

व्हॉट्सॲपने आपले गोपनीयता धोरण अद्ययावत केले आहे आणि वापरकर्त्यांनी नवीन अटी व शर्ती स्वीकारण्यासाठी ८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सेवेच्या नवीन अटी आणि गोपनीयता धोरणाप्रमाणे व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी फेसबुकसह माहिती सामायिक करणे अनिवार्य करते. फेसबुकचे वापरकर्ते वाढवणे हे त्याचे सरळ व्यापारी उद्दिष्ट आहे. या माध्यमांवर आपण कुठली माहिती ठेवतो, यावर वापरकर्त्यांनी थोडे सजग झाले पाहिजे. सोशल मीडिया ई-कॉमर्स कंपन्या खूप मोठ्या झाल्या की, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे अवघड होते. त्यांच्या मर्जीनुसार वापरकर्त्यांना वागवण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे आमचे खुले इंटरनेट आम्हाला परत द्या, असे म्हणायची वेळ आली आहे. याबद्दल खूप गदारोळ झाल्यावर कंपनीने काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. व्हॉट्सॲप वैयक्तिक चॅट्स फेसबुकला शेअर करणार नाही. व्हॉट्सॲप एंड-टू-एंड एनक्रिप्टेड राहते, इतर कोणीही ते वाचू शकत नाही. 
एका निवेदनात व्हॉट्सॲपने म्हटले आहे,  ‘अपडेट फेसबुकवर व्हॉट्सॲपची डेटा सामायिक करण्याची पद्धत बदलत नाही आणि लोक मित्र किंवा कुटुंबाशी खासगी संवाद कसा साधतात यावर परिणाम होत नाही; पण व्यावसायिक व आर्थिक व्यवहाराची माहिती यात येत नाही.

व्हॉट्सॲपने पुढील माहिती फेसबुक आणि त्याच्या इतर कंपन्यांसह सामायिक केली आहे. खाते नोंदणी माहिती (फोन नंबर), वित्त व्यवहार (व्हॉट्सॲपवर आता भारतात पेमेंट्स आहेत), सेवेसंदर्भातील माहिती, आपण इतरांशी कसा संवाद साधता याविषयी माहिती, मोबाइल डिव्हाइस माहिती आणि आयपी पत्ता. या सर्वांचा अर्थ स्पष्ट आहे. आपण आपले जीवन व अर्थव्यवहार सोशल मीडियावर प्रकाशित करण्याचा मूर्खपणा करू नका. यामुळे या माध्यमांवर आपण कुठली माहिती ठेवतो यावर वापरकर्त्यांनी थोडे सजग झाले पाहिजे. शाळा-कॉलेजनंतर जगभर विखुरलेले मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक, पुन्हा भेटणारे आणि उद्योग-व्यवसायाच्या नवनवीन (व कधीकधी अनपेक्षित देखील) संधी मिळवून देणारे हे संवाद मंचसुद्धा त्रासदायक ठरू शकतात; पण बऱ्याचदा त्यात चूक आपलीच असते. कारण आपल्या आयुष्यातील खासगी आणि सार्वजनिक बाबींदरम्यान असलेली अदृश्य सीमारेषा आपण इथे नकळत ओलांडतो. सोशल मीडियावरील आपल्या अस्तित्वाचे आणि त्यामार्फत आपण मांडत असलेल्या आपल्या प्रतिमेचे योग्य व्यवस्थापन करीत राहणे अत्यावश्यक असते.

आपण एखाद्या बँकेत नवीन खाते उघडले असेल, नवीन मोठी वा महागडी वस्तू खरेदी केली असेल, देश किंवा परदेश-प्रवासाला जाणार असाल किंवा प्रवासात असाल तर या गोष्टी सोशल मीडियावरून जगाला सांगण्याची काहीही गरज नाही, या माहितीचा वापर कसा केला जाईल याची शाश्वती नाही. आपल्या बँक खात्याची तसेच व्यवहार-पद्धतींची माहिती उघड करू नका.  जगाशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडिया हे अतिशय सोपे, स्वस्त आणि प्रभावी माध्यम असले तरी या मंचावरील आपले अस्तित्व सावध आणि सजग असलेच पाहिजे. 
deepak@deepakshikarpur.com

( लेखक संगणक अभ्यासक आणि उद्योजक आहेत )

Web Title: WhatsApp information privacy policy that annoys users

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.