गुड मॉर्निंग, गुड नाइट मेसेजेसमुळे whatsAppचे ट्रॅफिक जॅम

By संदीप प्रधान | Published: January 24, 2023 06:15 AM2023-01-24T06:15:47+5:302023-01-24T06:16:05+5:30

नव्याने स्मार्टफोन हाती आलेले आजी-आजोबा त्याच त्या मेसेजेसची ढकलगाडी चालवून एक मोठा प्रश्न तयार करीत आहेत. त्यांच्या फॉरवर्डकडे लक्ष देताय ना?

WhatsApp traffic jam due to good morning good night messages | गुड मॉर्निंग, गुड नाइट मेसेजेसमुळे whatsAppचे ट्रॅफिक जॅम

गुड मॉर्निंग, गुड नाइट मेसेजेसमुळे whatsAppचे ट्रॅफिक जॅम

Next

नव्याने स्मार्टफोन हाती आलेले आजी-आजोबा त्याच त्या मेसेजेसची ढकलगाडी चालवून एक मोठा प्रश्न तयार करीत आहेत. त्यांच्या फॉरवर्डकडे लक्ष देताय ना?

अभिजितने डोळे उघडले तेव्हा लागलीच मोबाइल हातात घेतला. ई-मेलवर त्याचे लक्ष गेले. नोकर कपातीमुळे त्याला घरी बसवण्याचा निर्णय कंपनीने घेतला होता. दीर्घ श्वास घेऊन त्याने व्हॉट्सॲप सुरू केले. लागलीच गुड मॉर्निंगच्या मेसेजची माळ त्याच्या गळ्यात पडली. मेसेज पाठवणारे सारेच नात्यागोत्यातील, कॉम्प्लेक्समधील ज्येष्ठ नागरिक. - कसले गुड मॉर्निंग? जॉब गेल्याने ‘बॅड मॉर्निंग’ झालीय आणि हा संदेश पाठवणाऱ्याच्या ते गावीच नाही. सवयीने त्याने एक मेसेज ओपन केला. एक हसरे, गोंडस बाळ अभिजितला दिसले. अचानक त्याच्या पोटात खड्डा पडला. आपल्या गर्भार बायकोला आता काय सांगायचे? अशाच गोंडस बाळाला जगात आणण्याची आपण घाई केली का? अभिजितने ते बाळ डिलिट केले.

रोज आपल्या साऱ्यांच्याच मोबाइलमध्ये किमान डझनभर मेसेज हे गुड मॉर्निंग अथवा गुड नाइटचे येतात. अशा मेसेजमुळे आपला मोबाइल स्लो होतो व इंटरनेट पॅक झपाट्याने संपतो. भारतात तीनपैकी एका व्यक्तीचा, तर अमेरिकेत दहा जणांपैकी एकाचा मोबाइल यामुळे स्लो होतो. भारतात ३९० दशलक्ष व्हॉट्सॲप वापरकर्ते आहेत. त्यामुळे हे गुड मॉर्निंग कित्येक पटींत वृद्धिंगत होते. भारतातील व्हॉट्सॲप मेसेजच्या ट्रॅफिक जाममुळे सिलिकॉन व्हॅलितील तज्ज्ञ चक्रावून गेले आहेत. या समस्येचे एक मोठे कारण भारतामधील ज्येष्ठ नागरिक असल्याची पहिली बातमी २०१८ साली आली होती. आता त्यात अधिक भर पडत असल्याचे सांगितले जाते आहे.

 गेल्या पाच वर्षांत गुड मॉर्निंगच्या मेसेजकरिता उत्तम छायाचित्रे शोधण्याच्या प्रमाणात दहापट वाढ झाली आहे. ही छायाचित्रे डाऊनलोड करण्याच्या प्रमाणात नऊपट वाढ झाली आहे. आपल्या फोनचे आयुष्य कमी करणारा हा अनावश्यक ‘कचरा’ काढून टाकणारी अनेक ॲप्स उपलब्ध आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिकांची मुले त्यांच्यापासून दूर राहतात.  मित्रमंडळी, नातलगांच्या भेटी फार होत नाहीत. त्यामुळे जगाकडे पाहण्याची खिडकी हा त्यांच्याकडील व्हॉट्सॲपसारखा सोशल मीडिया हाच आहे. या पिढीला संवाद साधण्यासाठी ‘गुड मॉर्निंग’ संदेशाचा मोठा आधार होतो. यातून मग कंटाळा येईल, इतके मेसेज ही ज्येष्ठ मंडळी इतरांना फॉरवर्ड करतात. भारतामध्ये ‘फॉरवर्ड मेसेज’ या व्हायरसचा साथरोग आला आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. यातूनच मग भावना भडकवणारे, मन विचलित करणारे, तणाव निर्माण करणारे मेसेज, व्हिडीओ कुठलीही शहानिशा न करता सर्वदूर पसरवणे राजकीय पक्ष, असामाजिक तत्त्वे यांना सहज शक्य होते. 

यासाठी  काही पथ्ये पाळायला हवीत. न वापरलेली ॲप डिलिट केली पाहिजेत. मोबाइलमधील कॅमेऱ्यातून फोटो काढताना लो रेझ्युलेशनचे सेटिंग करा. त्यामुळे फोटो लहान आकाराचे येतील व स्पेस वाचेल. काढलेले फोटो फोनमध्ये नव्हे तर गुगल क्लाऊडवर सेव्ह करा. त्यामुळे फोन खराब झाला तरी तुमच्या आठवणी चिरकाल टिकून राहतील. डाऊनलोड केलेले मेसेज, व्हिडीओ तातडीने डिलिट करा. मेसेज ठराविक कालावधीनंतर आपोआप नाहीसे होतील, हे सेटिंग व्हॉट्सॲपमध्ये अवश्य वापरा. मोबाइलवर सॉफ्टवेअर अपडेट आल्यावर लागलीच अपडेट करा. त्यामुळे लेटेस्ट फिचर्स व मोबाइलच्या सुरक्षेचे नवे पर्याय उपलब्ध होतील. याखेरीज वायफाय असेल तरच फोटो, व्हिडीओ डाऊनलोड होतील, अशा सेटिंगचा पर्याय निवडा. फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ओटीटी प्लॅटफॉर्म  मोबाइलमधील डेटा पटापट संपवतात.  फेसबुक, इन्स्टाग्राम इत्यादींची लाइट व्हर्जन वापरणे हाही पर्याय आहे. 
२० हजार रुपयांच्या व त्यापेक्षा कमी किंमतीच्या मोबाइलची रोज नवनवी मॉडेल बाजारात येतात. ज्येष्ठ नागरिक साधारणपणे हेच फोन वापरतात. कंपन्या साधारण दोन वर्षांनंतर या फोनच्या सॉफ्टवेअर अपग्रेडेशनकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे आजोबा-आजीच्या तब्येतीबरोबर आता त्यांच्या मोबाइल फॉरवर्डकडे घरच्यांनी लक्ष देणे गरजेचे होऊन बसले आहे.

sandeep.pradhan@lokmat.com

Web Title: WhatsApp traffic jam due to good morning good night messages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.