मनात विचार आला रे आला की स्क्रीनवर (आपोआप) उमटलाच!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 10:12 AM2023-09-02T10:12:00+5:302023-09-02T10:13:28+5:30
आता तंत्रज्ञ ‘ब्रेन-टू-टेक्स्ट इंटरफेस’चा विकास करीत असून, त्याद्वारे वापरकर्त्याच्या मनातले विचार (टाइप न करताच) थेट स्क्रीनवर उमटवणे शक्य होणार आहे.
- डॉ. दीपक शिकारपूर
(उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक)
मनी वसे ते स्वप्नी दिसे हे जुनं झालं... आता काही वर्षातच आपले विचार आपल्याला थेट पडद्यावर दिसू शकतील. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग ह्यांनी शारीरिक दुर्बलतेवर केवळ इच्छाशक्ती व तंत्रज्ञानामुळे मात केली. तेच तंत्रज्ञान याच दशकाच्या अखेरीस आपल्या स्मार्टफोन, टॅबलेट वा संगणकाला मिळू शकेल. लॅपटॉप किंवा पीसीचा मोठा कीबोर्ड असेल तर टायपिंग बऱ्यापैकी सोपे बनते. मात्र, स्मार्टफोनचा (किंवा टॅबचादेखील) कळफलक मर्यादित आकाराचा असतो आणि त्यावरच्या कीज् जवळजवळ असल्याने त्यावरून वेगाने टायपिंग करणे अनेकांना जमत नाही. मनातले विचार (मनाच्याच गतीने) पुढे धावत असतात आणि त्यांना बोटांनी टायपिंग करून मूर्त स्वरूपात आणेस्तोवर त्यातले निम्मे विस्मृतीत जातात, असा अनुभव अनेकांना येतो.
आता तंत्रज्ञ ‘ब्रेन-टू-टेक्स्ट इंटरफेस’चा विकास करीत असून त्याद्वारे वापरकर्त्याच्या मनातले विचार (टाइप न करताच) थेट स्क्रीनवर उमटवणे शक्य होणार आहे. मेंदू संगणक संवाद (ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस) तंत्रज्ञान मानवी मस्तिष्काच्या विद्युत क्रियाकलापांचे मोजमाप करण्यासाठी मस्तिष्क-सेंसर वापरते. हे सेंसर मस्तिष्काच्या पृष्ठभागावर किंवा खोलवर ठेवले जाऊ शकतात. मस्तिष्काच्या विद्युत क्रियाकलापांचे मोजमाप करून, हे तंत्रज्ञान संगणकाला मानवी विचार आणि भावना ओळखण्यास आणि नियंत्रित करण्यास अनुमती देते. पंचेंद्रियांमार्फत मिळालेल्या माहितीवर प्रक्रिया करण्याची मानवी मेंदूची क्षमता अफाट आहे. संगणकीय भाषेतच सांगायचे तर दर सेकंदाला चार एच-डी मूव्हीजचे स्ट्रीमिंग करण्याइतकी; परंतु, माहितीचा इतका मोठा धबधबा हाताळण्याची क्षमता संगणकीय यंत्रणेमध्ये नसल्यामुळे बोलण्यातून व्यक्त होऊ शकणाऱ्या डेटाचा वेग एखाद्या १९८० मधल्या मोडेमइतकाच असतो. ही मर्यादा पार करण्यासाठी आपल्या मेंदूमध्ये उत्पन्न होणाऱ्या विद्युत संदेशांची सांगड हार्डवेअरशी घालणे आवश्यक आहे. असे वेअरेबल (शरीरात किंवा शरीरावर बसवून वापरण्याजोगे) उपकरण छोटे, कमी वजनाचे आणि सहजपणे व स्वस्तात उत्पादन करण्यायोग्यही असले पाहिजे. या सर्व घटकांचे संतुलन साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे साध्य झाले की आपण स्मार्टफोनवरील सध्याच्या टायपिंगच्या सर्वसाधारण वेगाच्या पाचपट अधिक वेगाने (मिनिटाला शंभरपेक्षा जास्त शब्द) टायपिंग करू शकू.
- याखेरीज हे तंत्रज्ञान ऑगमेंटेड रिॲलिटी इंटरफेस म्हणूनही काम करू शकेल. मेंदूतील विविध क्रिया-प्रक्रियांची नोंद घेऊन त्यांचे मोजमाप करणारे व त्यांचे रूपांतर लिखित स्वरूपात सादर करू शकणारे संवेदक (सेन्सर्स) प्रयोगशाळेत तयार केले जात आहेत. अशा परस्पर संवादासाठी वापरकर्त्याच्या त्वचेचाही उपयोग करून घेता येईल काय याची चाचपणी सुरू आहे व यासाठी अंध व्यक्ती वाचण्यासाठी वापरत असलेल्या ब्रेल तंत्रज्ञानाचा आधार घेतला जातो आहे. त्वचेखाली चेतापेशींची टोके (नर्व्ह एंडिंग्ज) असतातच, त्यांना उद्दिपित करून त्यामार्फत संवाद चालवण्याची योजना आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून, शारीरिक अपंगत्व असलेल्या लोकांना त्यांच्या मर्यादेवर मात करण्यास मदत केली जाऊ शकते. व्हीलचेअर चालवणे, संगणकावर टाइप करणे आणि फोन वापरणे यासारख्या गोष्टी दिव्यांगांना करणे शक्य आहे.
थिंकएक्स्प्लोअर (ThinkExplore) कंपनीच्या माइंडस्केप होम या संकल्पनेनुसार, व्हर्चुअल रिॲलिटी / ऑगमेंटेड रिॲलिटी या तंत्रप्रणालीचा वापर करून व ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’च्या माध्यमातून, घरातील सर्व साधने आपण निव्वळ विचारांवर चालवू शकता. संबंधित साधनांकडे (उदा. टीव्ही, दिवे, थर्मोस्टॅट इ.) पाहून फक्त मनाने त्याला आज्ञा द्यायची एवढेच करायचे!